मुंबई : आता पंचांग फाडून टाका, सण वगैरे थोतांड असून ते बंद करा, असे आदेश निघायचेच आता बाकी आहे. हा आदेशही हवा तर काढा. तशीही आपल्याकडच्या सणांची रया गेलीय, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फटाक्यांवरील निबंर्धांवरून नाराजी व्यक्त केली. दक्षिण मुंबईत बुधवारी मेट्रोच्या कामाची पाहणी त्यांनी केली. यावेळी बोलताना त्यांनी फटाके बंदीच्या निर्णयाला जोरदार विरोध केला. शांततेचा अतिरेक झाला, तर एक दिवस असंतोषाचा स्फोट होईल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
फटाकेबंदीबाबतच्या निर्णयानंतर अनेक स्तरांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे राज्य शासन प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प करत आहे. शाळकरी मुलांना तशा शपथाही दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सणांवरील अतिक्रमणांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. खुद्द उद्धव ठाकरेंनीच शिवसेनेची भूमिका स्पष्ट केल्यानंतर, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनाही फटाकेबंदी करणार नाही, केवळ जनजागृती करणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.
उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत मेट्रोच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले की, मेट्रोच्या कामासाठी महापालिकेची परवानगी लागणार नाही, असे होऊन चालणार नाही. महापालिकेच्या परवानगीची गरज इतर ठिकाणी लागते, तर येथेही परवानगी घेणे गरजेचे आहे. महापालिकेच्या अधिकारांवर गदा येईल, असा कोणताही प्रस्ताव आम्ही मान्य करणार नाही. महापालिका आणि सरकारने हातात हात घालून काम केले पाहिजे, तरच विकास होईल. खरे तर नगरविकास खात्याने मेट्रोला विशेष दर्जा देण्याचा प्रस्ताव महापालिकेत माहितीसाठी पाठविला आहे. तो मंजूर वा नामंजूर केला, तरी मेट्रोला विशेष दर्जा प्राप्त होणारच आहे, असेही ठाकरे म्हणाले.
मेट्रो-३ चे काम सुरू असताना इमारतींना हादरे बसत आहेत. मात्र, मेट्रोचे अधिकारी पुरेशी काळजी घेत असल्याचा निर्वाळाही ठाकरे यांनी दिला. आरेच्या परिसरात होत असलेल्या मेट्रोच्या कामाबाबत आपण समाधानी नाही. मी लवकरच या भागात दौरा करून पाहणी करणार आहे. या पाहणीनंतरच माझे मत व्यक्त करेन. तिथे निसर्गाची हानी होत असेल, तर शिवसेनेचा विरोध कायम असेल, असा इशाराही त्यांनी दिला.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.