एकालाही भुकेल्यापोटी झोपू द्यायचे नाही...

By गजानन दिवाण | Published: October 16, 2018 06:48 AM2018-10-16T06:48:27+5:302018-10-16T06:49:32+5:30

अन्न वाचवा समितीचा संकल्प; अनंत मोताळे यांची विशेष मुलाखत

No one should let go of hunger ... | एकालाही भुकेल्यापोटी झोपू द्यायचे नाही...

एकालाही भुकेल्यापोटी झोपू द्यायचे नाही...

Next

- गजानन दिवाण, औरंगाबाद

एकीकडे शहरात आढळणाऱ्या कचºयात ६० टक्के शिल्लक राहिलेले अन्न असते आणि त्याच वेळी शहरात अनेक गरिबांना अन्न नसल्याने रिकाम्यापोटी झोपावे लागते. अस्वस्थ करणारे हे चित्र प्रत्येक शहरात आढळते. याच अस्वस्थतेतून चार वर्षांपूर्वी औरंगाबादेत ‘अन्न वाचवा’ समितीचा जन्म झाला. आज परिस्थिती खूप बदलली आहे. शिल्लक राहिलेले अन्न कचºयात नव्हे, तर भुकेल्यांच्या पोटात जाते. या समितीचे जन्मदाते अनंत मोताळे यांचे आता एकच स्वप्न आहे, ‘एकही दिवस आणि एकही माणूस शहरात भुकेला झोपणार नाही, हा दिवस मला पाहायचा आहे. शहर भूकमुक्त करायचे आहे.’
या ‘भूकमुक्त शहर’ अभियानाविषयी अनंत मोताळे यांच्याशी साधलेला संवाद.

प्रश्न - अन्न वाचवा समितीचा जन्म कसा झाला?
- मी स्वत: एस. टी. महामंडळात अभियंता होतो. २०१२ साली निवृत्त झालो. लग्न कार्यालयात गेल्यानंतर होणारी अन्नाची नासाडी पाहून मी अस्वस्थ व्हायचो. ही अस्वस्थता मला झोपू देत नव्हती. मी जनजागृतीचे काही बोर्ड तयार केले आणि घराजवळील काही मंगल कार्यालयांत लावले. ‘एकीकडे देशात २० कोटी लोक भुकेले असताना ही अन्नाची नासाडी कशासाठी?, असे हे फलक होते. नंतर काही दिवसांनी मंगल कार्यालयांतून फोन येऊ लागले. अन्नाची नासाडी कमी झाली, पण शिल्लक राहिलेले अन्न कचºयात जात आहे, त्याचे काय करायचे, याची विचारणा होऊ लागली. मग मी स्वत: शिल्लक राहिलेले अन्न घेऊन रेल्वेस्टेशन आदी ठिकाणी जायचो आणि भुकेल्यांना ते द्यायचो. पण एकटा माणूस किती करणार? म्हणून चार वर्षांपूर्वी अन्न वाचवा समितीची स्थापना केली. या समितीत माझ्यासह एकूण २५ जण आहेत. यात सहा जण निवृत्त असून, बाकी सारे नोकरी-उद्योग-व्यवसायात आहेत. यात १२-१३ महिलाही आहेत.

प्रश्न - शिल्लक राहिलेले अन्न तुम्ही स्वत: पोहोचविता का?
- नाही. सुरुवातीचे काही दिवस आम्ही ते केले. नंतर शासकीय रुग्णालय असलेल्या घाटीजवळ मोईद हशर गरजूंना अन्न पोहोचवितात असे समजले. त्यांच्या माध्यमातून हे काम सुरू केले. पुढे शहरात रोटी बँक सुरू झाली आणि शिल्लक राहणाºया अन्नाचा प्रश्न कायमचा मिटला.

प्रश्न - शिल्लक अन्न कोठून जमा करता आणि ते गरजूंपर्यंत कसे पोहोचविता?
- रोटी बँकेत गरजू असलेले अनेक जण स्वत: येतात आणि अन्न घेऊन जातात. मोईद हशर गरजूंपर्यंत स्वत: अन्न पोहोचवितात. आम्ही शहरातील प्रत्येक मंगल कार्यालयापर्यंत पोहोचलो आहोत. अन्न शिल्लक राहिले की, ते मला किंवा वरील दोघांपैकी एकाला फोन करतात. शिल्लक अन्न त्यांच्याकडून ताब्यात घेऊन फ्रीजरमध्ये ठेवले जाते आणि काही तासांत ते गरजूंपर्यंत पोहोचविले जाते. गेल्या वर्षी २०१७ मध्ये एकूण ८२ मुहूर्त होते. या कार्यक्रमात शिल्लक राहिलेले एक लाख लोकांचे अन्न आम्हाला मिळाले. जे कचºयात जाणार होते. एवढे मोठे अन्न भुकेल्यांच्या पोटात गेले. यामुळे ३० टन कचºयाची निर्मिती थांबली. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आयुक्तांनी आम्हाला बोलावून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये जनजागृतीचे बोर्ड लावण्यास सांगितले.

प्रश्न - शहरात किती कार्यालयांमध्ये जनजागृतीचे बोर्ड लावले?
- शहरातील जवळपास ५० टक्के कार्यालयांमध्ये असे बोर्ड आम्ही लावले आहेत. केवळ बोर्ड लावून आम्ही थांबत नाही, तर अन्नाची नासाडी थांबावी यासाठी आम्ही प्रबोधनही करतो. आता औरंगाबादचेच पाहा ना. शहरातील कचºयाचा प्रश्न अद्याप मिटलेला नाही. अनेक ठिकाणी उघड्यावर कचरा पडला आहे. यात कचºयात ६० ते ७० टक्के उरलेले अन्न असते. शहरातील एका उच्चभ्रू वस्तीतून दररोज किमान ३०० चपात्या या कचºयात फेकल्या जातात. दुसरीकडे याच शहरात अनेक जण अन्न मिळत नसल्याने रोज उपाशीपोटी झोपतात. मला हे चित्र बदलायचे आहे.

प्रश्न - बुफे राहूनही अन्न एवढे वाया कसे जाते?
- बुफे पद्धत असली तरी मंगल कार्यालयांमध्ये ९५ टक्के लोक अन्न टाकून देतात. लहान मुलांच्या ताटात अन्न तसेच राहाते. हे थांबायला हवे. शिल्लक राहिलेले अन्न आम्ही नेतो. टाकून दिलेल्या अन्नाचे काय? त्यासाठी जनजागृती केली जात आहे. अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून औरंगाबाद शहरातील जवळपास सर्व मंगल कार्यालयांमध्ये जनजागृतीचे फलक लावले आहेत. आपण ताटात टाकलेले अन्न नंतर गटारात जाते. त्याचे रूपांतर मिथेन वायूमध्ये होते. हा वायू पर्यावरणाला सर्वाधिक घातक आहे. फलकांच्या माध्यमातून असे वेगवेगळे संदेश दिले जातात.

प्रश्न - मंगल कार्यालयांशिवाय आणखी कोठून अन्न जमा करता?
- भंडाºयातही प्रचंड अन्न शिल्लक राहते. अधी शिल्लक राहिलेले हे अन्न वाया जायचे. आता ते आम्ही जमा करतो. यावर्षी गणपतीच्या भंडाºयांमध्ये शिल्लक राहिलेले १५ हजार लोकांचे अन्न आम्ही जमा केले आणि ते गरजूंपर्यंत पोहोचविले. मागच्या वर्षी राजाबाजारमध्ये ३ हजार लोकांसाठी भंडारा होता. अचानक पाऊस सुरू झाला. कोणीच आले नाही. रात्री ११ वाजता मला फोन आला. आम्ही ते अन्न जमा केले आणि दुसºया दिवशी सकाळी रोटी बँकेच्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोहोचविले. बुंदी आणि पुºया खाऊन गरीब खुश झाले.

प्रश्न - आता पुढे काय?
- शासकीय कार्यालयात जनजागृती सुरू आहे. पूर्ण मराठवाड्यात जायचे आहे. एस. टी. स्थानक, रेल्वेस्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय, अशा जवळपास ५० टक्के कार्यालयात बोर्ड लावले आहेत. आता दिवाळीनंतर हॉटेल मालकांची बैठक घेऊन थाळी पद्धतीत प्रत्येक पदार्थाची वेगळी किंमत लावावी, अशी विनंती करणार आहोत. त्यामुळे जेवढे अन्न लागते तेवढेच विकत घेतले जाईल. थाळीमध्ये प्रचंड अन्न असते आणि यातील मोठ्या प्रमाणावर अन्न वाया जाते. स्वच्छ जेवण करणाºयाला काही सूट द्यावी, अशीही विनंती आम्ही त्यांना करणार आहोत. या माध्यमातून अन्नाची नासाडी शून्यावर आणण्याचा प्रयत्न आहे.

प्रश्न - मंगळवारी जागतिक अन्न दिवस आहे. यानिमित्त काय?
- जागतिक अन्न दिवसानिमित्त आम्ही औरंगाबादेत मंगळवारी जनजागृती रॅली काढणार आहोत. प्रत्येक नागरिकाला यासंदर्भात जागृत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशात अशी निघालेली ही पहिलीच रॅली असेल. अन्नाची नासाडी होऊ नये आणि भुकेल्यापोटी कोणी झोपू नये, एवढाच आमचा उद्देश आहे.

Web Title: No one should let go of hunger ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.