आरोपीपक्षामुळेच लांबला कोपर्डी खटला; सरकारी पक्षाचा आरोप: अंतिम युक्तिवादाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 07:17 PM2017-10-26T19:17:40+5:302017-10-26T20:01:44+5:30

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून खटल्यात गुरूवारी जिल्हा न्यायालयात अंतिम युक्तिवादाला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी या खटल्यातील विशेष सरकारी वकील अ‍ॅड. निकम यांनी मॅरेथॉन युक्तिवाद करत आरोपींविरोधातील पुराव्यांची जंत्री विषद केली.

Longer Kopardi suit due to the accused question; Official party's charge: the start of the final argument | आरोपीपक्षामुळेच लांबला कोपर्डी खटला; सरकारी पक्षाचा आरोप: अंतिम युक्तिवादाला प्रारंभ

आरोपीपक्षामुळेच लांबला कोपर्डी खटला; सरकारी पक्षाचा आरोप: अंतिम युक्तिवादाला प्रारंभ

Next

अहमदनगर : कोपर्डी अत्याचार व खून खटल्याबाबत काही लोकांकडून न्यायालयाबाहेर प्रश्न उपस्थित करून सुनावणी लांबल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षात मात्र सरकारी पक्षामुळे एकही सुनावणी लांबणीवर पडली नाही. आरोपी पक्षामुळेच आठ ते नऊ वेळा सुनावणी होऊ शकली नाही, असा आरोप विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी केला.
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून खटल्यात गुरूवारी जिल्हा न्यायालयात अंतिम युक्तिवादाला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी या खटल्यातील विशेष सरकारी वकील अ‍ॅड. निकम यांनी मॅरेथॉन युक्तिवाद करत आरोपींविरोधातील पुराव्यांची जंत्री विषद केली. कोपर्डी खटल्याबाबत काही लोकांकडून बाहेर होणा-या वक्तव्याबाबत निकम यांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली. या खटल्याचे जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकारी पक्षाने पाच महिन्यांत ३१ साक्षीदार तपासल्याचे सांगितले.
कोपर्डी येथे १३ जुलै २०१६ रोजी चारी रस्त्यावर आरोपी क्रमांक एक जितेंद्र शिंदे याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला. ही घटना घडण्यापूर्वी तिघा आरोपींनी सदर मुलीवर नजर ठेवली होती. घटनेच्या दोन दिवस आधी पीडित मुलगी व तिची मैत्रीण घरी जात असताना जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांनी त्यांना अडविले होते. शिंदे याने पीडित मुलीचा हात खेचला होता. यावेळी पीडित मुलीने विरोध केला तेव्हा भवाळ व भैलुमे यांनी ‘आपण हिला नंतर कामच दाखवू’ असे सांगितले होते. त्यानंतर भितीमुळे दोन दिवस सदर मुलगी शाळेत गेली नाही. तिघा आरोपींची मुलीवर वाईट नजर होती. यातूनच त्यांनी कट करून हे कृत्य केले. सदर मुलीवर शिंदे याने अत्याचार करून तिचा खून केला त्या दरम्यान आरोपी दोन व तीन हे त्या परिसरातील रस्त्यावरून फिरत होते, असे निकम यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच आरोपीविरोधात सरकारी पक्षाच्यावतीने सादर केलेले साक्षीदार व पुराव्यातून हे कृत्य कसे केले हे सिद्ध होत आहे. मनुष्य खोटे बोलू शकतो मात्र परिस्थिती खोटे बोलत नाही असे सांगत निकम म्हणाले, खुनाच्या घटनेनंतर सदर मुलीस कुळधरण येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिचे शवविच्छेदन केले. या अहवालत किती निर्दयीपणे अत्याचार करून खून केला आहे हे समोर येते़ या घटनाक्रमाला आधार देणारे साक्षीदार आणि त्यांनी दिलेली माहिती यावेळी निकम यांनी विषद केली. खटल्याची शनिवारपर्यंत सलग सुनावणी होणार आहे. निकम यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आरोपी क्रमांक एक, दोन व तीनच्यावतीने युक्तिवाद केला जाणार आहे. गुरूवारी अ‍ॅड. निकम यांच्यासह आरोपी पक्षाचे वकील अ‍ॅड. योहान मकासरे, अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे, अ‍ॅड. प्रकाश आहेर उपस्थित होते.

क्रुरपद्धतीने केला मुलीचा खून

सदर मुलीच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. तिचा मृत्यू हा अनैसर्गिक आहे. अंगवर २६ जखमा, दोन्ही खांदे निखळलेले, दाताने चावा घेतल्याच्या जखमा अशा कृ्ररपद्धतीने मुलीचा खून केल्याचे या अहवालातून स्पष्ट होते. हा वैद्यकीय अहवाल घटनेतील वास्तवता विषद करतो असे यावेळी निकम यांनी आपल्या युक्तीवादात नमूद केले.

युक्तीवादाचे रेकॉर्डिंग

कोपर्डी खटल्याच्या अंतीम युक्तीवादाचे गुरूवारी न्यायालयात अ‍ॅडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. सरकारी व आरोपी पक्षाने मागितले तर त्यांना हे रेकॉर्डिंग उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Web Title: Longer Kopardi suit due to the accused question; Official party's charge: the start of the final argument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.