ठळक मुद्देप्रवीणच्या फुप्फुस आणि कानामध्ये गोळया घुसल्या होत्या. शारीरीक व्यंग निर्माण झाल्यामुळे त्याला कमांडोच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले.

मुंबई, दि. 14- दहशतवाद्यांच्या गोळ्या अंगावर झेलून पुन्हा नव्या जिद्दीने आयुष्याची सुरुवात करणारा नौदलाचा माजी मरीन कमांडो प्रवीण तिओतियाचे (32) खुद्द मास्टर-बलास्टर सचिन तेंडुलकरने कौतुक केले आहे. प्रवीणने नुकतीच लडाखमध्ये खारदुंग ला मॅरेथॉन शर्यतीत पदकविजेती कामगिरी केली. फुप्फुसाचा त्रास असतानाही त्याने धाऊन 72 किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. मुंबईवर नोव्हेंबर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हॉटेल ताजमध्ये दहशतवाद्यांचा सामना करताना प्रविणला चार गोळया लागल्या होत्या. 

प्रवीणच्या फुप्फुस आणि कानामध्ये गोळया घुसल्या होत्या. शस्त्रक्रिया करुन प्रवीणच्या शरीरातून या गोळया काढण्यात आल्या. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पाच महिन्यांनी प्रवीणला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. पण शारीरीक व्यंग निर्माण झाल्यामुळे त्याला कमांडोच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले. नौदलाचा हा निर्णय प्रविणला पटला नव्हता. आपण अजूनही तंदुरुस्त आहोत हे पटवून देण्यासाठी प्रवीणने मॅरेथॉन शर्यतींमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली. 

लडाख मॅरेथॉनमधील प्रवीणच्या कामगिरीने सचिनचे लक्ष वेधून घेतले. अशक्य असे काही नाही. तुमची इच्छा असेल तर, तुम्ही एखादी गोष्ट मिळवू शकता. प्रवीण तिओतिया तू आमची प्रेरणा आहेस अशा शब्दात सचिनने प्रवीणचे कौतुक केले आहे. कानाला गोळया लागल्यामुळे अंशत: बहिरेपण असल्याने प्रवीणचा पुन्हा मरीन कमांडो पथकात समावेश होऊ शकत नाहीत. पण त्याला टेबलावरचे काम करण्याची इच्छा नव्हती. 

प्रवीणने नौदलाकडे गिर्यारोहणाची परवानगी मागितली होती. पण वैद्यकीय आधारावर त्याला परवानगी नाकारण्यात आली. आपण सैनिक सेवेसाठी फिट आहोत हे पटवून देण्याचा प्रविणने निश्चय केला. मॅरेथॉन धावपटू परवीन बाटलीवालाबरोबर प्रविणची ओळख झाली. त्याने मॅरेथॉन शर्यतीमध्ये धावण्यासाठी प्रवीणला प्रोत्साहन दिले आणि प्रवीणची धावपटू होण्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला. 

तिओतियाने 2014 पासून मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली. 2015 मध्ये मुंबई हाफ मॅरेथॉनमध्येही तो सहभाही झाला होता. नौदलाची काय प्रतिक्रिया असेल याची कल्पना नसल्याने तो वेगळया नावाने मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाला होता.