नागराज मंजुळे यांची पत्नी करतेय धुणी-भांडी करून उदरनिर्वाह...

By Admin | Published: May 13, 2016 03:34 AM2016-05-13T03:34:24+5:302016-05-13T03:34:24+5:30

पडत्या काळात कष्ट करून साथ दिली; मात्र ज्यांच्यामुळे यश मिळाले त्यांनाच नागराज मंजुळे यांनी दूर लोटले, अशी कैफियत नागनाथ मंजुळे यांच्या पत्नी सुनीता यांनी व्यक्त केली आहे.

Nagraj Manjule's wife is doing dhoti-pots and livelihood ... | नागराज मंजुळे यांची पत्नी करतेय धुणी-भांडी करून उदरनिर्वाह...

नागराज मंजुळे यांची पत्नी करतेय धुणी-भांडी करून उदरनिर्वाह...

googlenewsNext

पिंपरी : पडत्या काळात कष्ट करून साथ दिली; मात्र ज्यांच्यामुळे यश मिळाले त्यांनाच नागराज मंजुळे यांनी दूर लोटले, अशी कैफियत नागनाथ मंजुळे यांच्या पत्नी सुनीता यांनी व्यक्त केली आहे. सध्या चिंचवड येथील रामनगर झोपडपट्टीत वडिलांच्या घरी राहत असून, धुणी-भांडी करून उदरनिर्वाह करीत आहे. मला बाकी काही नको. केवळ पत्नी म्हणून त्यांनी पुन्हा नांदवावे, असे सुनीता यांचे मागणे आहे. याबाबत नागनाथ मंजुळे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
चिंचवड येथील रामनगर झोपडपट्टीतील राहत्या घरी ‘लोकमत’शी बोलताना सुनीता म्हणाल्या, ‘‘१९९७मध्ये नागराज यांच्याबरोबर विवाह झाला. विवाहानंतरही त्यांचे शिक्षण सुरू होते. मला शिकायचे आहे, काही अपेक्षा बाळगू नको, मूलही नको, असे सांगून त्यांनी माझ्याबरोबर १५ वर्षे काढली. नागराज, भारत, शेषराज, भूषण ही चार भावंडे. त्यातील शेषराज, भूषण अगदी छोटे. त्यांना आईच्या मायेने वाढवले. शिक्षण झाले, यश मिळत गेले, तशी त्यांची माझ्याबरोबर वागण्याची पद्धत बदलली. पत्नीचा दर्जा न देता, तू अल्पशिक्षित आहेस, तुझ्या आई-वडिलांकडे जा, असे म्हणू लागले. त्यांचे वडील मला मुलीसारखे सांभाळायचे. त्यांचे २००७ मध्ये निधन झाले. त्यानंतर नागराज यांच्याकडून वाईट वागणूक मिळू लागली. २०११ मध्ये त्यांच्या ‘पिस्तुल्या’ या लघुपटाला राष्ट्रपती पारितोषिक मिळाले. त्या वेळी मला एकटीला घरात सोडून, ते पुरस्कार घेण्यास गेले. ही गोष्ट माझ्या मनाला क्लेशदायक होती. पत्नी म्हणून ज्या घरात आले, त्या घरात मोलकरणीची वागणूक माझ्या वाट्याला आली. पत्नीचा दर्जा कधीच मिळाला नाही. इतकी वर्षे मी त्यांच्याकडे नांदले. सारे काही सोसले. बिकट परिस्थितीत साथ दिली. आता त्यांनी मला पत्नी म्हणून स्वीकारावे, एवढीही अपेक्षा मी का बाळगू नये? चार वर्षांपासून मी रामनगरला आई-वडिलांकडे राहत आहे. धुणी-भांडी अशी कामे करून जगत आहे. आई-वडील आता वृद्धापकाळाचे जीवन जगत आहेत. त्यांची साथ किती दिवस मिळणार, त्यानंतर पुढे काय, असा प्रश्न मला सतावत आहे.
घरची परिस्थिती बिकट असताना पडत्या काळात अर्धांगिनी म्हणून साथ दिली. कसलीही अपेक्षा बाळगली नाही. हालअपेष्टा सोसल्या. त्यांनी मोठे व्हावे, यश मिळवावे, यासाठी मनाला, इच्छा-आकांक्षांना मुरड घातली. ज्यांनी जिवाचे रान केले, त्यांचाच विसर नावलौकिक मिळविलेल्या नागराज मंजुळे यांना पडला आहे. त्यांच्या सैराट चित्रपटाने प्रदर्शनानंतर अवघ्या दोन आठवड्यांत ४० कोटींच्या उत्पन्नाचा टप्पा ओलांडला. त्यातील काही तरी मिळावे, ही अपेक्षा नाही, तर ज्यांचा खऱ्या अर्थाने त्यांच्या यशात वाटा आहे, त्यांनाच यशाच्या शिखरावर आरूढ झाल्यानंतर दूर लोटावे, हे मनाला क्लेषदायक वाटते, अशी कैफियत त्यांनी मांडली.
> सैराट चित्रपटाला मिळालेल्या उदंड
प्रतिसादामुळे नागराज मंजुळे यांचे नाव चर्चेत आहे. दूरचित्रवाहिन्यांवरील मुलाखती आणि अन्य कार्यक्रमात ते जेव्हा मनोगत व्यक्त करतात, त्या वेळी यशात कोणाचा वाटा आहे, हे सांगताना त्यांना माझ्याबद्दल काहीच सांगावेसे वाटत नाही. नागराज मंजुळे या नावाला जेव्हा काहीच वलय नव्हते, तेव्हा त्यांना ज्यांनी साथ दिली. त्यांच्याबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करू शकत नाहीत, याबद्दल खेद वाटतो. - सुनीता मंजुळे
> नवऱ्याने सोडले, आम्ही कसे टाकणार?
नागराज मंजुळे यांनी सुनीताला घराबाहेर काढले. आई, वडील या नात्याने आम्हाला तिला सांभाळण्याची वेळ आली. चार मुली; त्यातील सुनीता ही दुसऱ्या क्रमांकाची मुलगी. तिचा विवाह नागराज मंजुळे यांच्याबरोबर लावून दिला. सोलापूरला जेऊरला ती गेली. पुढे तिच्या आयुष्यात असे काही घडेल, असे वाटले नव्हते. नागराज यांनी कृतघ्नता दाखवली. समाजात दाखवायचा चेहरा एक आणि प्रत्यक्ष वागणूक वेगळीच याचा प्रत्यय आला. उशिरा का होईना, जाणीव व्हावी, एवढीच अपेक्षा आहे.
- हरिश्चंद्र लष्करे, (सुनीताचे वडील)

Web Title: Nagraj Manjule's wife is doing dhoti-pots and livelihood ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.