इस मिट्टी में कमल नहीं खिलता.!

By Meghana.dhoke | Published: March 3, 2018 08:07 PM2018-03-03T20:07:03+5:302018-03-03T20:07:03+5:30

31 जुलै 2015 रोजी भारत-बांग्लादेश सीमा करार अमलात आला. रक्ताचा एकही थेंब न सांडता दोन देशांनी शांतपणे आपल्या सीमा आखून घेतल्या.

Lotus blooms in this soil! | इस मिट्टी में कमल नहीं खिलता.!

इस मिट्टी में कमल नहीं खिलता.!

googlenewsNext

साधीशी, सुती, धुवट साडी नेसलेल्या या बाई. पांचाली भट्टाचार्य त्यांचं नाव.
निवृत्त शिक्षिका आहेत. त्रिपुराची राजधानी आगतरळ्यात राहतात. ही त्यांची एक ओळख. आता अजून एक ओळख सांगते..
त्या आहेत मिसेस माणिक सरकार. 15 वर्षे त्रिपुराचे मुख्यमंत्री असलेल्या माणिक सरकार यांच्या पत्नी. त्यांनी ना आपलं आडनाव बदललं, ना मिसेस सरकार म्हणून त्या कधी लाल दिव्याच्या गाडीतून मिरवल्या.
त्यांची ही भेट. 29 जुलै 2015.
31 जुलै 2015 रोजी भारत-बांग्लादेश सीमा करार अमलात आला. रक्ताचा एकही थेंब न सांडता दोन देशांनी शांतपणे आपल्या सीमा आखून घेतल्या. आंतरराष्ट्रीय सीमा बदलतात तेव्हा सीमेवर जगणाऱ्या माणसांचं काय होतं याचा अभ्यास करायचा म्हणून मी त्रिपुराला गेले होते. ( लोकमत दीपोत्सव 2015 मध्ये ‘तारकाटा बेडा’ हा लेखही प्रसिद्ध झाला.) आगरतळ्यात होतेच, तर दैनिक संबांद या वृत्तपत्राच्या कार्यालयात गेले. तिथं वृत्तसंपादक भौमिक भेटले. त्यादिवशी सकाळीच मुख्यमंत्र्यांनाही भेटून आले होते. सकाळी गेले, भेट मागितली. सहज भेट मिळाली. संध्याकाळी 7 ला या असं सचिवांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांना भेटूनच दैनिक संबादच्या कार्यालयात गेले होते. बोलता बोलता विषय निघाला तर भौमिक म्हणाले, ‘बहुदीसे मिले?’ काही कळलं नाही, मग तेच म्हणाले, मिसेस सरकार? आता मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असं कुणालाही कसं भेटतील? 
तर ते म्हणाले, मै फोन लगाता...
बोलणं झालं. त्या या म्हणाल्या. दुसर्‍या दिवशी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री निवासात त्यांना भेटायला गेले. सोबत भौमिक होतेच. गेल्या गेल्या बहुदींनी विचारलं, बेटे को साथ नहीं लाए?
मी उडालेच. मी मुलाला घेऊन आगरतळ्याला आलेय, हे ह्यांना कसं कळलं. 
सहज विचारलं, आपको कैसे मालूम?
त्या म्हणाल्या, कल रात सीएमसे बोला एक मुंबईसे जर्नलिस्ट आयी है, सुबह मिलने आ रही है. तो उन्होने बताया, बॉर्डर स्टडी करने आयी है, छोटा बच्चा है साथ में. कुछ खास बनाना.’
मी स्तब्धच. तेवढ्यात इडली-सांबार-चटणी, बंगाली मिठाई आलीही. बहुदी म्हणाल्या, इधर का खाना अच्छा लगा नहीं होगा, तो मैनेही रात में सोचा आपके लिए इडली बनाए.’
बहुदींनी स्वत: सकाळी उठून इडली केली. मुख्यमंत्री असलेल्या नवर्‍याला ऑफिसला जाताना डबा करुन दिला. मग त्या सगळं किचन आवरुन बसल्या होत्या. बरंच बोलणं झालं, बोलता बोलता सहज म्हणाल्याही, अभी पॉवर है बहौत साल से, तो कुछ लोग उसका गलत इस्तेमाल करते है. ये बुरा लगता है.
तोवर मी ते साधंसं घर पाहत होते. एक बेडरुम. हॉल. किचन. बाकी सगळी पुस्तकं. हे दोघे पतीपत्नी घर म्हणून एवढय़ाच खोल्या वापरतात. मुलबाळ नाही, दोघंच राहतात. सगळंच साधं. मध्यमवर्गीय. म्हणजे त्या साधेपणाची जाणीवही होऊ नये इतकं साधं. बहुदी स्वत: मासे आणायला जातात, कधी लाल दिव्याची गाडी वापरत नाहीत, सिक्युरीटी नाही, रिक्षेतूनच प्रवास. फक्त प्रोटोकॉल असेल तेव्हा मुख्यमंत्र्यासोबत जातात. हे एरव्ही त्रिपुरात अनेकजण सांगतातच.
त्यादिवशी घरी माहेरपणाला आलेल्या लेकीसारखं त्यांनी आगतस्वागत केलं. निघाले तर थेट रस्त्यार्पयत लांब सोडायला आल्या. पुढच्यावेळी लेकाला नक्की घेऊन ये म्हणाल्या.
मात्र आम्ही निघतच होतो, तर बंगल्याच्या आवारातल्या बागेत माळी काम करत होता, बहुदीचं त्याच्याशी बंगालीतून बोलणं सुरु होतं. तळ्यात कमळं कशी फुलत नाही, हे तो माळी सांगत होता. त्यावर मी हसले तर त्या म्हणाल्या, बंगाली समझती हे?
-थोडीसी. मी म्हटलं.
तर त्या हसून म्हणाल्या, कितनी भी कोशीश करलो..इस मिट्टी में कमल नहीं खिलता.!
***
जुलै 2015 ची ही गोष्ट. दिल्लीत मोदी पंतप्रधान होऊन जेमतेम वर्ष झालं होतं. सुनील देवधरही 
नुकतेच त्रिपुरा भाजपचे प्रभारी झाले होते. दुसर्‍या दिवशी देवधर आणि आता मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले बिपलब देबही भेटलेच, तेव्हा तर त्रिपुरात कमळ फुलेल असं काही चित्रही नव्हतं. तीन वर्षात सुनील देवधर नावाच्या मराठी माळ्यानं तिथं कमळ फुलवून दाखवलं, त्रिपुरातल्या मातीचा कस बदलला, हवा पालटली.
ती कशामुळे.?
-त्याविषयी पुढच्या भागात 

Web Title: Lotus blooms in this soil!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.