'कबीर सिंग' च्या निमित्ताने...: का वाढतोय समाजात हिंसाचार.. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 07:00 AM2019-07-14T07:00:00+5:302019-07-14T07:00:17+5:30

कबीर सिंग हा चित्रपट २०० कोटी रूपये उत्पनाच्या क्लबमध्ये गेला. ही फक्त एक बातमी नाही तर सामाजिक स्थितीविषयी चिंता निर्माण करणारी गोष्ट आहे.

on occasion of kabir singh : why Violence growing in the society... | 'कबीर सिंग' च्या निमित्ताने...: का वाढतोय समाजात हिंसाचार.. 

'कबीर सिंग' च्या निमित्ताने...: का वाढतोय समाजात हिंसाचार.. 

Next

कबीर सिंग हा चित्रपट २०० कोटी रूपये उत्पनाच्या क्लबमध्ये गेला. ही फक्त एक बातमी नाही तर सामाजिक स्थितीविषयी चिंता निर्माण करणारी गोष्ट आहे. काय आहे कबीर सिंग मध्ये़? तर वैद्यकीय शिक्षण घेत असलेला नायक प्रेमात अपयशी ठरल्यानंतर प्रचंड व्यसनांध आणि वासनांधही होऊन हिंसाचारी कृत्य करतो. प्रेयसी, तिची बहिण, मित्र यांना मारहाण करतो. याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळतो. सामाजिक स्वास्थ्याविषयी चिंता निर्माण करणाऱ्या अशा वृत्तीेसंदर्भात डॉ. श्रुती तांबे (समाजशास्त्र विभाग प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्याबरोबर राजू इनामदार यांनी साधलेला संवाद.

.....तरूणाई हिंसाचाराकडे का झुकते आहे?
- समाजातील वाढत्या बलात्काराच्या, निर्घृण खुनांच्या घटना तरी हेच सूचित करीत आहेत. कबीर सिंग चित्रपटाला मिळणारा प्रतिसाददेखील हेच ठळकपणे सांगतो आहे. चित्रपटाकडे चित्रपट म्हणून पाहा असे सांगण्यात येते, मात्र समाजाचेच प्रतिबिंब त्यात पडत असते. गेल्या सुमारे १५ ते २० वर्षात आपल्या सर्वांच्याच वृत्ती, संवेदना हळुहळू बधीर होत चालल्या आहेत, तंत्रज्ञानावरील अतिअवलंबातून, उपग्रह वाहिन्यांवरील भडक, टीआरपी केंद्री मालिकांमुळे एक नवे बधीर सामाजिक वातावरण निर्माण होत आहे.एकूण वातावरणच असे निर्माण केले जात आहे, की आसपास काय सुरू आहे, याचे कोणाला कसले भानच राहू नये.
- म्हणजे काय?
-आपल्या एकूणच समाजात कमालीचा ढोंगीपणा, दुटप्पीपणा, दांभिकपणा वाढत चालला आहे. आज सामाजिक आयुष्याचे असे एकही क्षेत्र राहिलेले नाही, की ज्यात भ्रष्टपणा, हिंसकपणा नाही.

उलट झाले असे आहे ज्यांना शिक्षा व्हायला हव्यात तेच आपल्याला आदर्श वाटू लागले आहेत. तथाकथित सेलेब्रिटींचा अतिरेकी गौरव या कलाची एक खूण आहे. नीतीमूल्यांचा धडा असे लोक देत आहेत. ही विसंगती लहान मुले, तरूण मुलेमुली पहात असतात. शिक्षणक्षेत्रापासून माध्यमांपर्यंत व राजकारणापासून ते समाजकारण, अर्थकारण या सर्वच क्षेत्रातील नेतृत्वात अशा प्रवृत्तींनी शिरकाव केला आहे. जगणे असेच असते, असे त्यांना वाटू लागते. श्रीमंत करचुकवे, हेराफेरी करणारे उद्योगपती असोत, की गुन्हा सिद्ध न झालेले राजकारणी असोत, की इतरांना ब्लॅकमेल करणारे गुंड असोत-त्यांचा गौरव केला जातो. ते काय वागतात, म्हणतात त्याचे उदात्तीकरण केले जाते. याचा प्रभाव ज्या तरुणांवर पडतो ते दुसरे काय करणार? 

कशामुळे होत असावे हे असे वाटते?
सोशल मीडिया व सर्वच माध्यमे आणि समाजातील धुरीण नीतीमूल्यांचा अजिबात आग्रह धरत नाहीत, इतकेच नाही, तर अशांचा सत्कार करतात. अशा प्रकारचे वातावरण फ्री मोबाईल डेटा देऊन वाढवले जात आहे. खरे तर हे मुद्दाम केले जात आहे, की काय नकळे. स्त्री देहाची विटंबना करणारे, कुठल्याही मार्गाने पैसे कमवणारे, व्यसने करणारे, खून करणारे, दंगली पेटवणारे जर आदर्श असतील तर अशा गोष्टी कळत नकळतपणे तरुणांच्या मनावर बिंबवल्या जातात. मूल्यांविषयीचा संभ्रम वाढत चालला आहे. महाराष्ट्रात समाजसुधारणा चळवळ घडलीच नाही, असे वाटावे, अशा कनिष्ठ प्रतीच्या दूरचित्रमालिकांना सहज प्रायोजक मिळत आहेत. त्याची जणू समाजाला चटक लावण्यात आली आहे. उच्च मध्यमवर्ग नेते व सेलेब्रिटींसारखे जगण्याचा प्रयत्न करतो. कनिष्ठ मध्यमवर्ग त्यांच्याकडे पहात तसे कसे होता येईल याचा विचार करतो. समाजाचे हे दोन मोठे घटकच मनोरंजनाचे आभासी जग व वास्तव यांच्या धूसर सीमारेषेवर जगत आहेत. अशा वेळी मला हवे ते मिळवणारच, असा दुराग्रह धरणारा, त्यासाठी अभिमानाने हिंसेची कास धरणारा कबीर सिंग आदर्श वाटतो, यात आश्चर्य नाही.


हिंसाचारी नायकाला मिळणारा प्रतिसाद हा एकीकडे बेरोजगारी, सामाजिक निर्नायकी अवस्था यातून गोंधळलेला नवतरूण निराशेच्या गर्तेत बुडत आहे. अशावेळी उत्तरे न मिळणाऱ्या प्रश्नांनी निरुत्तर होऊन तो कबीर सिंगच्या फँटसीकडे वळत आहे. हा पाश्चात्य संस्कृतीचा परिणाम आहे, ही चुकीची घारणा आहे. 
 

-आपल्याकडेच हिंसेला असा प्रतिसाद का मिळत असावा?
- याची कारणे आपल्या व्यवस्थेत आहेत. १९९० मध्ये मी एक अभ्यास केला होता. एकतर्फी प्रेमप्रकरणातून तोपर्यंत राज्यात २७ हत्या झाल्या होत्या. रिंकू पाटील ते सांगलीची अमृता. हे सगळेच भयानक होते. जातीपातीची बंधने, सहज नातेसंबंध व मोकळेपणाला असलेला प्रतिबंध, इच्छाआकांक्षांचे दमन करायला लावणे, कनिष्ट आर्थिकस्थिती याबरोबरच विशेषत:मुलग्यांमधे नकार पचवायची शक्ती नसणे, त्याप्रकारचे संस्कारच न होणे, हवे ते मिळालेच पाहिजे अशी वृत्ती, त्यातून येणारे पाशवीपण असे बरेच काही त्या अभ्यासात निदर्शनास आले. दुर्दैवाने 1990च्या अभ्यासात दिसलेले सगळे तसेच आहे, किंबहुना अजून वाढले आहे. म्हणूनच असे चित्रपट २०० कोटीच्या क्लबमध्ये जातात, त्याचे माध्यमांमधून कौतूक होते. हे सगळेच या वाढत्या आक्रमक वृत्तीला जबाबदार आहे. 
 

यात काहीच बदल शक्यच नाही का?
- जरूर बदल करता येईल, मात्र त्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना भाबडे, बालीश असे हिणवण्याचे थांबले पाहिजे. शांततामय सहजीवन आणि स्त्रियांच्या निर्णय स्वातंत्र्याचा खराखुरा स्वीकार करणे अत्यंत तातडीने आवश्यक आहे. शालेय वयापासूनच मुलांवर जातीसंस्था व पुरुषप्रधान व्यवस्थेऐवजी समतापूर्ण स्त्रीपुरुष सहजीवनाची वाट दाखवायला हवी.खरी मर्दानगी स्त्री देहाची विटंबना करण्यात व्यसने करण्यात नाही, हे सर्व स्तरातून शिकवले गेले पाहिजे. आम्ही विद्यापीठात तसा प्रयत्न करतो, आणखीही काही स्वयंसेवी संस्था हा प्रयत्न सातत्याने करत आहेत, करत असतील. अशांना उत्तेजन दिले पाहिजे, समाजासमोर आणले पाहिजे. हा फार दीर्घ पल्ल्याचा मात्र कायमस्वरूपी असा उपाय आहे. तो करण्याची वेळ आली आहे हे आपल्याला समजेल तो सुदिन
डॉ. श्रुती तांबे
समाजशास्त्र विभाग प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 
............

 मुल्य, आदर्श याविषयी बोलणाऱ्यांना आजकाल फालतू समजले जाते. काय श्यामची आई असे म्हटले जाते. त्यांची चेष्टा केली जाते. भडक बोलणाऱ्यांना, भांडणे लावणाऱ्यांना, जातीपातीचे कडवेपण सांगणाऱ्यांना समाजात किंमत आली आहे. तरीही वेगवेगळ्या क्षेत्रातील मोजकेच का होईना पण काही लोक तरी आजही मुल्यांची शिकवण देतात, जपणूक करतात ही आशादायक बाब आहे असे त्या म्हणाल्या. - डॉ. श्रुती तांबे(समाजशास्त्र विभाग प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

Web Title: on occasion of kabir singh : why Violence growing in the society...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.