ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नाभिक संघटना आक्रमक झालेली पाहायला मिळते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाविषयी  काढलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर नाभिक संघटनांनी वेगवेगळ्या प्रकारे निषेध केला होता.

बुलडाणा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नाभिक संघटना आक्रमक झालेली पाहायला मिळते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाविषयी  काढलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर नाभिक संघटनांनी वेगवेगळ्या प्रकारे निषेध केला होता. मात्र आता महाराष्ट्र नाभिक महामंडळाकडून राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आज बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाची राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली.

या बैठकीत नाभिक संघटनेने मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. नाभिक समाज 2 डिसेंबर रोजी राज्यभर रास्ता रोको आंदोलन करणार आहे. तर  हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे 13 डिसेंबर रोजी 11 हजार जण मुंडन करुन, केस मुख्यमंत्र्यांना भेट देणार आहेत. त्याचबरोबर, शुक्रवारपासून मुख्यमंत्री ज्या ज्या कार्यक्रमात जातील, तिथे तिथे नाभिक समजाकडून काळे झेंडे दाखवले जाणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ?
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथे भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कारभारावर टीका करताना ‘एक न्हावी चार-पाच गिऱ्हाईकांची‌ अर्धी-अर्धी हजामत करतो आणि त्यांना बसवून ठेवतो’, असं उदाहरण दिलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा निषेध केला जातो आहे.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली दिलगिरी
भाषणात दिलेल्या उदाहरणामुळे अनावधानाने नाभिक समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली. आघाडी सरकारच्या कामाचं स्वरूप सांगताना अगदी अनावधानाने एक उदाहरण दिलं. तसं उदाहरण देण्यामागे समाजाच्या भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नव्हता, असं मुख्यमंत्र्यांनी नाभिक महामंडळाचे उपाध्यक्ष सुधीर उर्फ बंडू राऊत यांना पाठविलेल्या पत्रात म्हटलं.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.