काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना हौतात्म्य पत्करलेल्या मिलिंद खैरनार या हवाई दलाच्या जवानाला गुरुवारी सायंकाळी बोराळे ता. नंदुरबार येथे साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. देशभक्तीपर उत्स्फूर्त घोषणांनी वातावरण भावुक झाले होते. मुलगा कृष्णा याने त्यांना मुखाग्नी दिला.
हवाई दलाच्या गरुड कमांडो पथकातील मिलिंद खैरनार यांना मंगळवारी श्रीनगरमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण आले होते. गुरुवारी त्यांचे पार्थिव सायंकाळी ५ वाजता बोराळे येथे आणण्यात आले. पार्थिव गावाच्या वेशीवर आणण्यात आले असता गावातील युवकांनी मानवी साखळी करून देशभक्तीपर घोषणा दिल्या. त्यानंतर सजविलेल्या ट्रॅक्टरमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातील मंदिर चौकात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कराच्या १०० जवानांनी त्यांना मानवंदना दिली.
११ जवानांनी हवेत फैरी झाडून सलामी दिली. या वेळी पत्नी हर्षदा, मुलगी वेदिका, वडील किशोर खैरनार, आई, लहान भाऊ हवालदार मनोज खैरनार यांच्यासह काका तुकाराम खैरनार आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.