राष्ट्रवादी विधानसभेच्या तयारीत तर काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 04:34 AM2019-05-03T04:34:46+5:302019-05-03T06:26:31+5:30

लोकसभा निवडणुकांचे मतदान पार पडताच निकाल जाहीर होण्याची वाट न पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

NCP's Legislative Assembly Initiative, Congress Leadership Change Movement | राष्ट्रवादी विधानसभेच्या तयारीत तर काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या हालचाली

राष्ट्रवादी विधानसभेच्या तयारीत तर काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या हालचाली

googlenewsNext

अतुल कुलकर्णी 

मुंबई : लोकसभा निवडणुकांचे मतदान पार पडताच निकाल जाहीर होण्याची वाट न पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेसमध्ये मात्र विधानसभेसाठी कोणी पुढाकार घ्यायचा यावरच निर्णय होत नसल्याचे समजते.
कोणते मतदारसंघ पक्षाला पूरक आहेत, मित्रपक्षांना कुठे सामावून घ्यावे लागेल, कोणत्या जागांची अदलाबदल गरजेची आहे याची स्थानिक नेत्यांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घ्या, अशा सूचना पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी दिली. काँग्रेसशीही आमच्या चर्चा लवकरच सुरू होतील, असे ते म्हणाले.

दुसरीकडे काँग्रेसमध्ये मात्र लोकसभेच्या निकालानंतर प्रदेशाध्यक्ष बदलेल का, विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळेल, याचीच चर्चा आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा आहे. हर्षवर्धन पाटील यांचेही नाव चर्चेत आहे.
संगमनेर येथे पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ज्याप्रमाणे थोरात यांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढत स्वत: ट्विट केले त्यावरून त्यांनी पक्षात योग्य तो संदेश दिला आहे. पक्षश्रेष्ठी एखाद्या जिल्ह्यात मुक्काम करतात तेव्हा त्यांच्यासह प्रदेशाध्यक्ष किंवा पक्षाचे प्रभारी यांच्यापैकी एक असतो. मात्र संगमनेरात दोघेही नव्हते.

विधानसभेसाठी कोणी पुढाकार घ्यायचा यावर श्रेष्ठींनी संकेत दिलेले नाहीत. निकालानंतर पक्ष पातळीवर बदल होतील, त्यानंतरच पुढील सूत्रे हलतील, असे एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले. दुष्काळाचा विषय असो की अन्य कोणता, आम्हाला अमूक ठिकाणी जा, पाहणी करा, अशा सूचना अद्याप कोणी दिलेल्या नाहीत, असेही ते म्हणाले. निर्णय उशिरा घेण्याने झालेले नुकसान माहिती असूनही निर्णय होत नाहीत, अशी खंतही व्यक्त केली. राधाकृष्ण विखे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असला तरी अद्याप विधानसभा अध्यक्षांकडे तो पोहोचलाच नाही, मग तो राजीनामा कसा, अशी टिप्पणीही त्या नेत्याने केली.

विखेंची अवस्था इकडे आड तिकडे विहीर
विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर झाली आहे. त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याविषयी पक्षातले आमदार, मंत्री नाखूश आहेत. हे जर पक्षात आले तर जिल्ह्यातील आमचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशा तक्रारी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या आहेत. काँग्रेसनेदेखील त्यांचे परतीचे मार्ग बंद करून टाकले आहेत. 

Web Title: NCP's Legislative Assembly Initiative, Congress Leadership Change Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.