Maharashtra Lok Sabha Election Result 2019: शरद पवार हरले नगरचा '(रण)संग्राम', हाती आले धुपाटणे!

By सुधीर लंके | Published: May 23, 2019 05:43 PM2019-05-23T17:43:15+5:302019-05-23T17:45:16+5:30

नगरला विखे जिंकले, तर जगताप यांच्या रुपाने स्वत: शरद पवार पराभूत झाले आहेत.

Lok Sabha Election Result 2019: Sharad Pawar's candidate lost in nagar | Maharashtra Lok Sabha Election Result 2019: शरद पवार हरले नगरचा '(रण)संग्राम', हाती आले धुपाटणे!

Maharashtra Lok Sabha Election Result 2019: शरद पवार हरले नगरचा '(रण)संग्राम', हाती आले धुपाटणे!

Next

अहमदनगर: अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे डॉ. सुजय विखे यांनी दणदणीत विजय मिळवत एकप्रकारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच रणसंग्रामात पराभूत केले आहे. शरद पवार यांनी या मतदारसंघासाठी सर्व प्रतिष्ठा पणाला लावली खरी, मात्र त्यांच्या हाती धुपाटणे आले आहे. 

सुजय विखे हे गत तीन वर्षांपासून या मतदारसंघात तयारी करत होते. त्यांचे वडील राधाकृष्ण विखे हे राज्याचे विरोधी पक्षनेते होते. हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे. मात्र राष्ट्रवादीने हा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडावा, अशी विखे पिता-पुत्रांची मागणी होती. शरद पवार यांनी मात्र त्यास नकार दिला. राष्ट्रवादीची या मतदारसंघात ताकद असून आम्हीच हा मतदारसंघ लढवू, अशी भूमिका त्यांनी घेतली. सुजय यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडण्यास राष्ट्रवादीच्या काही नेतेमंडळींनीही आतून विरोध केला. बाळासाहेब विखे यांना आम्ही या मतदारसंघात १९९१ ला पराभूत केले आहे, असे दाखले देखील पवारांनी दिले. 'दुसऱ्याच्या पोराबाळांची मी का काळजी करु' असे विधानही पवारांनी केले. 

पवारांनी नकार दिल्याने विखे यांनी भाजपात प्रवेश करुन उमेदवारी मिळवली. विखे यांची ही उमेदवारी म्हणजे थेट शरद पवार यांनाच आव्हान होते. राष्ट्रवादीने हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिला असल्याने येथे आपला उमेदवार जाहीर करुन बांधणी करण्याची जबाबदारी राष्ट्रवादीने घ्यायला हवी होती. मात्र, राष्ट्रवादीने उमेदवारीचा घोळ घातला. गत पाच वर्षे तर या पक्षाने मतदारसंघांची बांधणी केली नाहीच. पण निवडणुकीच्या २२ दिवस आधी ऐनवेळी संग्राम जगताप यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. एवढ्या अल्पकाळात ते बांधणीच करु शकले नाहीत. राष्ट्रवादीकडून या मतदारसंघात शरद पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे या नेत्यांच्या सभा झाल्या. मात्र, सुप्रिया सुळे, अजित पवार हे बारामती, मावळमध्ये अडकल्याने प्रचारासाठीही येऊ शकले नाहीत. कॉंग्रेसकडूनही केवळ बाळासाहेब थोरात प्रचारासाठी आले. प्रचार यंत्रणा राबविण्यातच राष्ट्रवादी कमी पडली. नगर शहर हा संग्राम जगताप यांचा स्वत:चा विधानसभा मतदारसंघ आहे. मात्र, स्वत:च्या बालेकिल्ल्यात देखील ते फारसा प्रचार करु शकले नाहीत. या बालेकिल्ल्यातही विखेंनी मतांमध्ये आघाडी घेतली आहे. एकप्रकारे पवार यांनी जगताप यांना बळीचा बकरा केले.


विखे यांची बांधणी चांगली होती. स्वत: सुजय यांनी दोन वर्षांपूर्वीच एकप्रकारे आपली उमेदवारी घोषित केली होती. त्यामुळे त्यांचा बहुतांश प्रचार हा निवडणुकीपूर्वीच होऊन गेला होता. त्यात त्यांना सेना-भाजपची ताकद मिळाली. नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नेत्यांच्या सभा त्यांनी घेतल्या. विखेंच्या भाजप प्रवेशामुळे भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांची उमेदवारी कापली गेली. गांधी व त्यांचे समर्थक यामुळे नाराज झाले. मात्र विखे पिता-पुत्रांनी त्यांची नाराजी शमवली. भाजप-सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी विश्वासात घेतले. त्यामुळे  त्यांची विजयाची गणिते सोपी झाली.

 
‘मी शरद पवार व बाळासाहेब थोरात या नेत्यांचे आभार मानतो’, अशी खोचक प्रतिक्रिया सुजय विखे यांनी विजयानंतर व्यक्त केली आहे. या दोघांनी हा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडला नाही म्हणूनच भाजपमध्ये जाऊन विजयी होता आले, असे या प्रतिक्रियेतून सुजय यांनी ध्वनित केले आहे. नगरला विखे जिंकले, तर जगताप यांच्या रुपाने स्वत: शरद पवार पराभूत झाले आहेत.

Web Title: Lok Sabha Election Result 2019: Sharad Pawar's candidate lost in nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.