Meeting between Vishwajeet Kadam and Raj thackeray | विश्वजीत कदम-राज ठाकरे यांच्यात गुफ्तगू, बंद खोलीत पंधरा मिनिटे चर्चा

सांगली : महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम यांनी रविवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. वीस मिनिटे चाललेल्या या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. 

राज ठाकरे शनिवारीच एका कार्यक्रमानिमित्त सांगलीत आले होते. रविवारी सकाळी ते विश्रामबाग परिसरातील हॉटेलमधून थेट भारती हॉस्पिटलमध्ये गेले. त्याठिकाणी विश्वजीत कदम यांनी त्यांचे स्वागत केले. बाळा नांदगावकर व अन्य मनसे पदाधिका-यांसोबत ठाकरे त्याठिकाणी उपस्थित झाले. हॉस्पिटलच्याच एका प्रशस्त केबिनमध्ये ते विराजमान झाले. कदम यांनी सर्वांनाच बाहेर जाण्यची विनंती केली. त्यानंतर केबिनचे दरवाजे बंद करण्यात आले. मनसेच्या प्रमुख पदाधिका-यांनाही बाहेर थांबावे लागले. त्यानंतर वीस मिनिटे ठाकरे व कदम यांच्यात चर्चा झाली. ही चर्चा राजकीय होती की मैत्रीपूर्ण होती, याबाबत कोणताही तपशिल समजू शकला नाही, मात्र लगेचच जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात या वृत्ताने चर्चेला उधाण आणले. वीस मिनिटानंतर दरवाजे उघडल्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे हसतमुखाने पुन्हा भेटण्याच्या आश्वासनाने निरोप घेतले. 

एका लोकसभा निवडणुकीत पतंगराव कदम आणि त्यांच्या भारती विद्यापीठावर राज ठाकरे यांनी जाहीर सभेत टीका केली होती. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून कटुता होती. असे असताना ठाकरे व कदम यांची भेट अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. या बैठकीची चर्चा आता सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.