Naxalites clash with Naxals, Congrats, Cong | नक्षलवाद्यांना कंठस्नान: पोलिसांचे केंद्राकडून अभिनंदन, मोडकळीस आलेल्या नक्षल चळवळीला हादरा 

नागपूर : पोलिसांनी सात जहाल नक्षलवाद्यांना घातलेले कंठस्नान मोडकळीस आलेल्या नक्षल चळवळीसाठी मोठा हादरा आहे. पोलिसांच्या या प्रशंसनीय कामगिरीची राज्य आणि केंद्र सरकारने दखल घेतली. या कारवाईबद्दल गडचिरोली पोलीस, सी-६० आणि नक्षलविरोधी अभियानाचे सरकारने अभिनंदन केले आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असून, गडचिरोली-गोंदिया जिल्ह्यात पोलीस यंत्रणा घेत असलेल्या अनेक वर्षांपासूनच्या परिश्रमाचे हे फलित आहे, असे मत राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) सतीश माथूर यांनी गुरुवारी नागपुरात नोंदवले. 

पोलीस उपायुक्त परिमंडळ २ च्या नवनिर्मित वास्तूचे उद्घाटन पोलीस महासंचालक माथूर यांनी गुरुवारी सायंकाळी केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे, नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख शरद शेलार, अतिरिक्त आयुक्त श्यामराव दिघावकर उपस्थित होते. 

नक्षलवादाची समस्या केवळ एका नव्हे तर देशातील अनेक राज्यात आहे. त्यामुळेच आंतरराज्य पोलीस समन्वय समितीच्या माध्यमातून या समस्येवर प्रभावी तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. गडचिरोली-गोंदियाच्या नक्षलवादाचे मूळ त्या भागातील विकासात दिसून येते. आता चांगला विकास होऊ लागल्याने या भागातील नक्षलवाद संपुष्टात येत आहे. नागरिकांना नक्षलवाद्यांच्या फोलपणाचा प्रत्यय येत आहे. त्यामुळे नक्षल सप्ताहाला आता नागरिकच विरोध करीत आहेत. या भागात नक्षल चळवळीला घरघर लागल्यामुळे काही तरी उपद्रव करून नक्षल चळवळ जिवंत असल्याचे दाखविण्याचे केविलवाणे प्रयत्न नक्षलवादी करतात. बुधवारी पोलिसांनी ३६ लाखांचे बक्षीस असलेल्या सात जहाल नक्षल्यांना कंठस्नान घालून, नक्षल चळवळीचे कंबरडे मोडल्याचेही ते म्हणाले. या कामगिरीबद्दल राज्य आणि केंद्र सरकारने पोलिसांचे कौतुक केल्यामुळे आमचे मनोबल आणखी उचावले, असेही ते म्हणाले.

नक्षलग्रस्त भागाचा विकास आणि त्याअनुषंगाने मिळणाºया निधीबाबत आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वीच मिळालेल्या ५० कोटींचा निधी रस्ते आणि पुलांच्या बांधकामासह अन्य विकास कामाकडे वळविण्यात आल्याचे माथूर म्हणाले. फ्रंटल आॅर्गनायझेशनवरील कारवाईसंदर्भाने उत्तर देताना ते म्हणाले की, कायद्यातील तरतुदीनुसार सर्वप्रकारची कारवाई करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.   

गडचिरोली-गोंदियात नक्षल्यांसोबत चकमक झाल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या जवानांना नागपुरात उपचारासाठी आणले जाते. त्यांच्यासाठी गडचिरोलीतच सर्व सुविधायुक्त रुग्णालय का उभारले जात नाही, असा प्रश्न उपस्थित झाला असता, तसा निर्णय विचाराधीन असल्याचे माथुर म्हणाले. तेथील बेरोजगारांना पोलीस दलात सामावून घेण्यासाठीही आवश्यक ते प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

सांगलीची घटना वाईटच 

सांगली जिल्ह्यातील कस्टडी डेथ पोलिसांसाठी लाजिरवाणीच बाब आहे. मात्र, यात पोलीस आरोपी आहे म्हणून त्यांना दयामाया दाखविली जात नाही. त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे, असा खुलासा डीजीपी माथुर यांनी केला. या संबंधाने वरिष्ठांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला असता माथुर म्हणाले, वरिष्ठांचीही चौकशी सुरू आहे. प्रथमदर्शनी त्यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे लक्षात आले आहे. मात्र, गुन्हे अण्वेषण विभागाकडून या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे.

अधिवेशन बंदोबस्त 

हिवाळी अधिवेशन पुढ्यात आहे, काही धमकी किंवा धोका आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला असता त्यांनी तसे काहीही नाही, असे म्हटले. आयुक्तांकडे बोट दाखवत त्यांनी तसे काही असले तरी आम्ही सक्षम असल्याचीही मिश्किल प्रतिक्रिया दिली. अधिवेशन बंदोबस्तात यंदा नागपूर बाहेरून दरवर्षीच्या तुलनेत कमी पोलीस मनुष्यबळ बोलविले जाणार आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी गरजेनुसार पोलीस आयुक्त बोलवून घेतील, असे सूचक वक्तव्य केले. फोर्स वन नुसती परेडपुरती मर्यादित झाली आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी त्याबाबत बोलण्याचे टाळले.


Web Title: Naxalites clash with Naxals, Congrats, Cong
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.