लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; आधुनिक धन्वंतरींचा सन्मान करण्यासाठी मत द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 04:32 PM2018-03-23T16:32:29+5:302018-03-23T18:16:09+5:30

विविध दुर्धर आजारात रुग्णांवर उपचार करुन त्यांना जीवनाची नवी संधी देणाऱ्या या आधुनिक धन्वंतरींचा सन्मान करण्याची संधी आपल्याला लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयरच्या माध्यमातून मिळत आहे.

 Lokmat Maharashtrian of the Year; Vote for honoring modern Dhanwantari | लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; आधुनिक धन्वंतरींचा सन्मान करण्यासाठी मत द्या

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर; आधुनिक धन्वंतरींचा सन्मान करण्यासाठी मत द्या

googlenewsNext

मुंबई- महाराष्ट्रात खेड्यापाड्यांमधून येणाऱ्या तळागाळातील रुग्णांवर उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर्स तनमनधन अर्पून काम करत आहेत. कर्करोग असो वा एपिलेप्सी विविध दुर्धर आजारात रुग्णांवर उपचार करुन त्यांना जीवनाची नवी संधी देणाऱ्या या आधुनिक धन्वंतरींचा सन्मान करण्याची संधी आपल्याला लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयरच्या माध्यमातून मिळत आहे. या विभागातील पुरस्कारासाठी नामांकने आहेत.

डॉ. अब्दुल माजिद, न्यूरॉलॉजिस्ट, औरंगाबाद
डॉ. अब्दुल माजिद हे वैद्यकीय क्षेत्रातले एक प्रसिद्ध नाव. न्युरोलॉजिस्ट, लेखक, उत्तम वक्ता व सामाजिक कार्यकर्ता यांसोबतच एक बहुआयामी व्यक्तिमत्त्वही. वैद्यकीय क्षेत्रात वाटचाल करत असताना त्यांनी गरजुंना सेवा देणे आणि भविष्यात काही गावे दत्तक घेऊन तेथील लोकांना ‘मिरगी’ (एपिलेप्सी) तून मुक्त करणे हे अंतिम ध्येय उराशी बाळगले आहे. त्यांच्या या ध्येयपूर्तीसाठी ते सातत्याने विविध गावांना भेटी देऊन तेथील सामान्य लोकांच्या सान्निध्यात राहतात. मानवतावादाचा संदेश देणाऱ्या या अवलियाचा प्रवास असाच अखंड चालूच राहणार आहे. एका सर्वसामान्य कुटुंबात २० जून १९७० रोजी डॉ. अब्दुल माजिद यांचा जन्म झाला. त्यांचे वडील जलसंधारण विभागात सिव्हील इंजिनियर होते. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात त्यांनी त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यापुढील शिक्षण उदगीर येथे झाले. दहावी आणि बारावीत ते गुणवत्तापात्र विद्यार्थी होते. त्यांनी १९८७ मध्ये औरंगाबादच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) प्रवेश घेतला. एमबीबीएसच्या सलग तीनही वर्षी त्यांनी विद्यापीठात प्रथम क्रमांकावर येण्याचा बहुमान पटकावला. त्यानंतर जीएमसीमध्येच त्यांनी एमडी (जनरल मेडिसीन) साठी प्रवेश घेतला. ते १९९६मध्येही विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांची ऑल इंडिया एंट्रंस एक्झामिनेशन’द्वारे मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये न्यूरोलॉजीतील डीएम कोर्ससाठी निवड झाली. जुलै २००० मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून डीएम परीक्षेत दुसºया क्रमांकावर येण्याचा मान मिळवला. केईएम हॉस्पिटलमध्ये त्यांनी एक वर्ष न्यूरोलॉजीमध्ये प्राध्यापकाचे काम पाहिले. त्यांना परदेशात, महानगरांमध्ये विविध संधी असतानाही ते औरंगाबादमध्ये गरजूंना सेवा देण्यासाठी परतले. ते ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजी (एएएन), इंडियन असोसिएशन ऑफ न्यूरोलॉजी (आयएएन), इंडियन स्ट्रोक असोसिएशन (आयएसए) आणि इंडियन एपिलेप्सी असोसिएशन (आयईए) या संस्थांचे सदस्य आहेत. त्यांच्या विशेष आवडीचे विषय म्हणजे स्ट्रोक, एपिलेप्सी आणि हार्टएक्स हे असून ते प्रथितयशतज्ञ न्यूरोफिजिशिअन म्हणून गेल्या १८ व्या वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहेत. डॉ.अब्दुल माजिद यांनी औरंगाबादच्या ‘अ‍ॅपेक्स ब्रेन क्लिनिक’ मध्ये ओपीडी प्रॅक्टिस सुरू केली. ज्या शहरात न्यूरोफिजिशियन उपलब्ध नाहीत, अशा नांदेड, जालना, बुलढाणा याठिकाणी त्यांनी सेवा देणे सुरू केले. एक प्रामाणिक व पारदर्शी सेवा पुरवणारे डॉक्टर म्हणून त्यांची अल्पावधीतच ख्याती पसरली. मराठवाड्यात एमआरआयची सुरूवात करणारे ते एकमेव ठरले. त्यानंतर त्यांनी न्युरोसर्जन, २ इंटेसिव्हीस्टस आणि एक मॅक्सिलो-फेशियल सर्जन यांच्यासह अ‍ॅपेक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व सोयीसुविधांनी पूर्ण केले. हे १६ बेडसचे हॉस्पिटल भाड्याच्या जागेत होते. पुढील दोनच वर्षांत येथे ५० बेड्सची सुविधा उपलब्ध झाली. डॉ.अब्दुल माजिद आणि त्यांची टीम ‘एकत्र आपण जिंकू’ या ध्येयाने प्रेरित रूग्णांना अत्यंत माफक दरात व विशेष काळजी घेऊन सुविधा पुरवितात. सहा वर्षांपूर्वी हॉस्पिटल १०० बेड्सचे झाले. येथे एकाच छताखाली सीटी स्कॅन, एमआरआय, कॅथ लॅब, इलेक्ट्रोफिजिओलॉजी लॅब, ओटी व न्युरो आयसीयू यांची व्यवस्था आहे. हॉस्पिटलमधील डॉक्टर्सची टीम ही अत्यंत प्रामाणिक आहे. रोज ते ओपीडीतील १०० ते १५० रूग्णांना तपासतात. आत्तापर्यंत त्यांनी ५ लाखांपर्यंत कंसल्टेशन केलेले आहेत. त्यांचा साधेपणा आणि मराठीवरील प्रभुत्व यांच्यामुळे त्यांनी त्यांच्या रूग्णांमध्ये स्वत:ची एक चांगली प्रतिमा निर्माण केली आहे. ‘नो फिक्स्ड रेट’ या एका संकल्पनेवर ओपीडी असून, यामुळे गरीब रूग्णांना न्यूरोलॉजी कंसन्टेशनचा फायदा होतो. ‘न्यूरोलॉजी’ आणि जनरल प्रॅक्टिशनर्ससाठी ‘ह्युमॅनिटी’बाबत जनजागृतीपर कार्यक्रमही ते करतात. शहरी भागात ते न्यूरोलॉजीमधील सीएमई यांचे रेग्युलर सेशन्स घेतात. लिखाण व पर्यटन हे त्यांचे छंद आहेत. मराठी आणि ऊर्दुमध्ये त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत. त्यांचा कवितासंग्रह आणि लघुकथांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते आस्था फाऊंडेशनमध्ये सक्रिय आहेत. काही गावे दत्तक घेऊन त्यांना मिरगी (एपिलेप्सी) मुक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
डॉ. अब्दुल माजिद यांना मत देण्यासाठी - http://lmoty.lokmat.com/vote.php

डॉ. अनंत ल. जोशी, ऑर्थोपेडिक सर्जन, मेडिस्पोर्ट्स 
क्लिनिक, सयानी रोड परळ, मुंबई कोणताही खेळ असो, खेळाडूला कधी ना कधी, कुठे तरी इजा होतेच. कधी हात वा पाय मुरगाळतो, पाठीला, मानेला दुखापत होते. अशा वेळी इतक्या वेदना होतात की, खेळणे तर सोडाच, पण उभे राहणेही खेळाडूंना अशक्य होते. अशा वेळी ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाणे, त्याच्याकडून उपचार करून घेणे, हाच मार्ग असतो. गेल्या काही वर्षांत स्पोर्ट्स मेडिसिन ही ऑर्थोपेडिकची शाखाच बनली आहे. भारतात ती सुरू करण्याचे श्रेय प्रामुख्याने डॉ. अनंत जोशी यांना दिले जाते. एकूणच क्रीडा विज्ञानातील त्यांची झेप थक्क करणारी आहे. वैद्यकीय व्यवसायातील नवनव्या शाखा व वाटा शोधताना, डॉ. जोशी आपल्या रुग्णांना योगाभ्यासाचे महत्त्वही आवर्जून सांगतात. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग वा कोणताही क्रिकेटपटू असो की टेनिस, बॅडमिंटन, हॉकी खेळणारे खेळाडू असो, मैदानात दुखापत होताच ते येतात डॉ. अनंत जोशी यांच्याकडेच. अगदी कुस्ती खेळणाºया मल्लांनाही खात्री वाटते डॉ. अनंत जोशी यांची. गेली ३0 ते ३२ वर्षे ते खेळाडूंना फारशी औषधे न देता बरे करण्याचे काम करीत आहे. जगविख्यात ऑर्थोपेडिक सर्जन अशी त्यांची ख्यातीच आहे. गेली १0 वर्षे ते लीलावती हॉस्पिटलशी संलग्न आहेत, बोर्ड ऑफ कंट्रोल ऑफ क्रिकेटचे ते स्पोर्ट्स मेडिसिन कन्सल्टंट आहेत. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २0११ चे मेडिकल डायरेक्टरही होते. याशिवाय अनेक क्रीडा संस्थांचे ते वैद्यकीय सल्लागार आहेत वा त्यांच्याशी संलग्न आहेत. संगीता बिजलानी आणि विद्या बालन या अभिनेत्रीही त्यांच्याकडेच उपचारांसाठी गेल्या होत्या. भारतात डॉ. नंदकुमार लाड व अमेरिकेत अल्बामाच्या ऑर्थोपेडिक असोसिएशन ऑफ मोबाइल यांच्या हाताखाली काम करण्याची व प्रशिक्षण घेण्याची डॉ. जोशी यांना संधी मिळाली. अ‍ॅर्थ्रोस्कोपिक सर्जरीमधील नैपुण्यासाठी ते ओळखले जातात. खेळामध्ये सर्वाधिक गुडघा, कोपर, खांदा, पायाचा घोटा यांना किंवा पाठ व कंबरेला. पाठीच्या कण्याला मार लागतो, तेव्हा तर रुग्णाला इतका त्रास होतो की विचारायची सोय नसते. अतिशय वेदनादायी प्रकार असतात या दुखापती. डॉ. जोशी त्यांवर उपचार तर करतात, पण वेदना व्यवस्थापनाद्वारे त्यांचा त्रास कमी व्हावा, यासाठीही प्रयत्न करतात. पण ते केवळ खेळाडूंचेच डॉक्टर नाहीत. संधीवाताच्या त्रासापासून कसलेही फ्रॅक्चर झाले तरी केवळ मुंबई व महाराष्ट्रातील नव्हे, तर देशभरातील रुग्ण हक्काने डॉ. जोशी यांच्याकडे येतात. परळला सयानी रोडवर स्पोटर्समेड हे त्यांचे क्लिनिक आहे. त्याचे उद्घाटनच झाले होते सचिन तेंडुलकरच्या हस्ते आणि संदीप पाटील, धनंजय पिल्ले व मुंबई क्रिकेट असोसिएशनचे रवी सावंत यांच्या उपस्थितीत. गेल्या ३0-३२ वर्षांत त्यांनी हजारो लोकांच्या वेदना दूर केल्या आहेत, सांधे जुळवले आहेत, कैक शस्त्रक्रिया केल्या आहेत, त्या कमीत कमी वेळेत व किमान त्रासात करण्याचे त्यांचे तंत्र अचंबित करणारे आहे. तसे पाहता, मुंबई, महाराष्ट्रात वा देशात ऑर्थोपेडिक सर्जनची संख्या प्रचंड आहे. पण रुग्णांना हवे असतात डॉ. अनंत जोशी. हसरा स्वभाव, न घाबरवता, रुग्णाला नीट माहिती देणे, रुग्ण लवकर बरा व्हावा, यासाठी व्यवस्थित उपचार यामुळे डॉ. अनंत जोशी हे अतिशय लोकप्रिय डॉक्टर म्हणून ओळखले जातात.
डॉ. अनंत जोशी यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php

डॉ़. चैतन्यानंद कोप्पीकर (संचालक, ऑर्किड्स ब्रेस्ट हेल्थ, पुणे)
देशात, काही वर्षांपर्यंत कर्करोगाचे निदान, अत्याधुनिक उपचार पद्धती याविषयी लोकांना खूप कमी माहिती होती. या रुग्णांना योग्य मार्गदर्शन मिळत नव्हते. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना कर्करोगावरील उपचार परवडणारे नव्हते. त्यामुळे डॉ. चैतन्यानंद कोप्पीवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पुण्यात १९९५ मध्ये प्रशांती कॅन्सर केअर मिशन या संस्थेची सुरुवात केली. कर्करोगाच्या रुग्णांना उपचारासाठी मार्गदर्शन, आर्थिक मदत करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. पण त्यावर समाधान न मानता डॉ. कोप्पीकर यांनी स्तनाच्या कर्करोगावर अधिक लक्ष केंद्रित केले. स्तनांच्या कर्करोगाविषयी महिलांमध्ये अद्याप पुरेशी जनजागृती नाही. त्यामुळे या क्षेत्रात प्रशांती कॅन्सर केअर मिशनअंतर्गत २००९ मध्ये ऑर्किड्स ब्रेस्ट हेल्थ क्लिनिक सुरू करण्यात आले. स्तनाच्या कर्करोगाचे निदान व उपचारांसाठी आवश्यक असलेल्या मशिन्स असलेल्या देशातील मोजक्या क्लिनिकमध्ये आॅर्किडचे नाव घेतले जाते. डॉ. कोप्पीकर यांनी चार वर्षांपूर्वी देशभरात केलेल्या सर्वेक्षणामध्ये कर्करोग झालेल्या महिलांचे स्तन काढून टाकण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. जयपुर, पाटणा या शहरांत हे प्रमाण १०० टक्के होते. तर भारतात ८० टक्के महिलांचे स्तन काढले जात होते. तसेच विचित्र पद्धतीने शस्त्रक्रिया होत होत्या. या पार्श्वभूमीवर डॉ. कोप्पीकर यांनी २०१० पर्यंत १० वर्षे जर्मनी, इंग्लंड, अमेरिका या देशांमध्ये ‘ऑन्कोप्लॉस्टीक सर्जरी’चे प्रशिक्षण घेतले. या शस्त्रक्रियेमुळे कर्करोग झालेले स्तन काढावे लागत नाही. त्यासाठी त्यांनी क्लिनिकमध्ये देशातील पहिले ऑन्कोप्लास्टी युनिट सुरू केले. जगभरात ‘ऑन्कोप्लास्टी सर्जरी’चे प्रमाण वाढत आहे. मात्र, भारतात त्याविषयी माहिती नाही. त्यामुळे डॉ. कोप्पीकर देशभरात कार्यशाळा, परिषदांच्या माध्यमातून तज्ज्ञांना याविषयी मार्गदर्शन करीत आहेत. चार वर्षांपूर्वी युकेमधील विद्यापीठाच्या सहकार्याने इंटरनॅशनल स्कूल आॅफ आॅन्कोप्लास्टिक सर्जरीची स्थापना केली आहे. त्यामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या क्षेत्रात वेगाने बदल होऊ लागला आहे. स्तनांच्या कर्करोगाचे लवकर निदान होण्याच्या दृष्टीने डॉ. कोप्पीकर यांनी नवनवीन तंत्रज्ञाने विकसित केली आहेत. ‘मॅमोग्राफी’पेक्षा अधिक क्षमतेचे ऑटोमेटेड ब्रेस्ट अल्ट्रा साऊंड हे मशिन क्लिनिकमध्ये असून भारतात २ ते ३ ठिकाणीच ते आहे. स्तनांच्या कर्करोगासंदर्भात आयसर या केंद्र सरकारच्या संशोधन संस्थेच्या सहकार्याने क्लिनिकमध्ये संशोधनाचे मोठे काम सुरू आहे. नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी डॉ. कोप्पीकर यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यांचे हे प्रयत्न जगभर नावाजले गेले आहेत. इंग्लंड, अमेरिकेमध्ये याविषयीच्या परिषदांमध्ये त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी देण्यात आली. देश-विदेशातील विविध रुग्णालये व संस्थांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे तज्ज्ञ म्हणून त्यांना मानाचे स्थान आहे. गोरगरीबांना कर्करोगाच्या उपचारांचा खर्च परवडत नाही. त्यामुळे क्लिनिकमध्ये डॉ. कोप्पीकर यांच्याकडून प्रशांती मिशनच्या सहकार्याने अशा रुग्णांना आर्थिक मदतही दिली जाते. तसेच याठिकाणी बाहेरील उपचार शुल्कापेक्षा ४० टक्के शुल्क कमी घेतले जाते. सामाजिक बांधिलकी जपत रुग्णांना कमी खर्चात उपचार उपलब्ध करून दिले जातात. कर्करोग तपासणीसाठी त्यांच्या व्हॅन्स असून खेडोपाडी जाऊन महिलांची तपासणी केली जाते. विविध ठिकाणी शिबीरे घेतली जातात. स्तनांच्या कर्करोगाबाबत महिला व समाजामध्ये अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
डॉ. कोप्पीकर यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php

डॉ. जय देशमुख, नागपूर
डॉ. जय एका उच्चशिक्षित कुटुंबात जन्माला आले. त्यांचे वडील प्रोफेसर एम. जी. देशमुख नागपूर विद्यापीठाची पीएच.डी. मिळविणारे पहिले विद्यार्थी होते व त्यांच्या मातोश्री उषा देशमुख डॉक्टरेट असून ३०० हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. डॉ. जय यांनी मुंबईच्या सायन कॉलेजमधून एमबीबीएस व एम.डी. केले. मेडिसीन, ईएनटीमध्ये त्यांना सुवर्णपदके मिळाली. विद्यापीठात ते टॉप होते. ते एम.डी. झाले त्यावेळी निकालाची टक्केवारी होती अवघी आठ. डॉ. जय यांनी अनेक मेडिकल नियतकालिकांत लेख लिहिले. हायपरटेन्शन, डायबेटिक, एचआयव्ही मेडिसिन आदी विषयांवर ते व्याख्यान देतात. डॉ. जय यांनी १९८१ मध्ये व्यावसायिक प्रवास सुरू केला. मुंबईतील अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये जॉब करण्याची संधी त्यांना होती. पण त्यांनी बघितले फारच कमी डॉक्टर्स स्वत:ची प्रॅक्टिस करतात. त्यामुळे त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. उन्हाळ्यात नागपूरच्या ४५ डिग्री तापमानात सेकंडहॅन्ड स्कूटरवरून ते फिरायचे. नीरीमध्ये अल्प पगारावर वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. डागा व इतर काही रुग्णालयातही सेवा दिली. सुरुवातीला त्यांचे हॉस्पिटल दोन बेड्सचे होते. शिक्षणात रस असल्यामुळे ते सावंगीच्या मेघे हॉस्पिटलमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून जात. त्यांनी सलग तीन वर्षे ‘बेस्ट प्रोफेसर’ हा किताब जिंकला. डॉक्टरची भूमिका अतिशय साधी असते. रुग्णाला त्याच्या रोगापासून मुक्ती आणि आराम देणे हे त्याचे काम. औषध वितरणाबाबतही नियम बनविण्याची गरज आहे, असे ते म्हणतात. भारतात डायबेटिक रुग्णांची संख्या मोठी आहे. योग्य उपचार केल्यास डायबेटिस टाळता येतो. डायबेटिक रुग्णांसाठी सर्व साधनांनी सज्ज अशी अ‍ॅम्बुलन्स सेवा डॉ. जय देशमुख सुरू करणार आहेत. शाळा, महाविद्यालयांतही ते विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिरे घेतात.धम्मचक्रदिनी दरवर्षी जवळपास १००० रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर ते उपचार करतात. रोज तब्बल १४ तास रुग्णसेवेत व्यग्र असतात. भावी डॉक्टरांसाठी डॉ. जय हे ‘रोल मॉडेल’ आहेत. मानवतेबद्दल आदर, कणव असेल तरच या व्यवसायात या! पैसे जरूर कमवा. पण तेच एकमेव लक्ष्य असता कामा नये. पैसा नेहमीच येतो, तुम्ही पेशन्टस्मागे धावा, पैशामागे धावू नका, रुग्णाना लवकरात लवकर बरे करण्याकडे कल असला पाहिजे. केवळ उपचारच नको तर ते रोगांपासून कसे दूर राहतील, यासाठी त्यांना मार्गदर्शनही केले पाहिजे, असेही ते सांगतात. समाजहिताच्या काही कल्पक ते योजना राबविणार आहेत. त्याते एचआयव्हीबाधीत विधवांचे पुनर्वसन आहे. जीवनशैली बदलल्यामुळे आज नवीन व्याधी जडत असल्याचे लक्षात घेऊन दर रविवारी ३०० रुग्णांची नि:शुल्क तपासणी ते करणार आहेत. आयुर्वेदिक डॉक्टरांना प्रगत चिकित्सक ज्ञान देण्यासाठी विशेष वर्ग घेतले जाणार आहेत. आदिवासीबहूल गडचिरोली जिल्ह्यातील तरुणींना नर्सिंगचे प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याचा त्यांचा संकल्प आहे.
डॉ. जय देशमुख यांना मत देण्यासाठी -http://lmoty.lokmat.com/vote.php

डॉ. मिलिंद कीर्तने, ईएनटीतज्ज्ञ, मुंबई 
श्वसनेंद्रिय, कर्णेंद्रिय ध्वनी इंद्रिय म्हणजेच नाक, कान व घसा ही तीन इंद्रिये माणसाच्या जीवनात गरजेचीच असतात. ती शाबूत राहणे आवश्यकच. ती शाबूत राहावीत वा त्यांत काही बिघाड झाला की ते पुन्हा दुरुस्त करण्याचे वा त्यावर उपचार करण्याचे काम डॉ. मिलिंद कीर्तने अनेक वर्षांपासून करीत आहेत. ईएनटी स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे डॉ. कीर्तने अतिशय मनमिळाऊ व लोकप्रिय डॉक्टर आहेत. त्यामुळेच मुंबई वा महाराष्ट्रच नव्हे, तर देशा-परदेशांतील रुग्णही या तीन इंद्रियांवरील आजारांच्या उपचारांसाठी डॉ. कीर्तने यांच्याकडे धाव घेतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊ न भारत सरकारने ‘पद्मश्री’ देऊन त्यांना सन्मानित केले आहे. लहान मुलाला ऐकू येते की नाही, हा अनेकदा प्रश्न पडतो. त्या वयात मुलाला बोलता येत नाही, सांगता येत नाही आणि आपण जे बोलत असतो, ते कळतही नाही. अशा मुलांची तपासणी करून, त्यांना ऐकू यावे, यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न वाखाणण्यासारखे आहे. त्यामुळेच मिळालेले सन्मान, सत्कार व पुरस्कार याहून त्यांना लहान मुलाला ऐकू येऊ लागते, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील हास्य पाहायला आवडते. हे हास्य हाच सन्मान आहे, असे त्यांना मनापासून वाटते. त्यासाठी आॅडिओलॉजिस्ट, स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट व त्या क्षेत्रातील प्रशिक्षक यांच्यामार्फत प्रचंड मेहनत घेतात. मुंबईच्या केईएम (जीएस मेडिकल कॉलेज)मधून एमएस केले आणि आज तिथे ते मानद प्राध्यापकही आहेत. याशिवाय मुंबईतील सैफी व हिंदुजा रुग्णालयात ते रुग्णांवर उपचार करतात. डॉ. कीर्तने यांची भारत सरकारने २00५ च्या बी. सी. रॉय पुरस्कारासाठी निवड केली आणि नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ मेडिकल सायन्स तसेच सायनस इंडोस्कोपिक सोसायटी ऑफ इंडिया, इंडियन सोसायटी ऑफ ऑक्टॉलॉजी, सोसायटी ऑफ लॅरिंगॉलॉजी यांच्याशी संबंध असलेल्या डॉ. कीर्तने यांनी असोसिएशन ऑफ ऑटोलॅरिंगॉलॉजिस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. ऑटोलॅरिंगॉलॉजी याचा आपल्या भाषेत अर्थ ईएनटी स्पेशालिस्ट वा नाक, कान, घशाचे डॉक्टर. पण ते केवळ ऑटोलॅरिंगॉलॉस्टि नसून, ते ऑटोहिनोलॅरिंगॉलॉजिस्ट म्हणजे सर्जनही आहेत. याखेरीज अनेक परदेशी वैद्यकीय संस्थांशी ते संबंधित आहेत. डॉ.कीर्तने यांनी केलेले लिखाण जसे प्रचंड आहे, तसेच त्यांच्यावरही अनेकांनी लिहिले आहे. डॉ. मिलिंद कीर्तने यांनी स्वत:ही अनेक डॉक्टर घडवले आहेत.हृदयात जसा पेसमेकर बसवतात, तसेच कर्णपटलाच्या मागे यंत्र बसवण्याची (इम्प्लांट) शस्त्रक्रिया डॉ. कीर्तने यांनी २0 वर्षांपूर्वी केली. त्यांनी आतापर्यंत केलेल्या विविध शस्त्रक्रियांची संख्या काही हजारांत असेल. इतका अभ्यास व वैशिष्ट्ये असलेले डॉ. कीर्तने यांचे स्वत:चे क्लिनिक आहे अमर भुवनमध्ये. ऑपेरा हाऊस चित्रपटगृहाजवळ, फ्रेंच ब्रिजपाशी. ते उघडते सकाळी सहा वाजता. बंद होण्याची वेळ मात्र ठरलेली नसते. जेव्हा शस्त्रक्रिया नसेल वा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना भेटायचे नसेल, तेव्हा ते तिथे हमखास भेटतात. चेहऱ्यावर हास्य आणि रुग्णांना नीट माहिती देऊ न, त्यांची भीती कमी केली की बरेच प्रश्न सुटतात, यावर त्यांचा विश्वास आहे.
डॉ. मिलिंद कीर्तने यांना मत देण्यासाठी- http://lmoty.lokmat.com/vote.php

Web Title:  Lokmat Maharashtrian of the Year; Vote for honoring modern Dhanwantari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.