लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बीट क्वॉइनच्या तुलनेत आता चीनने एलसीएफ नावाचे व्हेब चलनी क्वॉइन बाजारपेठेत आणले असून, त्याचे नेटवर्क जगभरात पसरले आहे. त्यात अकोला मागे नाही. दिल्लीच्या एका नेटवर्कमध्ये अकोल्यातही एलसीएफ क्वॉइन क्लबचे जाळे विस्तारले असून, तब्बल एक हजार सदस्य यामध्ये जोडल्या गेले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विविध वस्तू खरेदीसाठी आता व्हेब क्वॉइनचा व्यवहार वाढतो आहे. विशेष करून हा व्यवहार संगणक साक्षर असलेल्या सुशिक्षित वर्गात जास्त असून, त्याचा वापर भारतातही होत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बीट क्वॉईन खरेदी करणाऱ्यांमध्ये दिवसेंदिवस भारतीयांची संख्या वाढत आहे. कमी रुपयांमध्ये खरेदी केलेल्या बीट क्वॉईनचे खरेदीदार आता श्रीमंत झाले आहे.
बीट क्वॉईनला मात्र अजून राजाश्रय मिळालेला नाही. या तुलनेत चीनच्या एलसीएफ क्वाईन क्लबचे गत काही महिन्यांत केवळ चीनमध्येच नव्हे, तर जगभरात मोठे जाळे विस्तारले आहे. चीनच्या सरकारने त्यास अधिकृत मान्यता दिल्याने जगभरात आता एलसीएफ क्वॉईन क्लब वाढत आहे. दिल्लीच्या नेटवर्कमध्ये अकोला आणि महाराष्ट्रातील मोठा वर्ग जुळला आहे.
या क्लबच्या माध्यमातून लोकांना तीन हजार व्हेब क्वॉइन दिले गेले असले, तरी अजूनही अनेकांचा या प्रणालीवर विश्वास नाही. व्हॉट्सअ‍ॅपच्या ग्रुपवरून मोठे नेटवर्क सक्रिय झाले असून, त्यात अकोल्यातील हजारो युवकांना सहभागी करण्यात आले आहे.