२० हजार कोटी खर्चाचा वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्ग तयार करणार- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 05:42 PM2018-01-11T17:42:25+5:302018-01-11T18:36:00+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गापेक्षाही मोठा असा वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्ग २० हजार कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणार असून येत्या ३ महिन्यात भूसंपादन व आवश्यक कामे सुरू होतील, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली.

Nitin Gadkari will build a Vadodara-Mumbai highway for Rs 20 crores expenditure | २० हजार कोटी खर्चाचा वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्ग तयार करणार- नितीन गडकरी

२० हजार कोटी खर्चाचा वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्ग तयार करणार- नितीन गडकरी

Next

ठाणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गापेक्षाही मोठा असा वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्ग २० हजार कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणार असून येत्या ३ महिन्यात भूसंपादन व आवश्यक कामे सुरू होतील, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास होत असल्याने मुंबई महानगर क्षेत्र हे आगामी काळात देशातील महत्त्वाचे ग्रोथ इंजिन बनेल, असा विश्वास व्यक्त केला. वर्सोवा खाडीवर नव्या चौपदरी पुलाचे तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जिल्ह्यातील इतर ७ रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन मुख्यमंत्री त्याचप्रमाणे  केंद्रीय महामार्ग मंत्री यांच्या हस्ते मीरा रोड येथील एस. के. स्टोन मैदान येथे इलेक्ट्रॉनिक नामफलकाची कळ दाबून झाले, यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री( सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण तसेच खासदार चिंतामण वनगा, कपिल पाटील, गोपाळ शेट्टी, आमदार नरेंद्र मेहता, रवींद्र फाटक, हितेंद्र ठाकूर, संजय केळकर, क्षितिज ठाकूर त्याचप्रमाणे महापौर डिंपल मेहता यांचीही उपस्थिती होती.

इथेनॉल, इलेक्ट्रिकवर बसेस धावाव्यात
नितीन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रात येणाऱ्या काळात विकसित वाहतूक आणि दळणवळण यंत्रणा उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली न्हावाशेवा शिवडी, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड सारखे प्रकल्प मार्गी लागतील, असे ते म्हणाले. दोन वर्षांत १० हजार सी प्लेन्स आम्ही आणणार आहेत असे सांगून ते म्हणाले की,  सागरी जेट्टी आणि पोर्ट यांना मंजुऱ्या देण्यात येतील. वसई तसेच विरार भागात लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार असून त्यामुळे जेएनपीटीतील मोठ्या कंटेनर्सच्या वाहतुकीचा त्रास कमी होईल. मीरा भाईंदर तसेच इतर पालिकांनी देखील इथेनॉल, बायो डीझेल, इलेक्ट्रिकवर परिवहन सेवेच्या बसेस चालवाव्यात आणि खर्चात बचत करावी.

नवा खाडी पूल वेळेत पूर्ण करणार- मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे व त्यांच्या खात्याचे देशाच्या परिवर्तनात भरीव योगदान आहे, असे प्रारंभी सांगितले. ते म्हणाले की, प्रस्तावित वर्सोवा नवा खाडी पूल 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत पूर्ण करण्यासाठी मी जिल्हाधिकारी तसेच पोलीस व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तसे निर्देश देत आहे. गेल्या 70 वर्षांत राज्यात 5000 किमीचे रस्ते होते, मात्र नितीनजी मंत्री झाल्यापासून 20 हजार किमी महामार्गाना मंजुरी मिळाली असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, 22 किमीचा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक 4 वर्षांत पूर्ण करणार असून, हा देशातील सर्वात मोठा सागरी सेतू असेल. जलवाहतुकीला प्राधान्य देण्यात येणार आहे. सध्याचा वांद्रे-वरळी सागरी सेतू वर्सोवापर्यंत तसेच पुढे वसई-विरारपर्यंत कसा जाईल आणि या भागातील नागरिकांना देखील दर्जेदार आणि अद्ययावत वाहतूक सुविधा मिळेल याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

१ लाख कोटी रुपयांची कामे सुरू
कुठल्याही देशांत पायाभूत सुविधांमुळे लक्षणीय रोजगार निर्मिती होते, आपल्याकडे देखील या पायाभूत सुविधा ज्या झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे याठिकाणी देखील मोठा रोजगार निर्माण होणार आहे. पाणी, जमीन, वायू आणि पाताळ अशा सर्वच ठिकाणी १ लाख कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली आहेत. यामुळे एक एकात्मिक वाहतूक प्रणाली निर्माण होऊन मुंबई तसेच महानगर प्रदेशातील सर्व उपनगरांना त्याचा फायदा होईल. २०११ पर्यंतच्या रहिवाशांना आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे देत असून मध्यमवर्गीयांना परवडणारी घरे देत आहोत, असे ते म्हणाले.

प्रारंभी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात नितीन गडकरी यांच्या पूर्वीच्या कारकिर्दीत ५५ उड्डाण पूल, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग सारखे मोठे प्रकल्प जलद गतीने पूर्ण झाल्याचा उल्लेख केला. समृद्धी महामार्गामुळे देखील मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे असे ते म्हणाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, आज एकाच दिवशी ३ हजार कोटी रुपयांच्या कामांची पायाभरणी होत आहे. महाराष्ट्रात २२००० किमीचे रस्ते बंधण्यात येत असून, त्यासाठी १ लाख ६ हजार कोटी रुपये केंद्र सरकार  महाराष्ट्राला देत आहे असे ते म्हणाले. २२ राष्ट्रीय महामार्ग आणि १० राज्य मार्ग यांचे लवकरच चौपदरीकरण होत आहे अशी माहिती त्यांनी दिली.  आमदार नरेंद्र मेहता, महापौर  डिंपल मेहता यांचीही याप्रसंगी भाषणे झाली. 

प्रस्तावित पुलाची माहिती
कंत्राटदार विजय मिस्त्री आणि एन. जी. प्रोजेक्ट्सतर्फे या २.२५ किमी पुलाचे काम करण्यात येणार असून यासाठी २४७ कोटी खर्च अपेक्षित आहे. सुमारे १८ महिन्यांत हा चार पदरी पूल तयार होणे अपेक्षित आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये जुन्या वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीसाठी हा पूल वाहतुकीस काही प्रमाणात बंद ठेवण्यात आला होता. हा पूल १९६६ च्या दरम्यान बांधण्यात आला होता. सीआरझेड आणि इतर आवश्यक परवानग्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून मिळाल्यानंतर पुलाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली.    

Web Title: Nitin Gadkari will build a Vadodara-Mumbai highway for Rs 20 crores expenditure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.