मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 02:48 AM2018-08-22T02:48:18+5:302018-08-22T02:48:43+5:30

नांदेड जिल्ह्यात पुरात चौघे वाहून गेले; भंडाऱ्यात छत कोसळून दाम्पत्यासह चिमुकलीचा मृत्यू

Marathwada, Vidarbha highway | मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टी

मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टी

Next

पुणे/मुंबई : गेल्या चार दिवसांपासून राज्यात सर्वदूर मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. मराठवाड्यासह विदर्भातील गडचिरोली, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीने हजारो हेक्टरवरील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात नांदेडला सर्वाधिक फटका बसला असून जिल्ह्यात ठिकठिकाणी आलेल्या पुरात चार जण वाहून गेले आहेत. तर भंडाºयात राजेदहेगाव येथे घराचे छत कोसळून दाम्पत्यासह चिमुकलीचा मृत्यू झाला.
मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीच्या पुराचे पाणी अनेक शेतशिवारांत शिरल्याने खरीपाचे मोठे नुकसान झाले आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील अनेक गावांचा संपर्क तुटला. औरंगाबाद शहरासह मराठवाड्याच्या उर्वरित भागांत भिजपाऊस सुरु आहे.
नांदेड जिल्ह्यात सकाळी आठपर्यंत सरासरी ८०़३५ मि़मी़ पावसाची नोंद झाली़ विष्णूपुरी, बळेगाव, आमदुरा या प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले होते. 
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यात १३ गावांचा संपर्क तुटला असून यापैकी सहा गावांमधील शिवारांमध्ये पुराचे पाणी शिरले. औंढा तालुक्यातील तीन तर हिंगोली तालुक्यातील सहा गावांच्या शिवारांत पाणी घुसल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.
परभणी जिल्ह्यातील ७ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. १३ गावांचा संपर्क तुटला आहे. गोदावरी, पूर्णा, दुधना, थुना या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

१ लाख १८ हजार हेक्टरचे नुकसान
पुणे : विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्याने सुमारे १ लाख १८ हजार हेक्टर शेती क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी क्षेत्राने व्यक्त केला आहे. मात्र, पंचनामे करण्याचे काम सुरू असून, बाधित क्षेत्रात सुमारे दोन ते अडीच लाख हेक्टरपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ७२ हजार हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले असून, विदर्भात यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि जळगाव जिल्ह्यांतील पिकांचेही नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यातही विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, काही ठिकाणी जीवित व वित्तहानी झाली आहे. त्याचप्रमाणे नदी व ओढ्याकाठच्या गावांना त्याचा मोठा फटका बसला आहे. विदर्भ व मराठवाड्यात कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, भात आदी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. त्यामुळे अनेक शेतकºयांची भात व सोयाबीन पिके प्रभावित झाली आहेत.
विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असली तरी सर्व पिकांना पुराच्या पाण्याचा फटका बसला नाही. तर केवळ ओढे व नदी काठच्या जमिनीमध्ये पाणी शिरल्याने कापूस व सोयाबिन यांसारख्या पिकांचे नुकसान झाले आहे. 

चार जण वाहून गेले
नांदेड जिल्ह्यात चौघे जण वाहून गेले. बहिणीच्या घरी मावंदाचे जेवण करून तवेरा जीपने परतत असताना मांजरम गावानजीकच्या पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने जीप वाहून गेली. गंगाराम मारोती दिवटे (वय ४०), त्यांची पत्नी पारुबाई (३५) आणि मुलगी अनूसया(६, सर्व रा. बरबडा, ता. नायगाव) अशी मृतांची नावे आहेत. तर मांजरम (ता. नायगाव) येथील तरुण शेतकरी विनायक बालाजी गायकवाड यांचा पुरात बुडून मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यात शेवाळ्यानजीक पूर पाहायला आलेले आठ जण पुराच्या पाण्याने वेढल्याने अडकले होते. मात्र ग्रामस्थांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले.

विदर्भातही धो... धो पाऊस />विदर्भात यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून सुमारे ७५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यवतमाळमध्ये तब्बल ६१ हजार ९३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. पावसाने दिग्रस, आर्णी, उमरखेड आणि दारव्हा तालुक्याला सर्वाधिक तडाखा दिला. चंद्रपूर जिल्ह्यात ११ हजार ७४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा, भामरागड, अहेरी, मुलचेरा या तालुक्यांमध्ये २४ तासात २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला असून, अनेक ठिकाणी शेतजमीन खरडून निघाली. भंडारा जिल्ह्यातही पावसाने धुमाकूळ घातला आहे. राजेदहेगाव येथे छत कोसळून दाम्पत्यासह चिमुकलीचा मृत्यू झाला. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा आहे.

जवानांनी अनेकांना सुखरूप काढले
नागपूर जिल्ह्यात मौदा तालुक्याला फटका बसला आहे. तारसा, बाबदेव, कोराड, धामणगाव, कुंभारी, बोरगाव परिसरात सांड नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर वाहत असून अडकलेल्या अनेकांना जवानांनी बाहेर काढले.

मुंबईकरांची पाऊसकोंडी
मुंबई शहर आणि उपनगरांत सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी दमदार पाऊस झाला. नवी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर होता. ठाणे जिल्ह्यातील भातसा धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. बारवी धारण १०० टक्के भरले असून, पाण्याची पातळी ६८.८८ मीटर झाली आहे. मोडकसागर १०० टक्के, तानसा ९९.८३ टक्के भरले आहे.

शेतकºयांना दिलासा
आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, सोलापूर, सांगली या दहा जिल्ह्यांमध्ये अतिशय कमी पाऊस झाला होता़ त्यातील बहुतांश जिल्ह्यांत चांगला पाऊस झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे़
खान्देशात संततधार खान्देशात जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत संततधार पाऊस झाल्याने पिके तरारली असून, शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Web Title: Marathwada, Vidarbha highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.