गणिताची भाषा की गरिबांची भाषा?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 06:39 AM2019-06-23T06:39:10+5:302019-06-23T06:39:44+5:30

बालभारतीच्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील संख्यावाचनातील व लेखनातील बदलाच्या वादाने आता महाचर्चेचे रूप धारण केले आहे. समाजमाध्यमांवर या चर्चेला चेष्टेचेही स्वरूप आलेले असले तरी हा वाद गांभीर्याने आणि दोन्ही बाजू शांतपणे समजून घेऊन हाताळण्याची गरज आहे.

Language of the poor language of mathematics? | गणिताची भाषा की गरिबांची भाषा?

गणिताची भाषा की गरिबांची भाषा?

Next

- डॉ. प्रकाश परब

बालभारतीच्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील संख्यावाचनातील व लेखनातील बदलाच्या वादाने आता महाचर्चेचे रूप धारण केले आहे. समाजमाध्यमांवर या चर्चेला चेष्टेचेही स्वरूप आलेले असले तरी हा वाद गांभीर्याने आणि दोन्ही बाजू शांतपणे समजून घेऊन हाताळण्याची गरज आहे. गणित अभ्यास मंडळाने काही एक हेतू मनात ठेवून ज्या काही सुधारणा सुचवलेल्या आहेत त्यांचे नीट परीक्षण झाले पाहिजे. हे परीक्षण केवळ गणितीय नव्हे तर भाषाशास्त्रीय दृष्टीनेही झाले पाहिजे.

‘एकवीस ते नव्याण्णव’ या संख्यानामांचे वाचन सुधारित पद्धतीने वीस एक, वीस दोन असे करावे म्हणजे ते खेड्यापाड्यातील, तळागाळातील, गरीब व अशिक्षित पालकांच्या मुलांना समजायला सोपे जाते असा यामागील प्रमुख युक्तिवाद आहे. या सुधारणेच्या समर्थकांकडून इतरही काही मुद्दे पुढे आले आहेत ते असे - या पद्धतीत जोडाक्षरे कमी वापरावी लागतात. त्यामुळे (गरीब) मुलांवरचा जोडाक्षरवाचनाचा ताण कमी होतो. उदा. ‘त्रेसष्ट’ उच्चारण्याऐवजी ‘साठ तीन’ हे वाचन अधिक सोपे आहे. शिवाय, या बदलामुळे इंग्रजी व काही दाक्षिणात्य भाषांतील संख्यानामांशी सुसंगती राखली जाते. या भाषांमध्ये दशक एकक अशा पद्धतीनेच दोन अंकी संख्यांचे वाचनलेखन होते. मग मराठीत ते का असू नये? मराठीतील संख्यानामांतील अनुक्रमामध्ये असलेली विसंगती दूर होते. बोलणे आणि लिहिणे यांचा क्रम सारखा राहतो. उदा. ‘पंचवीस’ऐवजी ‘वीस पाच’ असे लिहिणे सुसंगत आहे. कारण ‘पंचवीस’मध्ये पाच आधी वीस नंतर असा क्रम असूनही आपण दोन आधी आणि पाच नंतर लिहितो. इंग्रजीत मात्र ‘ट्वेंटीफाइव्ह’ म्हणजे दोन आधी व पाच नंतर असा सुसंगत क्रम आहे.
गणित अभ्यास मंडळातील सदस्यांविषयी पूर्ण आदर बाळगून अगदी थेट प्रतिक्रिया द्यायची तर हा अव्यापारेषुव्यापार आहे. द्राविडीप्राणायाम आहे. नाचता येईना अंगण वाकडे किंवा आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी असा प्रकार आहे. प्रचंड टीका झाल्यानंतर आता संख्यावाचनाची जुनी पद्धतीही चालू राहील, तिला आमचा विरोध नाही असे म्हटले जात असले तरी मुळात ही नवी पद्धती प्रमाण आणि सार्वत्रिक करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. जसे, ‘शंभर’ म्हणजे ‘एक शून्य शून्य’ हे बरोबर असले तरी असे वाचन व लेखन हे स्पष्टीकरणात्मक व काही अपवादात्मक व विशेष कारणासाठीच केले पाहिजे. ‘त्रेसष्ट’ म्हणजे ‘साठ तीन’ हे बरोबर असले तरी ते त्याचे आकलनसुलभतेसाठी केलेले स्पष्टीकरण झाले. संख्याज्ञान करून घेताना ज्या मुलांना अडचण येते त्यांना त्या पद्धतीने जरूर शिकवावे. पण भाषिक व्यवहारात ‘साठ तीन’ हे त्रेसष्टचे पर्यायी रूप म्हणून सार्वत्रिक किंवा प्रमाणभूत करणे हे शिक्षणशास्त्र आणि भाषाविज्ञान या दोन्ही दृष्टींनी प्रामादिक आहे. ज्यांना नाचता येत नाही त्यांना विविध मार्गांनी नाचायला शिकवण्याऐवजी अंगणच ‘सरळ’ करण्याचा हा प्रकार आहे. र, ळ हे वर्ण उच्चारायला अनेक मुलांना त्रास होतो किंवा चुकीचे उच्चारले जातात म्हणून त्यांना सोपे पर्याय आपण शोधणार की तेच प्रमाण मानून ते कसे उच्चारायचे याचे प्रशिक्षण
देणार?
मुळात, गणितीय सुधारणा करण्याचा गणित अभ्यास मंडळाला अधिकार असला तरी भाषिक सुधारणा करण्याचा अधिकार नाही. मंडळ फार तर भाषिक सुधारणांची शिफारस करू शकते. गणिताची भाषा ही एकूण भाषाव्यवस्थेचे एक अंग आहे. गणिताची भाषा बदलताना एकूण भाषाव्यवस्थेवर त्याचा काय परिणाम होईल किंवा ती बदलणे कितपत व्यवहार्य आहे याबाबत भाषातज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक होते. भाषा ही परिवर्तनशील असते आणि तिच्यात जाणीवपूर्वक कोणताच बदल करू नये असे नव्हे. पण तो बदल विचारपूर्वक व एकूण भाषिक व्यवस्था, तिची परंपरा, व्याकरणिक प्रकृती व प्रस्तावित बदलांमुळे उद्भवणाऱ्या व्यावहारिक अडचणी लक्षात घेऊनच करायला हवा. असा बदल मराठीचे प्रमाण लेखन घडवण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून अनेकदा केला आहे. यापुढेही तो करायला हरकत नाही. पण त्यामागे भाषाशास्त्रीय दृष्टी
हवी.
भाषा ही समाजनिर्मित आणि सामाजिक मालमत्ता आहे. कोणीही उठावे आणि तीत बदल करावेत असे चालत नाही. भाषेतील शब्दसंपदा प्रतीकात्मक व रूढीने सिद्ध झालेली असते. एका भाषेत अमूक आहे म्हणून दुसºया भाषेत ते असलेच पाहिजे असे नाही. प्रत्येक भाषेत अभिव्यक्तीची व समाजाच्या भाषिक गरजा भागवण्याची पूर्ण क्षमता असते. ही क्षमता विभिन्न प्रकारे व्यक्त होत असते आणि ती विभिन्नताच तिला अनन्यता प्रदान करते. प्रत्येक भाषेत सुसंगती आणि विसंगती आहे. नियम आहेत आणि अपवाद आहेत. मराठीच्या संख्यानामांतील क्रमविसंगती लक्षात आणून देताना जिच्या उच्चार आणि वर्णलेखनात प्रचंड तफावत आहे त्या इंग्रजीचा दाखला देणे हास्यास्पद आहे. २१ ते ९९ या संख्यानामांमध्ये बदल किंवा पर्याय सुचवताना ११ ते १९ या संख्यानामांमध्ये बदल का सुचवला नाही? इंग्रजीत नाही म्हणून? ‘सिक्स्टीन’ हा उच्चार सोपा आहे काय? आणि त्यात कसली क्रमसुसंगती आहे? भाषेतील शब्द प्रतीकात्मक असतात. मुलांना भाषा आत्मसात करताना त्यांच्या क्षमतेनुसार कमी-जास्त अडचणी येतच राहणार. आजच्या प्रगत काळात तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी सोप्या केलेल्या आहेत. तेव्हा अज्ञान, दारिद्र्य ही कारणे देऊन गणित आणि त्याची भाषा सोपी करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी
मुलांच्या क्षमतावर्धनाचे इतर मार्ग शोधून काढणे अधिक व्यवहार्य ठरेल. समाजात विशिष्ट भाषा शिकण्याची व शिकवण्याची प्रेरणा क्षीण झाली की ती कठीण वाटू लागते, असे भाषाविज्ञान सांगते. मराठी भाषेबाबत असेच घडले असण्याची शक्यता आहे.
(लेखक महाराष्ट्र
राज्य भाषा सल्लागार समितीचे सदस्य आहेत)

Web Title: Language of the poor language of mathematics?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.