जलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा, अशोक चव्हाण यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 05:18 PM2018-10-23T17:18:32+5:302018-10-23T17:22:40+5:30

जलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. 

Jalyukt Shivar is the biggest scam in the state - Ashok Chavan | जलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा, अशोक चव्हाण यांचा आरोप

जलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा, अशोक चव्हाण यांचा आरोप

googlenewsNext

 मुंबई -  यंदा झालेल्या कमी पावसामुळे राज्याच्या अनेक भागात भीषण  दुष्काळी परिस्थिती आहे. खरीपाची पिके वाया गेली आहेत. रब्बीची पेरणीही झाली नाही. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. जनावरांना चारा नाही. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय तरीही सरकार राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे असे सांगून जनतेची फसवणूक करत आहे.राज्यात दुष्काळसदृश्य नाही तर दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. तसेच जलयुक्त शिवार योजनेसाठी कोट्यवधी रूपये खर्च करूनही राज्यात भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. जलयुक्त शिवार हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली. 

गांधीभवन येथे पत्रकारपरिषदेला संबोधित करताना खा. चव्हाण म्हणाले की, ''काँग्रेस पक्षाने नाकर्त्या सरकारविरोधात राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरु केली आहे. जनसंघर्ष यात्रेच्या तिस-या टप्प्याचा व मराठवाडा दुष्काळ पाहणी दौ-याची सुरुवात बुधवार दि. २४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन तुळजापूर येथून आम्ही करणार आहोत. राज्यभरात शेतकरी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत, पण सरकार मात्र दुष्काळ जाहीर करण्यात चालढकलपणा करत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड संताप आणि नैराश्याचे वातावरण आहे. त्यामुळे या दुष्काळ पाहणी दौ-याच्या माध्यमातून काँग्रेस नेते मराठवाड्यातील शेतक-यांशी संवाद साधणार आहेत.  सरकारने आता शेतक-यांचा अंत पाहू नये. तात्काळ चारा छावण्या व टँकर सुरू करावेत. दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहुर्ताची वाट न पाहता सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा''.

''भाजप सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट वारंवार खोटे बोलून जनतेची फसवणूक व विश्वासघात केला आहे. शेतकरी, कष्टकरी, दलित,अल्पसंख्यांक, महिला, विद्यार्थी,तरूण असे सर्वच घटक सरकारवर नाराज आहेत. मराठा, मुस्लीम, धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करित आहेत. संपूर्ण महाराष्ट्र सरकारविरोधात रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे. राज्यातील जनतेच्या हक्कासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरु केली आहे. या जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या जनविरोधी धोरणांबाबत जनजागृती करून भाजप शिवसेना सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी हा जनसंघर्षाचा तिसरा टप्पा आहे,'' असे चव्हाण म्हणाले.

या दौ-यात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी खा. मल्लिकार्जुन खर्गे,  माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे,विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख काँग्रेस नेत्यांसह, राष्ट्रीय पातळीवरील नेते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

Web Title: Jalyukt Shivar is the biggest scam in the state - Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.