मुंबई - काँग्रेस सोडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राज्य मंत्रिमंडळातील प्रवेशाबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. मात्र पुढच्या काही दिवसांतच मंत्रिपदाची शपथ घेईन असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. 
एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नारायण राणे म्हणाले, "शिवसेना हा एक नंबरचा घाबरट पक्ष आहे.  मी मंत्रिमंडळात प्रवेश केला तरी शिवसेना सत्ता सोडणार नाही." यावेळी नोटाबंदीवरून सुरू असलेल्या आंदोलनावर टीका करताना नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये आता आक्रमकता उरली नसल्याचा टोला लगावला."काँग्रेसने कितीही संघर्ष केला तरी गुजरातमध्ये भाजपाचाच विजय होईल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला.  
नारायण राणॆंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबतची अनिश्चितता अद्याप दूर झालेली नाही. नारायण राणे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर १ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. त्यानंतर या पक्षाची आगामी वाटचाल आपण लवकरच जाहीर करू, अशी भूमिका राणे यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. त्यानंतर भाजपाप्रणीत एनडीएमध्ये आपला पक्ष सामील करण्याची घोषणा केली होती. 
दरम्यान,  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे 'एनडीए'तील स्थान आणि नारायण राणेंचे मंत्रिपद या दोन्ही गोष्टी अजून हवेतच आहेत. त्या जमिनीवर आल्यानंतर आमदार नीतेश राणे यांनी दिलेल्या मैत्रीच्या ऑफरवर चर्चा करु, अशी गुगली भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दोन दिवसांपूर्वी टाकली होती. 
भाजपचा एक सदस्य असताना नारायण राणे यांनी त्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद दिले होते. आता भाजपचे सहा सदस्य आहेत. त्यामुळे भाजपने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाशी मैत्री केली तर जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेची पदे मिळू शकतील, अशी खुली ऑफर आमदार नीतेश राणे यांनी कणकवलीतील पत्रकार परिषदेत शनिवारी दिली आहे. नीतेश राणेंची ऑफर भाजपा स्वीकारणार का? असे पत्रकारांनी प्रमोद जठार यांना विचारले. त्यावर ते म्हणाले की, स्वाभिमान पक्षाचे 'एनडीए'तील स्थान आणि नारायण राणेंचे  मंत्रीपद ही हवेतील चर्चा आहे. ती जमिनीवर येवू दे. त्यानंतरच त्यांच्या ऑफरवर चर्चा करु. आताच त्याबाबत चर्चा करणे उचित ठरणार नाही, असे जठार यांनी स्पष्ट केले होते.

 तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचे संकेत दिले असले, तरी आठ दिवस थांबा. ईश्वरी संकेत वेगळे आहेत, अशी भविष्यवाणी राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी  आठवड्याभरापूर्वी केली होती. आठ दिवसांत मोठ्या घडामोडी घडतील, अशी पुस्तीही त्यांनी याला जोडली होती.