मुंबई -  महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेती शास्वत शेती बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून गेल्या तीन वर्षात शेतीक्षेत्रांमधील गुंतवणूक तिपटीने वाढली आहे. शेतीक्षेत्रात सुमारे 67 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीचे न्यूज 18 लोकमत असे रिलाँचिंग झाले. त्यावेळी महाराष्ट्र सरकारच्या वाटचालीवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले,"आम्ही शास्वत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. राज्यातील बहुतांश क्षेत्र अद्यापही कोरडवाहू आहे. तसेच शेती क्षेत्र हे मदत आणि पुनर्वसनाचे क्षेत्र नाही. त्यात गुंतवणूक व्हायला हवी. ही बाब आम्ही विचारात घेतली आहे. त्यामुळेच शेतीक्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. 2012-13 सालची परिस्थिती आणि आजची परिस्थिती पाहिल्यास आज शेती क्षेत्रामध्ये सुमारे 67 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. शेतीमधील गुंतवणूक ही जवळपास तिप्पटीने वाढली आहे."
"महाराष्ट्रातील शेतीक्षेत्रामध्ये सकारात्मक वाढ झाली आहे. शेतीक्षेत्रात सुमारे 12.50 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. आकडेवारीत सांगायचे झाले तर शेतीक्षेत्रामधील उत्पन्न 40 हजार कोटींवर पोहोचली आहे. अधिकाधिक शेतीक्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी सिंचनाची सोय वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी एक लाख विहिरी, 50 हजार शेततळी बांधण्यात आली आहेत, शेतकऱ्यांना वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. तसेच जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सुमारे 12 लाख हेक्टर जमीन हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे."अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.