मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तर त्यांच्याविरोधात अराजकीय, अभ्यासू आणि सामाजिक प्रतिष्ठा असणारी व्यक्ती उभी करावी, असा सूर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत निघाल्याची माहिती विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
७ डिसेंबर रोजी होणा-या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत कोणाला उभे करायचे, यावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या संयुक्त बैठकीत विचारमंथन झाले. काँग्रेस पक्ष सोडताना राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. रिक्त झालेली ही जागा काँग्रेसची आहे, त्यामुळे तेथे काँग्रेसने उमेदवार उभा केल्यास त्याला राष्टÑवादीचा पाठिंबा राहील, असे राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बैठकीत सांगितले. तसेच दोघांच्या सहमतीने एक उमेदवार उभा करावा व त्यासाठी शिवसेनेचे समर्थन मिळेल काय यासाठी प्रयत्न करावेत, अशीही चर्चा बैठकीत झाली. मात्र शिवसेना आज जरी राणेंच्या विरोधात बोलत असली तरी आपल्या भूमिकेवर कायम राहील की नाही, याविषयी काही नेत्यांनी साशंकता व्यक्त केली.
अर्ज दाखल करण्याची शेवटीची तारीख २७ नोव्हेंबर आहे. तोपर्यंत आणखी दोन ते तीन बैठका होतील. त्यानंतर जे ठरेल त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असेही विखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह उपसभापती माणिकराव ठाकरे, राष्टÑवादीचे नेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जयंत पाटील, शरद रणपिसे आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, भाजपा पक्ष कार्यालयातून उमेदवारी अर्ज नेण्यात आला आहे. मंगळवारी नारायण राणे विधानभवनात येऊन गेले. एक चर्चा अशीही आहे की राणे यांना मंत्री करायचे आणि आता घटक पक्षाचे सदस्य मंत्री आहेत म्हणून त्यांना आम्ही मतदान केले, असे सांगून राणे यांना भाजपाने मतदान करायचे, त्याचवेळी शिवसेनेने मतदान केले तर चांगलेच, नाही तर त्यांची मते फोडायची. या रणनीतीची चर्चा चालू असली तरी त्यावर अधिकृतपणे कोणीही बोलायला तयार नाही.
>शायना एन.सी. यांचेही नाव चर्चेत : राणे यांना विधान परिषदेवर निवडून आणायचे की त्या जागी भाजपातून शायना एन.सी. किंवा माधव भांडारी यांच्यापैकी एकाला संधी द्यायची यावर भाजपात चाचपणी सुरू आहे. शिवसेना शायना एन.सी. यांच्या नावाला होकार देईल असे सांगितले जात आहे. मात्र भाजपातून यावर कोणीही अधिकृतपणे बोलायला तयार नाही. सगळ्यांची बोटं मुख्यमंत्र्यांच्या दिशेने आहेत.