कोकण रेल्वेमार्गावर नवी दहा स्थानके; इंदापूर ते इनजे मार्गावर रेल्वे धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 05:20 AM2019-01-02T05:20:00+5:302019-01-02T05:20:02+5:30

कोकण रेल्वेमार्गावर दोनच मार्गिका असल्याने सुट्टीच्या वेळी आणि गर्दीच्या काळात जादा गाड्या सोडल्यावर कोकण मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत होते.

 New ten stations on Konkan Railway route; The train will run from Indapur to Inge Road | कोकण रेल्वेमार्गावर नवी दहा स्थानके; इंदापूर ते इनजे मार्गावर रेल्वे धावणार

कोकण रेल्वेमार्गावर नवी दहा स्थानके; इंदापूर ते इनजे मार्गावर रेल्वे धावणार

मुंबई : कोकण रेल्वेमार्गावर दोनच मार्गिका असल्याने सुट्टीच्या वेळी आणि गर्दीच्या काळात जादा गाड्या सोडल्यावर कोकण मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. यावर उपाय म्हणून या वर्षी कोकण रेल्वेमार्गावर आणखी दहा स्थानके निर्माण करण्यात येणार आहेत.
कोकण रेल्वेमार्गावर एकूण ६७ स्थानके आहेत. यात आता १० स्थानकांची भर पडणार आहे. इंदापूर, गोरेगाव रोड, सापे वामाने, कालबनी, कडवई, वेरवली, खारेपाटण, अर्चिणे, मिरजन, इनजे ही १० स्थानके आहेत. याशिवाय कोकण रेल्वे प्रशासन आणखी २१ स्थानके बनविण्याच्या तयारीत आहे.
कोकण रेल्वेमार्गावरील प्रवास सोईस्कर करण्यासाठी विद्युतीकरण, दुहेरीकरण आणि क्रॉसिंग स्थानक (जेथे रूळ एकमेकांना छेदतात) या प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा वेळ वाचवणे, नवीन गाड्या सेवेत घेणे याबरोबरच नवीन स्थानके निर्माण करत कोकण रेल्वे प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
यासाठी क्रॉसिंग स्टेशन ही संकल्पना मांडून क्रॉसिंग स्थानके बनविण्यात येणार आहेत. ही १० स्थानके लवकरच प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
कोकण रेल्वेमार्गावरून माल वाहतुकीच्या गाड्यांची ये-जा मोठ्या प्रमाणात आहे. तसेच इतर गाड्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे क्रॉसिंग स्थानके बनविणे गरजेचे असल्याचे कोकण रेल्वे अधिकाºयांनी सांगितले. या वर्षाच्या डिसेंबरअखेरीपर्यंत रोहा ते वीर दुहेरीकरणाचे काम पूर्ण होणार आहे. तर विद्युतीकरणाचे काम डिसेंबर २०२० मध्ये पूर्ण होणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

यावर्षी सेवेत येणार
कोकण रेल्वेमार्गावर अनेक ठिकाणी रूळ एकमेकांना छेदतात. अशा ठिकाणी दोन लांब पल्ल्याच्या गाड्या एकमेकांना ओलांडून जाऊ शकत नाहीत. दोघांपैकी एका गाडीला थांबविले जाते, एक गाडी पुढे गेल्यानंतर दुसरी गाडी सोडण्यात येते. यामध्ये दोन्ही गाड्यांचा वेळ वाया जातो. प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचण्यास विलंब होतो. वेळेचे गणित योग्य बसण्यासाठी आणि दोन्ही गाड्यांना योग्य मार्ग मिळावा, यासाठी दहा क्रॉसिंग स्थानके बनविण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. क्रॉसिंग स्थानके बनविण्याचे काम जलदगतीने सुरू आहे. या वर्षात ही स्थानके प्रवाशांच्या सेवेत असतील, असे कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी सांगितले.

या प्रकल्पाचा खर्च २०२ कोटी रुपये आहे. कोकण रेल्वेवरील दुहेरी मार्गाची क्षमता वाढविण्यासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा प्रकल्प केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी आहे. या प्रकल्पांतर्गतही २१ नवीन स्थानके बनविण्यात येणार आहेत.

Web Title:  New ten stations on Konkan Railway route; The train will run from Indapur to Inge Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे