‘दशावतारा’च्या प्रसारासाठी कोकणी कलाकार घाटावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 08:35 PM2019-04-25T20:35:53+5:302019-04-25T20:41:10+5:30

’दशावतार’ नाटक ही कोकणाची परंपरा आहे...

Kokani artist on ghat due to the expansion of 'Dashavatara' | ‘दशावतारा’च्या प्रसारासाठी कोकणी कलाकार घाटावर

‘दशावतारा’च्या प्रसारासाठी कोकणी कलाकार घाटावर

googlenewsNext
ठळक मुद्देकोकणातील या कलेला सातासमुद्रापार नेण्यासाठी नवीन पिढीचा प्रयत्नयात्रा किंवा उत्सवाच्या काळात मंदिरांमध्ये मध्यरात्री या लोकनाट्याच्या सादरीकरणाची प्रथा

पुणे : कोकणासारख्या मातीत रूजलेले अस्सल पारंपारिक लोकनाट्य म्हणजे ‘दशावतार’. परंतु काही जुनी मंडळी सोडली तर शहरातील नव्या पिढीला या लोककलेची अद्याप माहिती देखील नाही. तमाशा किंवा इतर तत्सम लोककलांना मिळालेला ‘राजाश्रय’देखील दशावताराला मिळू शकलेला नाही. परंतु सोशल मीडियाच्या युगातही तरूण पिढी ही कला जिवंत ठेवण्यासाठी पुढे सरसावली असून, ही कला कोकणापुरतीच मर्यादित न राहाता महाराष्ट्रासह बाहेरच्या भागातही या कलेला सन्मान मिळवून देण्यासाठी  त्यांची धडपड सुरू झाली आहे.
    ’दशावतार’ नाटक ही कोकणाची परंपरा आहे. कोकणात आजही ही कला तग धरून असून, जत्रा, उत्सवांमध्ये दशावतार पाहाणा-यांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रातल्या इतर लोककला लोप पावण्याच्या स्थितीत असताना ‘दशावतारा’ कडे मात्र तरूण पिढीचा ओढा वाढत चालला आहे. कोकणातील या कलेला सातासमुद्रापार नेण्यासाठी नवीन पिढी प्रयत्न करीत आहे. ही कला सर्वदूर पोहोचविण्याचा विडा वेंगुर्ले स्थित  ‘रामेश्वर बाल दशावतार नाट्य’ मंडळाने घेतला आहे. शुक्रवारी ( 26 एप्रिल) हे मंडळ नवी पेठ स्थित निवारा सभागृह येथे सायंकाळी 5 वाजता ‘दशावतार’ चा प्रयोग करणार आहेत. त्यानिमित्त मंडळप्रमुख भैय्या गुरव व तरूण कलाकारांशी ‘लोकमत’ ने संवाद साधला. 
    ते म्हणाले,  ‘दशावतार’ कलेबद्द्ल तरूण पिढीमध्ये आवड निर्माण झाली आहे. त्यांना व्यासपीठही मिळू लागले आहे. शाळांमध्ये सरस्वतीपूजन केले जाते. तेव्हा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ‘दशावतार’ सादर केले जाते. त्यातील काही निवडक मुलांना आम्ही संधी दिली. ज्यायोगे ही कला त्यांच्यात रूजावी. लहान मुलांच्या गोड भाषेत सादर होणा-या नाट्याला प्रेक्षक उचलून धरत आहेत. सध्यस्थितीत हौशी आणि व्यावसायिक अशा दोन माध्यमातून ’दशावतार’ नाटक सादर केले जात आहे.  कालपरत्वे कलेच्या विषयांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पण वेशभूषेमध्ये बदल झाला आहे. फरक फक्त इतकाच आहे की मोठ्या कंपन्यांना राजाश्रय आहे पण आम्ही मात्र स्वखर्चाने नाटक करीत आहोत. हौशेखातर मुलांच्या कलागुणांना वाव द्यायचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सोशल मीडियाच्या काळातही तरूण मुले या कलेकडे वळत असून, हे प्रमाण 10 टक्के असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------------------------------------------------------------------------------
‘ दशावतार’ ही कोकणची पारंपारिक कला आहे. या कलेमधून पौराणिक माहिती मिळते. ही कला तरूण पिढीने टिकवायला पाहिजे असे वाटते. दशावतारच्या सादरीकरणातून पैसे फारसे मिळत नाहीत. एका कलाकाराला 300 रूपये मिळतात. ज्येष्ठ कलाकारांना निवृत्त झाल्यावर पुढे काय, असा प्रश्न पडतो. तरीही आम्ही हौशी तरूण मंडळी ही कला जगवण्यासाठी धडपडत आहोत. ही कला केवळ कोकणातच राहिली आहे. तिला महाराष्ट्रात आणि बाहेरही मंच उपलब्ध झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे- कौशल नातू, तरूण कलाकार
’दशावतार’ काय आहे?
’दशावतार’ हा कोकणातल्या लोकांच्या मनोरंजनाचा एक महत्वाचा स्रोत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोव्यात या कलाप्रकाराची विशेष ख्याती आहे.  यात्रा किंवा उत्सवाच्या काळात मंदिरांमध्ये मध्यरात्री या लोकनाट्याच्या सादरीकरणाची प्रथा आहे. साधारणपणे पूर्वरंग आणि उत्तररंग अशा दोन सत्रात दशावताराला भगवान विष्णूच्या दहा अवतारांचे पदर देण्यात आले आहेत. ही नाटके पौराणिक कथांवर आधारित असतात. दशावताराला नेपथ्य नसते. रंगमंचावर एक बाकडे मधोमध मांडलेले असते. बाजूला पेटीवाला, तबलेवाला आणि झांजवाला असे तीनच वादक असतात. आणि एवढयाच संपत्तीच्या जोरावर ही मंडळी आपली कला सादर करतात. 

Web Title: Kokani artist on ghat due to the expansion of 'Dashavatara'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.