न्या. पटेल समिती करणार चौकशी; मुख्य सचिव समितीचे सदस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, February 10, 2018 1:21am

भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला झालेल्या घटनाक्रमाची चौकशी कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्या. जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेतील द्विसदस्यीय समिती करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी यासंदर्भातील निर्णय घेतला.

मुंबई : भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला झालेल्या घटनाक्रमाची चौकशी कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्या. जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेतील द्विसदस्यीय समिती करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी यासंदर्भातील निर्णय घेतला. समितीला चौकशीसाठी ४ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक हे समितीचे सदस्य असतील. फडणवीस यांनी ४ जानेवारीला मुख्य न्यायाधीश श्रीमती विजया तहिलरामानी यांना स्वत: भेटून यासंदर्भातील विनंती पत्र दिले होते. त्यास तहिलरामानी यांनी ६ फेब्रुवारीला उत्तर पाठविले. त्या म्हणतात की, आपण न्यायाधीशांच्या प्रशासकीय समितीतील वरिष्ठ न्यायाधीशांशी यासंदर्भात चर्चा केली, तसेच सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करता चौकशीसाठी विद्यमान न्यायाधीशांऐवजी तीन निवृत्त न्यायाधीशांच्या नावांची राज्य सरकारकडे शिफारस करीत आहोत. त्या अनुषंगाने कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्या. जे. एन. पटेल यांना विनंती करून त्यांच्या अध्यक्षतेत ‘कमिशन आॅफ इन्क्वायरी अ‍ॅक्ट’अंतर्गत द्विसदस्यीय समिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीची कार्यकक्षा पुढीलप्रमाणे असेल १. भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला घडलेल्या घटनांचा क्रम आणि त्यासाठी कारणीभूत परिस्थिती याची कारणमीमांसा करणे २. घटना घडविण्यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या व्यक्ती किंवा व्यक्तींचा गट किंवा संघटना कारणीभूत होत्या काय? ३. घटनेमुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी केलेले नियोजन व तयारी पुरेशी होती काय? ४. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांकडून योग्य कारवाई झाली होती काय? ५. उपरोक्त १ ते ४ मुद्यांसंदर्भात जबाबदारी निश्चित करणे. ६. घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व पोलिसांनी करावयाच्या तत्कालिक आणि कायमस्वरूपी उपाययोजना सुचविणे ७. सदर घटनांच्या अनुषंगाने अन्य इतर महत्त्वाच्या शिफारसी, समितीचे अधिकार पुढीलप्रमाणे: कलम ५ (२) अन्वये कोणत्याही प्रकारची माहिती प्राप्त करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला चौकशीसाठी बोलाविणे कलम ५ (३) अन्वये कोणत्याही स्थळी वा इमारतीत कोणतीही कागदपत्र जप्त करण्यासाठी प्रवेश करणे अथवा प्रवेशासाठी कुणाला प्राधिकृत करणे कलम ५ (५) अन्वये या चौकशी समितीपुढे चालणारी संपूर्ण कारवाई ही न्यायालयीन कार्यवाही स्वरूपाची असेल.

संबंधित

जय जिजाऊ... शिवरायांच्या माऊलीपुढे मुख्यमंत्री नतमस्तक
मुख्यमंत्री फिट अ‍ॅण्ड फाईन; प्रकृती बिघडल्याचं वृत्त निराधार
महाराष्ट्र केसरीपेक्षा हिंद केसरी व्हायला आवडेल; शरद पवारांविरोधात जानकरांनी थोपटले दंड
भीमा-कोरेगाव खटल्यातील आरोपपत्र मुदतवाढ सुप्रीम कोर्टाकडून कायम
युतीचं ठरलं? भाजपा 25, शिवसेना 23 जागा लढवणार- सूत्र

महाराष्ट्र कडून आणखी

पत्रकारांचे प्रश्र टाळून अमित शहा अन् उद्धव ठाकरेंनी उरकली पत्रपरिषद!
लालपरी डीजिटल! आता मोबाइलवर कळणार एसटीचे निश्चित ठिकाण
आणखी पाच महाविद्यालये झाली स्वायत्त, मुंबईतील तीन, तर नागपूरमधील दोन
युतीचं गणित ! शिवसेनेला 5 वर्षे उपमुख्यमंत्रीपद अन् समसमान मंत्रिपदे मिळणार
महाआघाडीचंही ठरलं, २० फेब्रुवारीला नांदेड येथे फुटणार प्रचाराचा नारळ

आणखी वाचा