लोकप्रतिनिधी दहशतीखाली!, प्रकरणांच्या नावाखाली वेठीला धरण्याचा प्रयत्न सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 03:21 AM2017-09-22T03:21:47+5:302017-09-22T03:21:49+5:30

आधीचे परमार प्रकरण असो किंवा आता इक्बाल कासकरच्या धमकीचा विषय असो, त्यांचा आधार घेत सर्वच नगरसेवकांवर कारवाईची, दवाबाची टांगती तलवार ठेवण्याचे राजकारण सुरू झाल्याने ठाण्याच्या नगरसेवकांत अस्वस्थता आहे.

In the name of the cases, the people tried to take the trouble | लोकप्रतिनिधी दहशतीखाली!, प्रकरणांच्या नावाखाली वेठीला धरण्याचा प्रयत्न सुरू

लोकप्रतिनिधी दहशतीखाली!, प्रकरणांच्या नावाखाली वेठीला धरण्याचा प्रयत्न सुरू

Next

ठाणे : आधीचे परमार प्रकरण असो किंवा आता इक्बाल कासकरच्या धमकीचा विषय असो, त्यांचा आधार घेत सर्वच नगरसेवकांवर कारवाईची, दवाबाची टांगती तलवार ठेवण्याचे राजकारण सुरू झाल्याने ठाण्याच्या नगरसेवकांत अस्वस्थता आहे. या प्रकरणांच्या आधारे सतत संशयाचे वातावरण निर्माण करून दहशतीखाली ठेवण्याचे, बोलणाºया नगरसेवकांना अंकूश लावण्याचे प्रकार वाढू लागल्याने काम करायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
परमार प्रकरणात चार लोकप्रतिनिधींवर कारवाई झाली, पण प्राप्तिकर खात्याच्या डायरीत नावे आहेत, असे सांगत अन्य काही नगरसेवक, लोकप्रतिनिधींवर दीर्घकाळ दबाव आणला गेला. त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही; पण या दहशतीखाली काही दबंग नगरसेवकांची कोंडी करण्यात आली.
या प्रकरणावर कोणी महासभेत भाष्य केले; तर पोलीस त्यांच्यावर वॉच ठेवून आहेत, ते नेमके काय वक्तव्य करतात याकडे पोलिसांचे लक्ष आहे, असे वरिष्ठ अधिकाºयांनीच तेव्हा जाहीर केल्याने या प्रकरणाबद्दल वेगळे मत मांडणारेही धास्तावले. त्यामुळे सरकारी यंत्रणा सांगतील तसेच वागायचे, त्यांच्या कारवाईविरोधात ब्र काढायचा नाही, त्यांच्या चुका दाखवून द्यायच्या नाहीत अशी दडपशाही सुरू आहे का, असा प्रश्न नगरसेवक खाजगीत विचारत आहेत.
पालिका निवडणूक काळातही काही नगरसेवकांवर, नेत्यांवर पोलिसांमार्फत दबाव आणल्याचे आरोप झाले. जे बधले नाहीत त्यांना कुंडल्या काढण्याच्या धमक्या देण्यात आल्या. त्यातून पक्षप्रवेश घडवले गेले, असाही आरोप तेव्हा झाला. त्यातूनही दीर्घकाळ पोलिसी कारवाईची दहशत होती, असे राजकीय नेत्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
पालिकेच्या कारभाराबद्दलही काही बोलल्यास कामे अडवून ठेवली जातात. सभागृहात फार आवाज उठवला, तर नंतर त्या नगरसेवकाला वेगळे बोलावून घेतले जाते. तुमची कुंडली आमच्या हाती आहे, असे सांगून एक तर दबाव आणला जातो किंवा निधी, मंजूर झालेली कामे अडवून ठेवली जातात. याबाबत प्रसारमाध्यमांकडे भाष्य केले तर तो नगरसेवक काळ््या यादीत जातो. शिवाय त्या प्रसारमाध्यमाच्याही कोंडीचा प्रयत्न केला जातो, अशी चर्चा पालिका वर्तुळात उघडउघड सुरू आहे.
पालिका आणि पोलिसांच्या या युतीमुळे अनेक नगरसेवक प्रचंड अस्वस्थ असल्यानेच काही प्रकरणांबाबत थेट कोर्टात जाण्याची भाषा सुरू झाली आहे. अधिकृत असलेल्या काही वास्तुंवर नोटिसा न देता कारवाई झाली, पण अनधिकृत असलेल्या वास्तू मात्र नोटिसा देऊन ‘संरक्षित करण्याचा’ घाट घातला गेल्याने त्याचे पडसाद महासभेत उमटले आणि त्याविरोधात आवाज उठवल्याने पालिकेला नमते घ्यावे लागले. ते पाहता ही मुस्कटदाबी आता असह्य होऊ लागली असून तिला नगरसेवकांकडून जाहीर विरोध होऊ लागला आहे.
सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी याविरोधात आक्रमक झाले असून आर-पारच्या लढाईच्या तयारीत आहेत. पालिका आणि पोलिसांकडे आमच्या कुंडल्या तयार असतील; तर आमच्याकडेही त्यांच्या कुंडल्या असू शकतात हे त्यांनी विसरू नये, असा इशारा देण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याने नजिकच्या काळात ठाण्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा या लोकशाहीच्या दोन स्तंभांमधील संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
>पुरावे असतील, तर अटक करा!
एखाद्या लोकप्रतिनिधीविरोधात पुरावे असतील तर त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करा. तो दोषी आहे की नाही ते कोर्टात सिद्ध होऊ द्या, अशी नगरसेवकांची भूमिका आहे. पण उगाचच नगरसेवकांचा गुन्हेगारांशी संबंध आहे, त्याबाबत पुरावे आहेत असे आरोप पत्रकार परिषदेत करायचे, त्याबाबत गाठीभेटी घ्यायच्या; पण काहीच करायचे नाही, या वृत्तीमुळे सर्वच नगरसेवकांबद्दल संशय निर्माण होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जर पुरावे असतील तर नावे जाहीर का केली जात नाहीत, असाही त्यांचा सवाल आहे.
लोकशाहीवर घाला : पालिका किंवा पोलिसांच्या कारवाईवर मत मांडायचे नाही का, असा लोकप्रतिनिधीचा सवाल आहे. सभागृहात एखादा लोकप्रतिनिधी काही भूमिका घेत अनेकांच्या वतीने बोलतो. त्यांच्या या वक्तव्यावर पाळत ठेवली जाणार असेल, त्याबद्दल त्याला नंतर बोलावून घेतले जाणार असेल; तर हा लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्याचा, त्यावर घाला घालण्याचा प्रयत्न आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. असे जर पुन्हा घडत गेले तर यापुढील काळात आम्ही सभागृहात आक्रमकपणे प्रशासकीय गैरव्यवहारावर भाष्य करू, असा पवित्रा त्यांनी घेतला.


अधिकाºयांची चमकोगिरी
ठाण्यातील काही अधिकाºयांनी कारवाई करताना दबंगगिरीचा वापर करून आपली ‘इमेज’ तयार करण्याचा प्रयत्न केला. त्या अधिकाºयांकडे जी जबाबदारी व्यवस्थेने दिली आहे, तिचा आढावा घेतला तर प्रत्यक्षात त्यांचा परफॉर्मन्स खूप वाईट आहे. पण त्यातील काहींना मुंबईत जाण्याचे वेध लागल्याने सध्या त्यांची चमकोगिरी सुरू असल्याची टीका नगरसेवक करत आहेत. आम्ही जर नेमकी वेळ साधून यांची प्रकरणे बाहेर काढली; तर त्यांना हवे असलेले पोस्टिंग रद्द होऊ शकते. त्यांनी सतत आमच्यावर दबाव टाकू नये, असा इशाराही त्यांनी खाजगीत बोलताना दिला.

 

Web Title: In the name of the cases, the people tried to take the trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.