घाटकोपर विमान दुर्घटना : कथा ‘त्या’ बलिदानाची...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 01:02 AM2019-06-28T01:02:54+5:302019-06-28T01:03:14+5:30

बरोबर वर्षापूर्वी म्हणजे २८ जून २०१८ रोजी घाटकोपर पश्चिममधील जीवदया लेनमध्ये भरवस्तीत एक चार्टर विमान कोसळले. त्या विमानाच्या वैमानिकांनी मृत्यू समोर दिसत असताना प्रसंगावधान राखून आपल्या प्राणांचे बलिदान देऊन हजारोंचे प्राण वाचवले.

Mumbai Plane Crash : The Story 'That' Sacrifice ... | घाटकोपर विमान दुर्घटना : कथा ‘त्या’ बलिदानाची...

घाटकोपर विमान दुर्घटना : कथा ‘त्या’ बलिदानाची...

googlenewsNext

- प्रा. अरुण सु. पाटील

बरोबर वर्षापूर्वी म्हणजे २८ जून २०१८ रोजी घाटकोपर पश्चिममधील जीवदया लेनमध्ये भरवस्तीत एक चार्टर विमान कोसळले. त्या विमानाच्या वैमानिकांनी मृत्यू समोर दिसत असताना प्रसंगावधान राखून आपल्या प्राणांचे बलिदान देऊन हजारोंचे प्राण वाचवले. या अपघातासाठी नेमलेल्या चौकशी समितीचे जे काही निष्कर्ष येतील, त्याची अंमलबजावणी होईल का, हा वेगळा मुद्दा आहे. पण अशा दुर्घटनांतून सर्वसामान्यांचा जीव जाऊ नये आणि कोणाला बलिदान द्यायची वेळ येऊ नये, हीच अपेक्षा.

टकोपर पश्चिमेला २८ जून २०१८ रोजी जीवदया लेनमध्ये आमच्या घराच्या अगदी जवळच म्हणजे चार इमारतींपलीकडे भरवस्तीत १ वाजून १८ मिनिटांनी एक चार्टर विमान कोसळले. त्या घटनेचा आज प्रथम स्मरण दिन. त्यात दोन वैमानिक, दोन तंत्रज्ञ तसेच एक पदपथी जागेवरच मरण पावले. आम्ही वाचलो, ही परमेश्वराची कृपा! काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, हेच खरे!

पण, बहुधा दोन्ही वैमानिकांनी प्रसंगावधान राखून कौशल्याने ते विमान बांधकाम चालू असलेल्या रिकाम्या जागी वळवले असावे. त्यामुळे आजूबाजूच्या शाळा, कॉलेज व उंच निवासी इमारतींवर विमान कोसळून अपरिमित जीवितहानी त्यांनी टाळली. त्या भीषण दुर्घटनेला वर्ष झाले. पण, अजूनही नुसता मनात विचार आला तरी काळजाचा ठोका चुकतो.

या विमान अपघाताबद्दलची संपूर्ण माहिती त्यावेळी दूरदर्शनवर व वर्तमानपत्रांत आपण वाचली, ऐकलेली आहे. काय घडले, यापेक्षा जे झाले ते टाळणे शक्य होते का? हे पाहणे व काळ सोकावता कामा नये, हे पाहणे महत्त्वाचे! कसे घडले? का घडले? म्हणजे चूक कोणाची होती? हे निश्चित करण्यासाठी एअरक्र ाफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोतर्फे चौकशी करण्यासाठी त्यासंबंधातील उपकरणे, ब्लॅक बॉक्स वगैरे त्यांनी ताब्यात घेतले होते. या चौकशीतून त्याची उत्तरे मिळायला हवीत.

मुख्यमंत्री यांनीही घटनास्थळाला भेट देऊन नागरी वस्तीतल्या या अपघाताबद्दल चिंता व्यक्त करून अपघाताला जबाबदार असणाऱ्यांचा कसून शोध घेतला जाईल, असे सांगितले होते. पण, आजही अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात आहेत. त्यांचा थोडक्यात परामर्श घेऊ या.

१) विमानाबद्दल- मुंबई पोलीस व नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या माहितीनुसार हे विमान पूर्वी उत्तर प्रदेश शासनाच्या ताब्यात होते. परंतु, अलाहाबादेत एक मोठा अपघात झाल्यानंतर उत्तर प्रदेश शासनाने ते विमान २०१४ साली ‘यू आय एव्हिएशन’ या खाजगी विमान कंपनीला विकले. प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यापूर्वी २८ जून २०१८ ला दुपारी १२.१५ वाजता ते विमान चाचणीसाठी जुहू विमानतळावरून निघाले. चाचणी पूर्ण होऊन विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच ते दुपारी १.१८ वाजता नागरी वस्तीत कोसळले. यासंदर्भात,

अ) पहिला मुद्दा - या विमानाला अलाहाबादेत मोठा अपघात झाल्यावर उत्तर प्रदेश सरकारने ते का विकले? असा प्रश्न उद्भवतो. शक्यता अशी आहे की, या अपघातामुळे ते विमान जवळजवळ निकामी झाल्याने उत्तर प्रदेश सरकारने ते विकले असावे. असे मोडकळीस आलेले भंगार विमान पुन्हा नागरी वाहतुकीसाठी वापरू नये व केवळ भंगार म्हणूनच त्याचा उपयोग व्हावा, अशी अट उत्तर प्रदेश सरकारने घालणे आवश्यक होते. तशी अट घातलीही असेल, कदाचित! पण... त्यातील हा ‘पण’ महत्त्वाचा! कारण, यात आर्थिक हितसंबंधही गुंतलेले असू शकतात. जबाबदार असणारी व्यवस्थाच अशी बेपर्वाईने वागत असेल, तर खाजगी कंपनीवाल्यांना कोणत्या तोंडाने बोलणार?

ब) दुसरा मुद्दा - विमान विकत घेतल्यावर जवळजवळ साडेतीन ते चार वर्षांनी त्याची चाचणी घेतली. म्हणजेच, एवढे वर्ष ते विमान सडत पडले होते. आधीच अपघातग्रस्त! त्यात हा विलंब. मृतप्राय झालेल्या माणसावर थातूरमातूर उपचार करून तो चालायला लागेल, याची वाट पाहण्यासारखे हे आहे. अशा विमानाची नागरी वाहतूक करण्यासाठी चाचणी करण्याची परवानगी तरी कुठल्या संस्थेने आणि का दिली?

क) तिसरा मुद्दा - विमानाची चाचणी नागरी वस्तीवर करण्याची परवानगी का देण्यात आली? विमानात बिघाड होता म्हणूनच दुरुस्ती केल्यावर त्याची चाचणी करायची होती. म्हणजेच, ते नादुरुस्त होऊन पडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. असे असतानाही अशा विमानाच्या चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आणि तीही नागरी वस्तीवर! खरं म्हणजे, जुहू विमानतळाजवळच समुद्र आहे आणि किमान अशा चाचण्या घेण्यासाठी समुद्राजवळ विमानतळ उभारून चाचणी समुद्रावर का होत नाही? किमान मनुष्यहानी तरी टळेल.

२) विमान अपघाताच्या चौकशीबद्दल - कुठल्याही अपघाताच्या चौकशीत आपल्याकडे राजकीय, आर्थिक, सामाजिक हितसंबंध गुंतलेले असतात. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. पैशांच्या जोरावर न्याय विकत घेणारे धनदांडगे आणि सत्तेच्या जोरावर हस्तक्षेप करणारे राजकीय पुढारी, यामुळे चौकशी नि:पक्षपातीपणे होईलच, याची खात्री देता येत नाही.

३) चौकशीच्या निष्कर्षांबद्दल - या घटनेला आज एक वर्ष झाले, तरीही चौकशी अहवाल सादर झाल्याचे काहीही ऐकिवात नाही. अहवाल सादर झाला असल्यास या चौकशी समितीचे जे काही निष्कर्ष असतील, सूचना असतील, त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल का? यात आर्थिक, राजकीय हस्तक्षेप होणारच नाही, याचा काय भरवसा? कारण, अनेक चौकशी समित्यांचे अहवाल येतात, धूळखात पडतात आणि काही दिवसांनी लोकही ते विसरून जातात. निदान, या बाबतीत तरी असे काही होऊ नये. अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊन सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळ मांडला जाऊ नये!

या दुर्दैवी घटनेत वैमानिकांनी ज्या शौर्याने आणि प्रसंगावधान राखून मोठा अपघात आणि मनुष्यहानी टाळण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्याला तोड नाही. स्वत:चे प्राण जात असतानाही दुसऱ्यांच्या प्राणांचे भान ठेवणे, याहून धैर्याची गोष्ट ती कोणती? सोपे नाही ते!

या अपघातासंबंधी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल लवकरात लवकर यावा. चौकशी समितीच्या निष्कर्षांची, सुचवलेल्या सुधारणांची काटेकोर अंमलबजावणीसुद्धा व्हावी, ही रास्त अपेक्षा ! आणि हीच त्या शूर वैमानिकांना खरी श्रद्धांजली ठरेल.
प्रणाम तुज वैमानिका!
कौशल्य तव दिसले जगा
भरवस्ती विमान उतरविले
पाहून तू रिकामी जागा,
प्राण देऊनि प्राण रक्षिले
शूरवीर तू जीवदा खरी
संसार तुझा मोडलास तू
काय म्हणावे वीर नारी!
देवदूत तू आम्हा नक्की
निधड्या छातीची तू पक्की
यमदूता अडविले हाती एका
प्रणाम तुज वैमानिका!
arunspatil16@gmail.com

Web Title: Mumbai Plane Crash : The Story 'That' Sacrifice ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.