मुंबई/पुणे : लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर गुरुवारी राज्यातील सराफी बाजार गर्दीने फुलले. सोन्या-चांदीची जोरदार खरेदी झाली. सोन्याच्या मागणीत गेल्या वर्षीपेक्षा १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली. दागिने, नाणी, मंगळसूत्र आदींना अधिक मागणी होती. पाडव्यापर्यंत खरेदी होत राहील.
अभय गाडगीळ म्हणाले की, आज खरेदीसाठी गर्दी झाली. लक्ष्मीच्या प्रतिमा, नाणी यांना मागणी होती. वस्तुपाल रांका म्हणाले की, नोटाबंदी व जीएसटीनंतर आलेली मरगळ गेली आहे. दागिन्यांना व कुबेर यंत्र, श्रीयंत्राचीही खरेदी झाली. त्याची किंमत एक ते १० हजार रुपयांपर्यंत आहे.

शुद्धतेनुसार सोन्याचा प्रतितोळा भाव २९ हजार २७० ते ३० हजार ८०० रुपये होता तर चांदीला किलोमागे ४० हजार ५०० ते ४१ हजार असा भाव होता. मुंबईतील प्रसिद्ध झवेरी बाजार, सुवर्णनगरी असा लौकिक असलेल्या जळगावातील सराफा बाजाराला गर्दीमुळे झळाळी आली होती.

सुवर्णनगरी जळगाव गजबजले

सुवर्णनगरी असा लौकिक मिळविलेल्या जळगावातील सराफा बाजारात करोडो रुपयांची उलाढाल झाली. विजयादशमीपासून खरेदीची लगबग सुरू झाल्यानंतर लक्ष्मीपूजनादिवशी आणखी चार चाँद लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. उद्या पाडव्याला खरेदी आणखी वाढेल असा सराफा व्यापाºयांचा अंदाज आहे.