आता विधान परिषदेच्या ११ जागांकडे लक्ष

By यदू जोशी | Published: June 13, 2018 05:34 AM2018-06-13T05:34:59+5:302018-06-13T05:34:59+5:30

विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात निवडणूक होणार आहे.

Now focus on the 11 seats of the Legislative Council | आता विधान परिषदेच्या ११ जागांकडे लक्ष

आता विधान परिषदेच्या ११ जागांकडे लक्ष

Next

 मुंबई : विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात निवडणूक होणार आहे. आपल्या पाच जागा निवडून येण्याच्या दृष्टीने भाजपा रणनीती आखत असून त्यासाठी ‘मित्र’पक्ष शिवसेनेची भाजपाला गरज भासणार आहे.
राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, जयदेव गायकवाड, नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडित, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त आणि शरद रणपिसे, भाजपाचे भाई गिरकर आणि विद्यमान मंत्री महादेव जानकर (रासपा), शिवसेनेचे अनिल परब व शेकापचे जयंत पाटील हे ११ सदस्य निवृत्त होत असल्याने ही निवडणूक होत आहे. ही निवडणूक नागपूर अधिवेशनात होणार असल्याने पावसाळ्यातही नागपुरातील राजकीय वातावरण गरम असेल.
एक जागा निवडून आणण्यासाठी २७ आमदारांचा कोटा लागेल. भाजपाचे संख्याबळ १२३ (एक रासपा सदस्यासह) आहे. मात्र विधान परिषदेवर पाच उमेदवार निवडून द्यावयाचे असतील तर भाजपाला आणखी १२ मतांची गरज असेल. त्यात सहा अपक्ष विधानसभा सदस्य हे भाजपासोबत आहेत. त्यामुळे त्यांना आणखी सहा मतांची गरज भासेल.
शिवसेनेचे ६३ विधानसभा सदस्य आहेत. त्यांचे दोन आमदार सहज निवडून येऊन त्यांच्याकडे ९ मते शिल्लक असतील. ही मते जर शिवसेनेने भाजपाच्या पारड्यात टाकली तर भाजपाचा पाचवा आमदार निश्चितपणे निवडून येईल. शेकापचे जयंत पाटील यांची नजर शिवसेनेकडील जादा मतांवर असेल. स्वत:च्या पक्षाचे तीन, बहुजन विकास आघाडीचे तीन, माकपा, भारिप-बहुजन महासंघ आणि समाजवादी पार्टीच्या एका विधानसभा सदस्याचे समर्थन मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. या शिवाय काही अपक्षांनाही ते गळाशी लावू शकतात.
काँग्रेसचे ४२ आणि राष्ट्रवादीचे ४१ मिळून ८३ विधानसभा सदस्य आहेत. दोघांनी आघाडी करून निवडणूक लढली तर त्यांच्या तीन जागा निश्चितपणे येतील. तीन जागा जिंकण्यासाठी त्यांना ८१ आमदार लागतील आणि अशाप्रकारे त्यांच्याकडे दोन मते शिल्लक राहतील. विधानपरिषदेच्या दोन जागा काँग्रेसच्या तर एक राष्ट्रवादीच्या वाट्याला जाईल, असे म्हटले जाते. आघाडीकडे शिल्लक असलेली दोन मते आपल्याला मिळावित असा जयंत पाटील यांचा प्रयत्न असेल.

Web Title: Now focus on the 11 seats of the Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.