राजाराम लोंढे ।  लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापुरात सहकार तत्त्वावरील पहिले १५० बेडचे मल्टिस्पेशालिटी ‘जिजामाता को-आॅपरेटिव्ह हॉस्पिटल’ येत्या जुलै महिन्यापासून सुरू होत आहे. त्यासाठी सहकार खात्याने पुढाकार घेतला असून, सहकारी संस्थांसह व्यक्तिगत सभासदांना येथे सवलतीच्या दरात उच्चदर्जाचे उपचार मिळतील. ‘अ’ वर्ग संस्थांना दहा हजार, तर व्यक्तिगत (तात्पुरते सभासद) एक हजार भागाची रक्कम राहणार आहे, त्यानुसार त्यांना सुविधा मिळणार आहेत.
वैद्यकीय क्षेत्रातही सहकाराने आले पाहिजे, यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची संकल्पना त्यांनी मांडली आणि त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. ‘जिजामाता को-आॅप. हॉस्पिटल, कोल्हापूर’ या नावाने संस्था नोंदणी केली असून, त्याच्या भागभांडवल गोळा करण्याचे काम सुरू आहे. ‘वृषाली हॉटेल’समोरील तीन मजली इमारतीत हे हॉस्पिटल सुरू होत असून, डॉ. भीष्म सूर्यवंशी हे प्रमुख म्हणून काम करणार आहेत.
सहकारी संस्थेप्रमाणे या हॉस्पिटलचे संचालक मंडळ कार्यरत राहणार आहे. पहिल्या टप्प्यात साखर कारखाने, सूतगिरणी, मोठ्या बँका, सचिव केडर यांचा समावेश करण्यासाठी सहकार विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.


सोलापूरनंतर कोल्हापुरात!
यापूर्वी राज्यात एकमेव सोलापुरात अशा प्रकारचे हॉस्पिटल सुरू आहे. त्यानंतर कोल्हापुरात सुरू होत आहे. ‘सहकाराची पंढरी’ म्हणून ओळखणाऱ्या कोल्हापुरात ते अधिक जोमाने कार्यरत होईल.
हे होणार उपचार-
कॅज्युल्टी, फार्मसी, अ‍ॅक्सिडेंट, ट्रामा केअर युनिट, स्पायरल सी. टी. स्कॅन, एक्स-रे युनिट, अल्ट्रा साऊंड स्कॅन युनिट, लॅब, आय.सी.यू. आय.सी.सी.यू, नवजात शिशुसाठी एन.आय.सी.यू., बालरुग्णांसाठी आय.सी.यु. अशा सुविधा उपलब्ध होणार आहेत.

शेअर्स हस्तांतराला बंदी
हे हॉस्पिटल सहकार कायद्यातंर्गत नोंदणी झाले असले तरी हॉस्पिटलचा शेअर्स मात्र कोणाला विकता येणार नाही किंवा हस्तांतर करता येणार नाही.


भागधारकांना या सलवती मिळणार -
बाह्यरुग्ण विभागातील बिलात २० टक्के सवलत
सर्व प्रकारच्या लॅब तपासणीमध्ये २० टक्के सवलत
एक लाखापर्यंत अपघात विमा संरक्षण
मोफत रुग्णवाहिका सेवा हॉस्पिटलच्या औषध बिलासाठी ५ टक्के सवलत जनरल वॉर्ड, स्पेशल रूम व आय.सी.यू. मध्ये २० टक्के सवलत वर्षातून एकदा मोफत तपासणी
शेअर्स ग्राहकांच्या संपर्कातून येणाऱ्या व्यक्तीस १० टक्के सवलत