Jailed in jail if imposed for impunity, Uddhav Thackeray's attack on Modi | थापाबंदी आणल्यास तुरुंगात दिसाल, उद्धव ठाकरे यांचा मोदींवर हल्लाबोल
थापाबंदी आणल्यास तुरुंगात दिसाल, उद्धव ठाकरे यांचा मोदींवर हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी 
मुंबई : जनतेला भुलवून सत्तेत येणे ही थापच आहे. गोवंश हत्याबंदीसारखी थापाबंदी केली, तर सध्याच्या सत्ताधा-यांपैकी अनेकांना तुरुंगात जावे लागेल. छप्पन इंची छाती असली, तरी त्या छातीत कोणतेही शौर्य दिसत नाही, असा हल्लाबोल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता केला.
सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना त्यांनी सध्याच्या सरकारपेक्षा कालचा गोंधळ बरा होता, अशी टीका केली. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अहमदाबादमध्ये रोड शोसाठी नेण्यापेक्षा श्रीनगरच्या लाल चौकात त्यांचा रोड शो केला असता आणि तिरंगा फडकवला असता, तर मोदींचा अभिमान वाटला असता, पण तिरंगा फडकविण्याऐवजी ते पतंग उडवित बसले, असेही उद्धव यांनी सुनावले.
नार्वेकर यांना बढती
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे नवे सचिव असतील. या आधी हे पद खा. विनायक राऊत यांच्याकडे होते. सूरज चव्हाण हे युवासेनेचे नवे सचिव असतील.
गडकरींना केले लक्ष्य
दक्षिण मुंबईत नौसेनेचे काय काम आहे, त्यांनी सीमेवर जावे, असे सुनावणारे केंद्रीय भृपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना ठाकरेंनी त्यांच्या भाषणात लक्ष्य केले. ते म्हणाले की, गडकरी जे बोलले, ते तळपायाची आग मस्तकात नेणारे आहे. सरकारमध्ये आहेत, म्हणून ही मस्ती आहे. गडकरींनी नौसेनेची जाहीर नालस्ती व अवहेलना केली.
कानडी गीत गाणारे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना ठाकरे यांनी शब्दांचे फटकारे लगावले. अमित शहांमुळे त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. त्या मंत्रिपदाचे चांगले काहीतरी करा. माझा कानडीला विरोध नाही, पण कानडींच्या अत्याचारास विरोध आहे. पाटील यांना इतकेच कानडीचे प्रेम असेल, तर तिकडे जा अन् करा नाटक, असेही त्यांनी सुनावले.
ते अदृश्य हात सापडू द्या, सेना त्यांची होळीच करेल!-
भीमा कोरेगावमधील हिंसाचाराचा उल्लेख करून त्यांनी या दंगलीमागे काही अदृश्य हात असल्याची चर्चा असल्याचे नमूद केले. ते हात कोणाचे आहेत याची कल्पना आहे, पण प्रत्यक्षात ते हात दिसतील, त्या दिवशी त्या हातांची आम्ही होळी केल्याशिवाय राहणार नाही.
या निमित्ताने जातीपातीचे राजकारण करणाºयांना सेना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सुनावले. जातीपातीच्या नावावर मराठी माणसात कोणी फूट पाडू नका. आपण फुटलो, तर आणखी कोणी औरंगजेब येईल आणि महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे तुकडे करेल, असे उद्धव म्हणाले.


Web Title:  Jailed in jail if imposed for impunity, Uddhav Thackeray's attack on Modi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.