राज्यात अनेक ठिकाणी ‘अभद्र’ युतीचा खेळ सुरूच

By यदू जोशी | Published: December 30, 2018 01:10 AM2018-12-30T01:10:49+5:302018-12-30T01:11:20+5:30

नगरच्या युतीला अभद्र म्हटले गेले. मात्र अभद्रपणाचा राजकीय खेळ अनेक ठिकाणी सुरू आहे.

 In many places in the state, 'indecent' | राज्यात अनेक ठिकाणी ‘अभद्र’ युतीचा खेळ सुरूच

राज्यात अनेक ठिकाणी ‘अभद्र’ युतीचा खेळ सुरूच

Next

मुंबई : अहमदनगरमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीवर टीका होत असताना काही जिल्हा परिषदा आणि नगरपालिका, पंचायत समित्यांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र आहेत तर कुठे काँग्रेस-भाजपा-राष्ट्रवादी असे समीकरण आहे. नगरच्या युतीला अभद्र म्हटले गेले. मात्र अभद्रपणाचा राजकीय खेळ अनेक ठिकाणी सुरू आहे.
यवतमाळ जिल्हा परिषदेत काँग्रेस-भाजपा-राष्ट्रवादी अशी युती आहे. तिथे अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद भाजपाकडे आहे. शिवसेनेला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी अन्य तिघे एकत्र आले आहेत. ही युती अभद्र असून ती तोडली पाहिजे, अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यंतरी मांडली होती. तेथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष या माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या गटाच्या आहेत.
ज्या विखे पाटील यांना यवतमाळची युती अभद्र वाटते त्यांच्याच अहमदनगरमधील जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रित आहेत. विखे यांच्या पत्नी शालिनीताई अध्यक्ष आहेत तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आहे. शिवसेनेचा बाहेरून पाठिंबा आहे. अहमदनगर पंचायत समितीमध्ये काँग्रेस-शिवसेना एकत्र आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पंचायत समितीचे सभापतीपद काँग्रेसकडे तर उपसभापतीपद भाजपाकडे आहे. आर्णीचे नगराध्यक्षपद शिवसेनेकडे तर उपाध्यक्षपद हे काँग्रेसकडे आहे.
अमरावती जिल्हा परिषदेत भाजपाला बाजूला ठेवत काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेत एकत्र नांदत आहेत. अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा नगरपालिकेत भाजपा -काँग्रेस- राष्ट्रवादी अशी युती आहे. तेथे सर्वांनी मिळून शिवसेनेला बाजूला ठेवले आहे.
बुलडाणा जिल्हा परिषदेत भाजपा-राष्ट्रवादी अशी युती आहे. त्यात अध्यक्षपद भाजपाकडे असून उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर नगरपालिकेत भाजपा-राष्ट्रवादी एकत्र आहेत.
नंदुरबार नगरपालिकेची निवडणूक काँग्रेस-शिवसेनेने चक्क एकत्र लढविली होती. काँग्रेसचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या पत्नी रत्ना तेथे नगराध्यक्ष आहेत तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे यांच्या आई कालपर्यंत उपनगराध्यक्ष होत्या. आज त्या ठिकाणी उपनगराध्यक्षपदही काँग्रेसला मिळाले आहे.
ुयुतीचा बीड पॅटर्न तर एकदम अनोखा आहे. तिथे राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्यासाठी भाजपा-शिवसेना-काँग्रेस-शिवसंग्राम एकत्र आहेत. अध्यक्षपद भाजपाकडे आहे. परभणीची त-हा आणखीच वेगळी. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी-भाजपाची युती आहे. पंचायत समितीत भाजपा-काँग्रेस सोबत आहेत. परभणीत महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. अशा अनेक स्थानिक आघाड्या आहेत.

मग कारणे दाखवा नोटीस का?
अहमदनगरमध्ये भाजपाला पाठिंबा दिला म्हणून राष्ट्रवादीच्या प्रदेश नेतृत्वाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे पण अन्यत्र राष्ट्रवादी भाजपा वा शिवसेनेसोबत आहे तिथे सत्तेची चव राष्ट्रवादीचे लोक आरामात चाखत आहेत.

Web Title:  In many places in the state, 'indecent'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.