भाजपच्या डावपेचाने राष्ट्रवादीच्या प. महाराष्ट्रातील गडाला धक्का!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 05:54 AM2019-05-25T05:54:04+5:302019-05-25T05:54:17+5:30

- वसंत भोसले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या गडाला भारतीय जनता पक्षाच्या डावपेचाने जोरदार धक्का देत जवळपास उद्ध्वस्त ...

Nationalist Congress Party Pushing the fort in Maharashtra! | भाजपच्या डावपेचाने राष्ट्रवादीच्या प. महाराष्ट्रातील गडाला धक्का!

भाजपच्या डावपेचाने राष्ट्रवादीच्या प. महाराष्ट्रातील गडाला धक्का!

Next

- वसंत भोसले
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या गडाला भारतीय जनता पक्षाच्या डावपेचाने जोरदार धक्का देत जवळपास उद्ध्वस्त केला आहे. राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घातलेल्या उमेदवारीच्या घोळाने त्यात भर पडली आहे. भाजप-शिवसेना युतीने या गडावर आता वर्चस्व स्थापन केले आहे.


पश्चिम महाराष्ट्रात पुण्यासह दहा लोकसभा मतदारसंघ आहेत आणि विधानसभेच्या ५८ जागा आहेत. या सर्वांवर नेहमीच सहकारी चळवळीच्या जोरावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे वर्चस्व होते. भाजप आणि शिवसेना युतीने या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न अनेकवेळा केला. त्याला आता पूर्ण यश आले नसले तरी हा गड हादरला आहे.


२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने अनुक्रमे सहा आणि चार जागा लढविल्या होत्या. मोदी लाटेत काँग्रेस सर्व जागांवर पराभूत झाली; मात्र राष्ट्रवादीने बारामती, कोल्हापूर, सातारा आणि माढा या चार जागा जिंकून आपले आव्हान अबाधित ठेवले होते. या निवडणुकीत स्वाभिमानी संघटनेला घेण्यात आले. काँग्रेसने दोन, राष्ट्रवादीने सहा आणि स्वाभिमानी संघटनेने दोन जागा लढविल्या. त्यापैकी केवळ तीन जागा राष्ट्रवादीला मिळाल्या. उर्वरित सर्व जागांवर तीनही पक्ष पराभूत झाले. पश्चिम महाराष्ट्रातून काँग्रेस पुन्हा एकदम हद्दपार झाली. यांच्या आघाडीत आलेल्या स्वाभिमानीलाही धक्का बसला व दहा वर्षे खासदार असलेले राजू शेट्टी यांनाही पराभव चाखावा लागला.


दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचा घोळ, उमेदवार ठरविताना केलेल्या कुरघोड्यांनी कार्यकर्ते हैराण होते. कॉँग्रेसने पुणे, सांगली व सोलापूरच्या जागा लढविण्याचा आग्रह धरला. सांगलीत उमेदवारच शेवटपर्यंत ठरला नाही. ती जागा स्वाभिमानीला देण्यात आली. सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी निश्चित होती. पुण्यातही कॉँग्रेसने शेवटच्या क्षणी उमेदवार निश्चित केला.
राष्ट्रवादी कॉँग्रेसनेही माढा, मावळ, सातारा, कोल्हापूर या मतदारसंघांत उमेदवार निश्चित करताना घोळ घातले. अंतर्गत गटबाजीने स्वत: शरद पवार बेजार झाले होते. मावळमधून अजितदादा पवार यांचे चिरंजीव पार्थ पवारसाठी आग्रह झाल्याने पवार कुटुंबीयात तणाव निर्माण झाला. परिणामी माढ्यातून स्वत: पवार यांना माघार घ्यावी लागली.


सातारामधून उदयनराजे यांना स्थानिक आमदारांचा विरोध होता. तो क्षमविण्यात पवारांची शक्ती खर्ची पडली. या पार्श्वभूमीवर भाजपचे विशेष लक्ष होते. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे जबाबदारी दिली होती. त्यांनी बारामतीतून दौंडचे आमदार सुभाष कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली. माढ्यातून सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पक्षात ओढून उमेदवारी दिली. सोलापूरला मठातील स्वामींनाच आणून उभे केले. शिवसेनेने साताऱ्यात भाजपात गेलेले राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील यांना, तर राजू शेट्टी यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांना उभे करून जातीचे गणित खेळले. सांगलीत काँग्रेसला अडचण निर्माण केल्याने राष्ट्रवादीनेही जागा ऐनवेळी स्वाभिमानीला देण्याचे ठरले. त्यांना उमेदवार नव्हता. वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनाच उमेदवारी द्यावी लागली.


पवार कुटुंबीयातील दुसरा पराभव
पश्चिम महाराष्ट्रावर वर्चस्व असणाºया शरद पवार यांच्या घराण्यातील दोन उमेदवार सुप्रिया सुळे (बारामती) आणि पार्थ पवार (मावळ) या निवडणुकीत उभे होते. पार्थ यांचा पराभव झाला. पवार कुटुंबीयातील चौथ्या पिढीचे पार्थ पवार हे प्रतिनिधी होते. हा पवार कुटुंबीयांचा दुसरा पराभव आहे. शरद पवार यांच्या मातोश्री शारदाबाई पवार यांनी लोकल बोर्डाची निवडणूक जिंकली होती. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी निवडणुका लढविल्या आणि कधी हार पत्करली नाही. शरद पवार यांचे मोठे बंधू वसंतराव गोविंदराव पवार यांनी १९६० मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून शेकापकडून पोटनिवडणूक लढविली होती. सत्यशोधक चळवळीचे नेते केशवराव जेधे यांच्या निधनामुळे ही निवडणूक ९ फेब्रुवारी १९६० रोजी झाली. जेधे यांचे चिरंजीव काँग्रेसचे उमेदवार गुलाब जेधे यांनी त्यांचा पराभव केला होता. चार पिढ्यांमध्ये तो पहिला आणि पार्थ पवार यांचा दुसरा पराभव होय.

Web Title: Nationalist Congress Party Pushing the fort in Maharashtra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.