अहमदनगर : कोपर्डी अत्याचार व खून खटल्यात बुधवारी जिल्हा न्यायालयात या घटनेतील महत्त्वपूर्ण अशी फिर्यादीची साक्ष नोंदविण्यात आली़ या साक्षीदाराने न्यायालयासमोर घटनाक्रम विषद करत, पोलिसांनी पंचनाम्यात ताब्यात घेतलेल्या वस्तुंची ओळख पटविली़ या साक्षीदाराची गुरुवारी आरोपी पक्षाकडून उलटतपासणी होणार आहे़
कोपर्डी खटल्याची जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू असून, बुधवारी या खटल्यात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या फिर्यादीची साक्ष सरकारी वकील अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांनी नोंदविली़ ही साक्ष अजून अपूर्ण आहे़ पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतलेल्या वस्तू न्यायालयात साक्षीदाराने ओळखल्या़ घटनेत घटनास्थळी आढळून आलेली पीडित मुलीची सायकल व आरोपीची मोटारसायकल गुरुवारी न्यायालयात दाखविण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)