'राजा'ला धोका नाही; नरेंद्र-देवेंद्र सरकार कायम राहणार!; भेंडवळ घटमांडणीचं भाकित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 11:11 AM2018-04-19T11:11:49+5:302018-04-19T11:11:49+5:30

राज्यासह देशातील परिस्थिती वर्षभर स्थिर राहण्याचा अंदाज

no danger for pm narendra modi and cm devendra fadnavis government predication from bhendwal | 'राजा'ला धोका नाही; नरेंद्र-देवेंद्र सरकार कायम राहणार!; भेंडवळ घटमांडणीचं भाकित

'राजा'ला धोका नाही; नरेंद्र-देवेंद्र सरकार कायम राहणार!; भेंडवळ घटमांडणीचं भाकित

जळगाव-जामोदः राज्यात भाजपा आणि शिवसेना यांच्यातील दरी दिवसेंदिवस रुंदावत चालली असली आणि तिकडे केंद्रातही रालोआतील मित्रपक्ष मोदी सरकारवर नाराज असले, तरी या दोन्ही सरकारांना कुठलाही धोका संभवत नसल्याचं भाकित सुप्रसिद्ध भेंडवळ मांडणीतून वर्तवण्यात आलंय.

भेंडवळ घटमांडणीमध्ये एका पानावर सुपारी ठेवली जाते. ती सुपारी जर हलली तर 'राजा'ची खुर्ची अस्थिर आहे, असं मानलं जातं. परंतु, यावेळी घटाजवळ ठेवलेली सुपारी जशीच्या तशी होती. त्या आधारेच, राज्यातील आणि देशातील सरकार वर्षभर स्थिर राहील, असं सामाईक पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ यांनी जाहीर केलं.

गेल्या काही काळापासून राज्यातील आणि देशातील राजकारणात बऱ्याच घडामोडी घडताहेत. २०१९ ची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागलीय, तसतशी नवी समीकरणं मांडली जाऊ लागली आहेत. गुजरातमध्ये भाजपाला बसलेला फटका आणि उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत भाजपाच्या गडांना बसलेला हादरा पाहता, रालोआतील मित्रपक्ष वेगळा विचार करू लागल्याचे संकेत मिळत आहेत. चंद्राबाबू नायडू यांनी रालोआची साथ सोडलीय आणि इतरही काही जण सरकारवर नाराज आहेत. विरोधकांनी अविश्वासाचं अस्त्र सोडून मोदी सरकाविरोधात आघाडी उघडलीय आणि तिसऱ्या आघाडीसाठीही हालचाली सुरू झाल्यात.

राज्यातील परिस्थितीही वेगळी नाही. शिवसेना सत्तेत सहभागी असूनही भाजपावर रोजच्या रोज टीकेचे बाण सोडतेय. त्यांनी राजीनामे खिशात असल्याचा इशारा दिला आहेच, पण स्वबळाचीही घोषणा केलीय. गेल्या काही दिवसांत, नाणार प्रकल्पावरून त्यांचे संबंध ताणले गेलेत. 

परंतु, या सगळ्या वातावरणाचा फटका नरेंद्र आणि देवेंद्र सरकारांना बसणार नसल्याचं भेंडवळचं भाकित आहे. ते किती खरं ठरतं, हे पाहावं लागेल.

दरम्यान, येत्या वर्षभरात देशाची आर्थिक भरभराट होणार असून पाऊसपाणीही उत्तम राहील, तसंच शत्रूंची कारस्थानं उधळून लावण्यात संरक्षण यंत्रणा यशस्वी ठरेल, पर्यायाने देश सुरक्षित राहील, असाही भेंडवळ मांडणीचा निष्कर्ष आहे. 

अशी होते घटमांडणी

अक्षयतृतीयेला संध्याकाळी पुंजाजी महाराज, सारंगधर महाराज आपल्या अनुयायांसह चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत नियोजित शेतात येतात. त्या ठिकाणी मातीचे गोल घट करून घटाच्या मधोमध खड्डा करतात यामध्ये पावसाळ्याच्या चार महिन्याचे प्रतिक म्हणून चार मातीची ढेकळे ठेवतात त्यावर घागर ठेवण्यात येते. या घागरीवर पापड, पुरी, सांडोळी, कुरडी, करंजी, भजा आणि वडा अशा प्रतिकात्मक खाद्यपदार्थांची मांडणी केली जाते. तर खड्डयात घागरीचे बाजूला राजा व त्याची गादी म्हणजे पान सुपारी ठेवली जाते. मातीच्या घटामध्ये गोलाकार पद्धतीने अंबाडी, गहू, ज्वारी, बाजरी, कपासी, हिवाळी मुंग, उडीद, करडी, तांदुळ, जवस, तीळ, मसूर, हरभरा, वाटाणा, भादली इत्यादी १८ प्रकारच्या धान्याची मांडणी करतात.

धान्य आणि खाद्य पदार्थांचा वापर करून या घटमांडणीतून झालेल्या बदलाचे दुसर्‍या दिवशी पहाटे अतिशय सूक्ष्म पद्धतीने अवलोकन केले जाते आणि त्यावरून भाकिते वर्तविली जातात. मगच शेतकरी पेरणीची दिशा ठरवतो. 

३०० वर्षांपूर्वी हवामान खाते, पाऊस पाण्याविषयी माहिती देणारी कुठलीही सुविधा उपलब्ध नसताना भेंडवळमधील वाघ वंशाचे पूर्वज चंद्रभान महाराज यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शक ठरलेल्या भेंडवळ घटमांडणीची सुरुवात केली. ती परंपरा वाघ कुटुंबियांनी आजही जपली आहे.
 

Web Title: no danger for pm narendra modi and cm devendra fadnavis government predication from bhendwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.