नाणारसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 05:44 AM2018-07-14T05:44:09+5:302018-07-14T05:44:25+5:30

मी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर या रिफायनरीच्या उपयुक्ततेबाबतचे सादरीकरण करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.

Nanar : Chief Minister  To meet Uddhav Thackeray | नाणारसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार

नाणारसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार

googlenewsNext

विशेष प्रतिनिधी
नागपूर - रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरीसाठी कलम ३२/१ नुसार भूसंपादन करण्यासंदर्भातील नोटीस ही उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा करूनच काढली होती. त्यांनी सादरीकरणही पाहिले. आता त्यांच्याशी बोललो म्हणजे भागेल असे वाटले होते पण आता मी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर या रिफायनरीच्या उपयुक्ततेबाबतचे सादरीकरण करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. तथापि, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी एकवटत प्रकल्प रद्द करण्याची जोरदार मागणी करीत गदारोळ केला. या गदारोळात कामकाज तीनवेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नाणारविषयी निवेदनाद्वारे सरकारची बाजू मांडली. मुख्यमंत्री म्हणाले की प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांसमोरही प्रकल्पाबाबत सादरीकरण केले जाईल. स्थानिक नागरिक, संस्था, संघटनांना विश्वासात घेऊनच नाणार निर्णय घेऊ. प्रकल्प लादणार नाही. प्रकल्पासाठी सुरुवातीला स्थानिकांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. सहमतीदेखील झालेली होती. विरोध केवळ भूसंपादन दराबाबत होता. नंतर एनजीओ सक्रिय झाल्या. पर्यावरणाच्या मुद्यावरून विरोध सुरू झाला. त्यानंतर शिवसेनेकडून विरोध सुरू झाला.
या प्रकल्पामुळे पर्यावरणावर कुठलाही दुष्परिणाम होणार नाही. आंबा वा इतर फळबागा उद्ध्वस्त होणार नाहीत. तीन लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पाने राज्याची अर्थव्यवस्थाच बदलेल. प्रकल्पाच्या एक-तृतियांश जमिनीवर फक्त हिरवळच असेल. या प्रकल्पासाठी गुजरात, आंध्र प्रदेशही उत्सुक होते. मात्र, केंद्राने महाराष्ट्राला पसंती दिली.
समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा आधी विरोध होता पण आम्ही त्यांना प्रकल्पाचे महत्त्व समजून सांगितले. त्यांनी पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे नाणारबाबतही त्यांच्याशी चर्चा करू, असे मुख्यमंत्री म्हणाले.

अभूतपूर्व गोंधळ, कामकाज ठप्प

मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर समाधान न झालेल्या शिवसेना व विरोधी पक्ष सदस्यांनी नाणारविरुद्ध घोषणाबाजी सुरु केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाणारवरून सरकार अल्पमतात आले आहे. भाजपाचे १२३ सदस्य वगळता कुणाचाही प्रकल्पाला पाठिंबा नाही, असा हल्लाबोल केला. नाणार राहणार की जाणार एवढेच सांगा, असे राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले. शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी कोकण उद्ध्वस्त करणारा हा प्रकल्प शिवसेना कदापि होऊ देणार नाही, असे ठणकावले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाने प्रश्न प्रतिष्ठेचा न करता प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी केली. गोंधळामुळे कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले आणि नंतर गोंधळातच आटोपण्यात आले.

Web Title: Nanar : Chief Minister  To meet Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.