ठळक मुद्दे नाशिक शहरात चांगला प्रतिसाद किरकोळ दगडफेकीचे प्रकारअफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

नाशिक : पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर करण्यात आलेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्षांनी बुधवारी पुकारेलेल्या बंदला नाशिक शहरात चांगला प्रतिसाद मिळाला़ शहरातील विहितगाव तसेच परिसरात किरकोळ दगडफेकीचे प्रकार वगळता सर्वत्र शांतता असून सुमारे ९० टक्के व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत़ दरम्यान शहरातील विविध भागातील नागरिक डॉ़बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जमा झाले होते़ तर शहरातील विविध ठिकाणी संघटना परिसरात रॅली काढून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच पोलीस निरीक्षकांना देत होते़

कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास वडाळानाका परिसरात काही समाजकंटकांनी बसची तोडफोड केल्याची घटना घडली होती़ तर बुधवारी सकाळपासून शहरासह नाशिकरोड, सिडको, सातपूर, भगूर, देवळाली कॅम्प, पंचवटी अशा सर्वच ठिकाणी नागरिकांनी एकत्र येऊन तीव्र घोषणाबाजी करीत दुकाने बंद करण्याचे आवाहन केले़ विहितगाव येथे दोन गटात दंगल होऊन एक युवक जखमी झाला असून त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़

नाशिकरोड, भगूर, देवळाली कॅम्प, सातपूर पंचवटी, शालीमार ,मेनरोड, सीबीएस या भागात कडकडीत बंद ठेवण्यात आला असून शालिमार ते सीबीएस हा मार्गही पोलिसांनी बॅरीकेडींग टाकून बंद केला़ पेठरोड तसेच फुलेनगर परिसरातील नागरिकांनी पंचवटी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निरीक्षकांना निवेदन दिले़ सातपूर औद्योगिक परिसरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला तर हुल्लडबाजी करणा-या काही युवकांना पोलिसांनी उपनगर परिसरातून ताब्यात घेतले आहे़ शहरातील दवाखाने व मेडीकल दुकाने केवळ उघडी असून महामंडळाच्या सर्व बसेसही आगारात उभ्या आहेत़

सीबीएसजवळील शिवाजी रोडवर असलेल्या डॉ़बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ नागरिक जमा झाले होते़ या ठिकाणी झालेल्या सभेत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून गुन्हेगारांवर कडक कारवाईची मागणी केली़ दरम्यान, शहरात अनुचित घटना घडू नये यासाठी शहर पोलीस आयुक्तालयातील वरीष्ठ पोलीस अधिकाºयांसह सुमारे दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ पोलिसांनी सोशल मीडीयावर अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच शांततेचे आवाहन केले आहे़


Web Title: nashik,city,bhima,koragaon,morcha,
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.