मराठीच्या प्रसारात इन्स्क्रीप्ट कीबोर्ड महत्त्वाची भूमिका बजावेल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 01:50 PM2018-02-27T13:50:25+5:302018-02-27T13:50:25+5:30

भारतात एकच स्टँडर्ड स्वीकारले न गेल्यामुळे आपल्याकडच्या मुद्रणव्यवसायाला फटका बसला. ज्या वेगाने मुद्रणक्षेत्र वाढायला हवे होते त्या वेगाने ते वाढले नाही. 

Inscript keyboard will play major role in popularise Marathi language | मराठीच्या प्रसारात इन्स्क्रीप्ट कीबोर्ड महत्त्वाची भूमिका बजावेल

मराठीच्या प्रसारात इन्स्क्रीप्ट कीबोर्ड महत्त्वाची भूमिका बजावेल

googlenewsNext

मुंबई: १९८९ साली सी-डॅकने इन्स्क्रीप्टची निर्मिती केली. संगणकावर मराठी टंकलेखन करणं सोपं जावं यासाठी वर्णाक्षरमालेप्रमाणे की-बोर्डवर त्याची रचना करण्यात आली होती. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डकडून हा कीबोर्ड प्रमाणितही करुन घेण्यात आला. देशभरात इन्स्क्रीप्टपूर्वी मात्र ओल्ड टाइपरायटर हा कीबोर्ड वापरला जाई. त्यामुळे ज्या लोकांना टंकमुद्रण यायचे त्यांना तो ओल्ड टाइपरायटर वापरणं सोपं जाई. मात्र, बाकीच्या नवख्या मुलांना तो शिकायला ६ महिने जायचे. इन्स्क्रीप्टने त्यामध्ये क्रांती केली. केवळ २ दिवसांच्या वापराने त्यावर हात बसू शकत होता आणि तो लगेच वापरायला सुरुवात करता येत होती.

संगणकावर टंकलेखन करताना वेगवेगळी सॉफ्टवेअर्स वापरली जातात. त्यांच्या स्टोरेजपद्धती वेगवेगळ्या असतात. या स्टोरेजच्या म्हणजे माहिती साठवण्याच्या पद्धती कंपनीनुसार वेगवेगळ्या असतात. उदाहरण द्यायचं झाल्यास श्री लीपीमध्ये तुम्ही टाइप केलं असेल आणि तुम्ही ज्याला ती माहिती पाठवली आहे त्याच्या संगणकावरील स्टोरेजची पद्धती वेगळी असेल तर त्याच्याकडे ते वाचता येणार नाही. सी-डॅकने इन्स्क्रीप्टसाठी साधंसोपं असं स्टोरेजकोड तयार केला आणि त्याचं १९९१ साली बीआयएस रजिस्ट्रेशन झालं. त्याचा वापर भारतीय भाषांचा प्रसार करण्यासाठी झाला असता. सरकारने भारतीय कंपन्यांना ते वापरण्यासाठी दिलं असतं तर आजच चित्र वेगळं दिसलं असतं. मात्र चीन, जपान आणि कोरिया यांनी एकच स्टँडर्ड वापरुन संगणकावरची लिपी स्वीकारली. भाषा वेगवेगळ्या आणि राजकीय भूमिका वेगवेगळ्या असल्या तरीही त्यांनी केवळ लिपीमुळे एकत्र येत एकच स्टँडर्ड स्वीकारले. तसेच अरेबिक, फारसी, उर्दू यांनीही एकच स्टँडर्ड स्वीकारले. मात्र, भारतात एकच स्टँडर्ड स्वीकारले न गेल्यामुळे आपल्याकडच्या मुद्रणव्यवसायाला फटका बसला. ज्या वेगाने मुद्रणक्षेत्र वाढायला हवे होते त्या वेगाने ते वाढले नाही. 

१९९५ साली इंटरनेटच्या प्रसारानंतर नव्या कोडची गरज निर्माण झाली. त्यावेळेस नव्याने तयार झालेल्या युनिकोडने मात्र या परिस्थितीमध्ये क्रांती झाली. युनिकोड हा युनिवर्सल कोड आहे. संगणकात एखादी माहिती टंकलिखित केली की ती कशा पद्धतीने साठवाची ती स्टोरेज करण्यासाठी एक कोड वापरावा लागतो. युनिकोड ही पद्धती जगभरात सर्वत्र चालते.त्यांनी बीआयएसचे स्टँडर्डस तपासले आणि त्यांना ते उत्तम असल्याचे आढळून आले. त्यामुळेच इन्स्क्रीप्टचं स्टोरेज कोड हे युनिकोड हेच असल्यामुळे ते वापरण्यासाठी सोपं आणि भारतीय भाषांच्या प्रसारासाठी उत्तम आहे. यामुळे कोणत्याही सिस्टमवर त्यामध्ये टंकलिखित केलेली अक्षरे वाचली जाऊ शकतात.

इन्स्क्रीप्टचा वापर १९९१ रोजी पासून आपण इन्स्क्रीप्ट सुरु केलं असतं तर आज आपण मोठा टप्पा गाठला असता. चीनमध्ये इंटरनेट, संगणकाचा प्रसार भारतापेक्षा तुलनेत उशिरा झाला मात्र त्यांनी एकच सोपे स्टँडर्ड वापरल्यामुळे ते मुद्रण आणि भाषाक्षेत्राच्या विकासात आपल्या कित्येक मैल पुढे आहेत. भारताने प्रादेशिक भाषांच्या विकासाकडे लक्ष देण्याऐवजी इंग्रजीकडे लक्ष जास्त दिले किंबहुना त्याचा आग्रहच धरुन बसलो. चीनने इंग्रजीपेक्षा स्वतःच्या भाषेला संगणकावर आणले आणि त्यांच्या भाषा सुरक्षित राहिल्या आहेत. भारतात मराठी संगणकावर वापरण्यात अडथळे येताना दिसले की लगेच थांबा! मराठी कशाला शिकता त्यापेक्षा इंग्लिशच शिका! असं धोरण राज्यकर्त्यांनी वापरले. आता तरी चूक लक्षात घेऊन आपण इन्स्क्रीप्टचा वापर सुरु केला पाहिजे.

(लेखक लीना मेहेंदळे या माजी सनदी अधिकारी आहेत.)
 

Web Title: Inscript keyboard will play major role in popularise Marathi language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.