लोकमत - ‘ती’चा कट्टा : महिला एक दिवस राज्य आणि देशाचे नेतृत्व करतील 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 09:25 PM2018-10-16T21:25:40+5:302018-10-16T21:39:51+5:30

मंगळवारी लोकमतच्या ‘ती’ च्या कट्ट्यावर चर्चा करताना पुणे महापालिकेतील नगरसेविकांनी भविष्यात महिला राज्य आणि देशाचे नेतृत्व करतील असा विश्वास व्यक्त केला.

Lokmat - 'TI' katta : Ladies will one day lead the state and nation | लोकमत - ‘ती’चा कट्टा : महिला एक दिवस राज्य आणि देशाचे नेतृत्व करतील 

लोकमत - ‘ती’चा कट्टा : महिला एक दिवस राज्य आणि देशाचे नेतृत्व करतील 

Next
ठळक मुद्देपन्नास टक्के आरक्षण : पक्ष, प्रशासनाच्या पातळीवर करताहेत स्वत: ला सिध्द महिलांना राजकारणावर प्रभुत्व मिळण्यासाठी थोडा वेळ लागणारअनेकवेळा महिलांना अपेक्षित सहकार्य मिळताना अडचण राजकारणात महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाले ही चांगली गोष्टपन्नास टक्क्यांचा तुलनेत अद्यापही महिलांना मिळणा-या संध्या कमीच महिलांना देखील आपल्या भागाची, प्रश्नाची चांगली जाण असली पाहिजे

पुणे: राजकारणामध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाल्याने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी मिळाली आहे. पुरुषी मानसिकतेचा प्रचंड पगडा असलेल्या राजकारण क्षेत्रात महिलांना कुटुंबापासून,पक्ष, प्रशासन आणि समाजाच्या विविध पातळ्यांवर स्वत: ला सिध्द करावे लागत आहे. मंगळवारी लोकमतच्या ‘ती’ च्या कट्ट्यावर चर्चा करताना पुणे महापालिकेतील नगरसेविकांनी भविष्यात महिला राज्य आणि देशाचे नेतृत्व करतील असा विश्वास व्यक्त केला.
माधुरी सहस्त्रबुध्दे (भाजप नगरसेविका) : पन्नास टक्के आरक्षणामुळे महिलांना राजकारणात संधी तर मिळाली आहे. परंतु, राजकारणावर प्रभुत्व मिळण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे.स्वयंपाक घरातून सभागृहात आलेल्या महिला त्या तुलनेत नगरसेवक पदाला न्याय देऊ शकत नाहीत. त्यातही लहान मुलं असणा-या महिला समोरील आव्हाने वेगळीच असतात. महिला कितीही पुढारल्या, प्रगत झाल्या तरी पहिलं प्राधान्य कुटुंबाला असते. त्यामुळे राजकारणामध्ये महिलांना स्वत: ला सिध्द करण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. माझ्या कुटुंबात सासर आणि माहेर दोन्ही ठिकाणी मला प्रोत्साहन, मोकळीक मिळाली. त्यामुळे मला मिळालेल्या संधीसाठी मी पूर्णपणे प्रयत्न करत आहे.राजकारण हे अद्यापही प्रचंड पुरुष प्रधान असलेले क्षेत्र आहे. त्यामुळे या क्षेत्रात आलेल्या महिलांनी स्वत:ला सिध्द करण्यासाठी स्वप्रेरणेने काम केले पाहिजे. जास्तीत जास्त सुशिक्षित महिलांनी या क्षेत्रात आले पाहिजे. तसेच एकदा निवडणूक झाल्यानंतर सर्व पक्षांच्या महिलांनी एकत्र येऊन वेळप्रसंगी एकमेकींना सहकार्य करून स्वत:चे कर्तृत्व सिध्द केले पाहिजे.सामाजिक कार्याचा अनुभव व प्रशासकीय कामांची माहिती असल्यावर काही अडचण येत नाही.मात्र,एखाद्या विषयाची माहिती नसेल किंवा जान नसेल व नवख्या महिलांना प्रशासनाकडून डावलले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु आता महिलांना संधी मिळाली असून, त्या नक्की स्वत: ला सिध्द करतील.
पल्लवी जावळे (शिवसेना नगरसेविका) :  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या घटनेतच महिलांना आरक्षण देताना खूप मोठा विचार केला आहे. राजकारण असेल किंवा समाजकारण करण्यासाठी महिला आपले सर्वस्व पणाला लावून या क्षेत्रात आल्या आहेत. पन्नास टक्के आरक्षणामुळे अनेक महिलांना राजकारणात येण्याची संधी मिळाली. यामुळे अनेक महिला यामध्ये नवख्या असून, कुटुंब, मुलं-बाळ पाहून त्या सक्षमपणे काम करत आहेत. यामध्ये सुरुवातीला अनेक वेळा राजकारण, प्रशासन, पक्ष पातळीवरील राजकारण समजण्यासाठी त्यांनी भाऊ, पती, वडील, सासरे असे कुणा ना कुणाचा आधार घ्यावा लागतो. परंतु म्हणून ती महिला राजकारण करण्यासाठी सक्षम नाही असे होत नाही.सभागृहामध्ये काही हे लोक येत नाही, तेथे ती स्वत: सक्षमपणे आपल्या मतदार संघातील , नागरिकांचे प्रश्न बिनधास्तपणे मांडत असते. आमच्या पक्षात अनेक ठिकाणी महिलांना प्राधान्य दिले जाते. काही पक्षांकडून महत्वाच्या पदांचे वाटप होताना महिलांना डावलले देखील जाते. महिला स्वत: ला सिध्द करत असून, भविष्यात देशाचे, राज्याचे देखील नेतृत्व त्या करतील. प्रशासनाच्या पातळीवर मदत करण्याची भावना असते. परंतु अनेक वेळा तुमची माहिती कमी पडत असले तर महिलांना अपेक्षित सहकार्य मिळताना अडचण येते. परंतु भविष्यात अनुभावाने महिला नक्कीच स्वत:चे कर्तत्व सिध्द करतील.
लता राजगुरु (काँग्रेस नगरसेविका) : काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेतृत्वच गेल्या अनेक वर्षांपासून महिलांकडे होते. यामुळे आमच्या पक्षात महिलांना नेहमीच विविध पदांसाठी संधी दिली जाते. महिलांना आरक्षण मिळण्यापूर्वी देखील त्या दिल्या जात होत्या. राजकारणात महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाले ही चांगली गोष्ट आहे. राजकारणात महिला समाजाचे प्रतिनिधित्व करत असतात. त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी असते. आरक्षणामुळे संधी मिळते, अनेक वेळा अनुभव लक्षात घेऊन पदे दिली जाते. परंतु, काही वेळा काही ठिकाणी महिलांना डावलले देखील जाते. यासाठी भविष्यात महिलांनी पुढे येऊन स्वत: ला सिध्द केले पाहिजे. पदांचे वाटप होताना आम्ही त्या पदासाठी सक्षम असल्याचे सांगितले पाहिजे. राजकारणामध्ये चांगले काम करण्यासाठी प्रशासनाचे सहकार्य मिळणे खूप आवश्यक असते. गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात असल्याने आता बहुतेक अधिकारी, कर्मचा-या सोबत ओळख झाली आहे. यामुळे एक फोन केला तरी अधिकारी आपले काम करतात. परंतु या साठी वेळ जावा लागते. प्रशासन आणि समाजाच्या, मतदारांच्या पातळीवर तुम्ही यशस्वी झाल्यावर पक्ष तुमच्या कामाची दखल घेतोच.
स्मीता कोंढरे(राष्ट्रवादी काँगे्रस नगरसेविका): आमच्या पक्षाचे नेते शरद पवार यांच्यामुळे खरे तर महिलांना राजकारणात पन्नास टक्के आरक्षण मिळाले आहे. यामुळे आमच्या पक्षात नेहमीच महिलांना विविध पदे, समित्या देताना प्राधान्य दिले जाते. राजकारण, समाजकारण करताना काही अडचणी आल्यानंतर पक्ष नेते नेहमीच सहकार्य करतात. यामुळे अनेक वेळा आरक्षण नसताना देखील आमच्या पक्षात महिलांना महत्वाची पदे दिली गेली पाहिजेत. परंतु पन्नास टक्क्यांचा तुलनेत अद्यापही महिलांना मिळणा-या संध्या कमीच आहेत. त्यामुळे भविष्यात सर्व पक्षांनी महिलांना स्वत: ला सिध्द करण्यासाठी जास्तीत जास्त संधी दिली पाहिजे. महत्वाच्या पदांचे वाटप होताना महिला, पुरुष असा विचार होतो. परंतु आमच्या पक्षात मी प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आली असताना देखील स्थायी समिती सारख्या महत्वाच्या समितीचे सदस्य म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. प्रत्येक विषयांमध्ये महिलांचे मत देखील विचारात घेतले जाते. पन्नास टक्के आरक्षणामुळे महिलांचे महत्व सर्वांनाच समजले आहे. महिला अधिक सक्षम झाल्या तर पक्षासाठी चांगलेच आहे. प्रशासनाच्या पातळीवर अधिकारी चांगले सहकार्य करतात. यासाठी केवळ महिलांना देखील आपल्या भागाची, प्रश्नाची चांगली जाण असली पाहिजे. त्यामुळे महिला मिळालेल्या संधीचे नक्कीच सोनं करतील.

Web Title: Lokmat - 'TI' katta : Ladies will one day lead the state and nation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.