राज्यात स्वतंत्र कृषी हवामानशास्त्र संशोधन केंद्राचा अभाव!

By admin | Published: June 21, 2016 11:41 PM2016-06-21T23:41:30+5:302016-06-21T23:41:30+5:30

कृषी हवामानशास्त्रावर एकाच कृषी विद्यापीठात पीएचडी अभ्यासक्रम.

Lack of separate agricultural climate research center in the state! | राज्यात स्वतंत्र कृषी हवामानशास्त्र संशोधन केंद्राचा अभाव!

राज्यात स्वतंत्र कृषी हवामानशास्त्र संशोधन केंद्राचा अभाव!

Next

राजरत्न सिरसाट/अकोला
शेतकर्‍यांना खरीप व रब्बी हंगामात पेरणीसाठी अचूक माहिती देण्यासाठी कृषी हवामानशास्त्राचा मोठा हातभार लागतो; परंतु राज्यात स्वतंत्र कृषी हवामानशास्त्र संशोधन केंद्रच उपलब्ध नसून, या विषयावरील संशोधनासाठी एकाच कृषी विद्यापीठात कृषी हवामानशास्त्रावर आचार्य पदवी असल्याने या विषयातील तज्ज्ञच तयार होत नसल्याचे वास्तव आहे. दरम्यान, अकोल्यात या विषयावर एम.एस्सी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
हवामान बदलाचा शेतीवर आणि शेतकर्‍यांच्या अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या राज्याचा अभ्यास आपल्याकडे असावा, याकरिता प्रथम केरळ व पंजाब कृषी विद्यापीठाने आघाडी घेतली. विशेष म्हणजे, या दोन्ही कृषी विद्यापीठांच्या अगोदर अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने स्वतंत्र कृषी हवामान संशोधन केंद्राचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला; परंतु हा प्रस्ताव धूळ खात पडला आहे.
राज्यातील शेतीसमोर हवामानबदलाचे मोठे आव्हान आहे. या बदलांमुळे पावसाचे सरासरी प्रमाण घसरले आहे. कमी दिवसांत जास्त पाऊस किंवा १८ तासांतच वर्षाचा सरासरी अर्धा पाऊस होतो. तापमानात बदल होत आहे. या सर्वांचा परिणाम पिके व उत्पादनावर होत आहे. त्यामुळे कृषिशास्त्रज्ञांपुढे नियोजन करताना मोठय़ा अडचणी निर्माण होत आहेत. यासाठीच स्वतंत्र कृषी हवामान संशोधन केंद्र असावे, ही मागणी कृषी विद्यापीठांनी लावून धरली आहे.
- कृषी हवामानावर पीएच.डी.
प्रगत महाराष्ट्रात एकाही कृषी विद्यापीठाकडे स्वतंत्र कृषी हवामान संशोधन केंद्र नाही आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ सोडले, तर इतर तीन विद्यापीठांमध्ये या विषयावर पीएच.डी. करता येत नाही आणि तेथेही पीएच.डी.ला दोन ते तीन विद्यार्थ्यांचीच प्रवेशक्षमता आहे.

Web Title: Lack of separate agricultural climate research center in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.