ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. 21 -  येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना अतिआत्मविश्वास नडल्याने या पक्षाला समाधानकारक यश मिळू शकले नाही. शिवाय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी परभणीच्या प्रचाराकडे केलेले दुर्लक्ष राष्ट्रवादीच्या अंगलट आले आहे. 
परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ नगरसेवक काँग्रेसमध्ये गेले होते. पक्षात झालेली ही पडझड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाने मिळविलेल्या विजयानंतर काहीशी थांबली होती. जि.प. मध्ये मिळविलेल्या यशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अतिआत्मविश्वास निर्माण झाला. त्याचा पक्षाला या निवडणुकीत फटका बसल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत ६३ जागांवर उमेदवार उभे केले होते़ पक्षाने अनेक उमेदवारांची निवड मुलाखतीपूर्वीच केली होती़ शिवाय निवडणुकीची तयारीही गेल्या दोन महिन्यांपासून सुरू केली होती़ परंतु, पक्षाच्या अनेक उमेदवारांना केलेल्या तयारीचे विजयात रुपांतर करता आले नाही़  शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचाराची रणनिती आखताना शहरी भागाचा विचार केला नाही़ गेल्या पाच वर्षांपासून महानगरपालिकेत पक्षाकडे महापौरपद असताना केलेल्या कामांची माहिती प्रचार सभांमधून मांडता आली नाही़ याउलट पाणीपुरवठा योजने गडबड झाल्याचा विरोधकांनी केलेला आरोप पूर्णपणे या पक्षाला खोडून काढता आला नाही़ शिवाय प्रसारमाध्यमांपासूनही राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अलिप्त राहिला़ त्यामुळे राष्ट्रवादीने केलेल्या कामांची बाजु जनतेसमोर येऊ शकली नाही़ 
वरिष्ठ नेत्यांचे दुर्लक्ष भोवले
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्याबाहेरील एकाही नेत्याची जाहीर सभा शहरात झाली नाही़ माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या जाहीर सभा होणार असल्याची केवळ चर्चाच झाली़ शेवटपर्यंत या पक्षाचा एकही नेता शहरात आला नाही़ याचाही फटका या पक्षाला बसला़ शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी, आ़ विजय भांबळे, आ़ मधुसूदन केंद्रे यांनी प्रचारासाठी मेहनत घेतली़ परंतु, वेळ निघून गेली होती़ परिणामी त्यांच्या प्रचाराचा फारसा पक्षाला फायदा झाला नाही़