महाराष्ट्रातील भाजपच्या यशाचा अन्वयार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 05:14 AM2019-05-26T05:14:29+5:302019-05-26T05:14:39+5:30

केंद्राच्या कामगिरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचीही जोरकस साथ मिळाली.

Interpretation of BJP's success in Maharashtra | महाराष्ट्रातील भाजपच्या यशाचा अन्वयार्थ

महाराष्ट्रातील भाजपच्या यशाचा अन्वयार्थ

Next

- माधव भंडारी
केंद्राच्या कामगिरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचीही जोरकस साथ मिळाली. शेती व ग्रामीण भागातील गंभीर समस्या हाताळण्यात देवेंद्रजींनी कौशल्य व समंजसपणाचे दर्शन घडवले त्यास मतदारांनी पसंती दिली. भाजप २०१४ च्या यशाची पुनरावृत्ती अजिबात करू शकणार नाही, असेही बहुतेकांना वाटत होते. हे सर्व अंदाज मतदारांनी साफ खोटे पाडले आणि युतीच्या पदरात यशाचे माप भरभरून टाकले.
या निवडणुकीतील भाजपचे यश निर्विवाद आहे. पक्षाने लढवलेल्या २५ पैकी २३ जागा जिंकल्या. त्या २३ मधील चार जागांवर (जळगाव, पुणे, उत्तर मुंबई व रावेर) भाजपला मिळालेल्या मतांचे प्रमाण ६१ टक्क्यांच्या वर आहे. बारा जागांवर भाजपने ५२ टक्क्यांपेक्षा जास्त मते घेतली आहेत. केवळ सात जागांवर भाजपला ५० टक्क्यांपेक्षा कमी मते पडली आहेत. बारामती व चंद्रपूर या दोन्ही पराभूत झालेल्या जागांवरही भाजपला ४० टक्क्यांपेक्षा अधिक मते आहेत. लढवलेल्या २५ जागांवर मिळून भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी ५२ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. राज्यात युतीच्या मतांचे प्रमाणही ५० टक्क्यांवर पोहोचले आहे. १९५२ नंतर असे निर्विवाद यश आम्हाला पहिल्यांदाच मिळाले. १९७२ च्या निवडणुकीत काँग्रेसने ७० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवली होती. पण त्यानंतर झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये विखुरलेला कौल असेच चित्र राज्यात बघायला मिळाले होते. त्या पार्श्वभूमीवर या यावेळचा कौल समजून घेतला पाहिजे.
सर्व घटकांनी - शहरी, ग्रामीण, जाती, धर्म, पंथ, भाषा वगैरे - भाजपवर पसंतीचा शिक्का मारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हा अर्थातच या यशामागचा सर्वात मोठा घटक ! त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केलेली कामगिरी जनतेला विश्वासार्ह वाटली; त्यांचे नेतृत्व आश्वासक वाटले. भारत जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे असे चित्र या पाच वर्षांत निर्माण झाले. त्यांचे सरकार दहशतवाद व भ्रष्टाचार सहन करत नाही हे स्पष्ट झाले. मोदी सरकारने १३४ लोककल्याणकारी योजना हाती घेतल्या व त्यांचा लाभ कोणताही भेदभाव न करता वंचित, गरीब आणि निम्न मध्यमवर्गातील गरजूंंपर्यंत पोहोचवल्या.
केंद्राच्या या कामगिरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचीही तेवढीच जोरकस साथ मिळाली. शेती व ग्रामीण भागातील गंभीर समस्या हाताळण्यात मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्रजींनी जे कौशल्य व समंजसपणाचे दर्शन घडवले त्यास मतदारांनी पसंती दिली. जलयुक्त शिवार, शेतकरी यांची कर्जमाफी, पीकविमा, सर्व घरांना वीजपुरवठा, ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री आवास अशा वेगवेगळ्या योजना फडणवीस सरकारने यशस्वीपणे राबवल्या. त्याचा सकारात्मक परिणाम मतदानात दिसला.
केंद्र, राज्य सरकारच्या कामगिरीला पक्षसंघटनेची सार्थ साथ मिळाली. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी साडेचार वर्षे अत्यंत बारकाईने नियोजन करून उभारणी केली, सर्व कार्यकर्त्यांना लोकांपर्यंत पोहोचून काम करायला उद्युक्त केले. त्या प्रेरणेतून राज्यभरात अक्षरश: लाखो कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. त्यातून सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचत राहिले. शहा यांना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची तोलामोलाची साथ मिळाली. सरकार व संघटना यांच्या या संयुक्त कामगिरीला योग्य पद्धतीने केलेली युती व जोडलेले मित्रपक्ष यांची चांगली जोड मिळाली. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून भाजपला मिळालेले यश महत्त्वाचे आहे.
(मुख्य प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश भाजप)

Web Title: Interpretation of BJP's success in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा