ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 17 -  एका कार्यक्रमात नाचताना झालेल्या भांडणात तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना नालासोपारा येथील मोरेगावात घडली आहे. रविवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.  विनय डिचवलकर (वय 21 वर्ष ) असे मृत तरुणाचे नाव आहे. मोरेगावात रविवारी एका कार्यक्रमात डीजेवर नाचताना अश्लील नाच केल्यावरून योगेश सविनकर आणि मनोज सुर्वे यांच्यात हाणामारी झाली. हा वाद मिटवण्यात आला होता. 
 
पण रात्री 11.30 वाजता वाजता योगेश आणि नरेंद्र शर्मा हे दोघं आपल्या सात-आठ साथीदारांसह पुन्हा आले आणि त्यांनी मनोजला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी विनय डिचवलकरनं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. हा मध्यस्थीचा प्रयत्न त्याच्या जीवावर बेतला.
 
यावेळी संतापलेल्या योगेशने विनयला पाठीमागून पकडून ठेवलं व नरेंद्र शर्माला चाकू वार करण्यास सांगितले. नरेंद्रने विनयच्या छातीवर चाकूने सपासप वार केले. यात जखमी झालेल्या विनयचा जागीच मृत्यू झाला. या हाणामारीत पाच जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.  तुळींज पोलिसांनी योगेश, नरेंद्र आणि त्यांच्या 8 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
 
आणखी बातम्या वाचा