सांगली : पोलिसांच्याच असंवेदनशीलपणाचा प्रकार शहर पोलीस ठाण्यात बुधवारी उघडकीस आला आहे. लूटमारप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीचा पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला. पोलिसांनी हे प्रकरण दडपण्यासाठी मृतदेह आंबोलीत नेऊन जाळला आणि आरोपी पळून गेल्याचा बनाव रचल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह सहा पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. अनिकेत कोथळे (२६, सांगली) असे मृत आरोपीचे नाव आहे.

उलटे टांगून मारले, डोके पाण्यात बुडवून ठेवले
कोल्हापूरचे विशेष
पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, कवलापूरचा
(ता. मिरज) अभियंता संतोष गायकवाड याला लुबाडल्याप्रकरणी अनिकेत कोथळे व
अमोल सुनील भंडारे या दोघांना अटक झाली
होती. न्यायालयाने
त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती. तपास कामटे यांच्याकडे होता. सोमवारी रात्री कामटेंच्या पथकाने दोघांना चौकशीसाठी कोठडीतून गुन्हे प्रगटीकरण (डीबी) शाखेत आणले. कोथळेला पंख्याच्या हुकाला उलटे टांगले व बेदम मारहाण केली. त्याचे डोके पाण्यात बुडवून ठेवले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार दुसरा आरोपी अमोल भंडारे याने पाहिला होता.कामटेच्या पथकाने मृतदेह सांगलीच्या शासकीय रुग्णालयात नेण्याचे ठरविले, पण भीतीने सर्व जण मृतदेह घेऊन पुन्हा पोलीस ठाण्यात आले. त्यानंतर, मृतदेह हवालदार अनिल लाड यांच्या खासगी मोटारीतून आंबोली (जि. सिंधुदुर्ग) घाटात नेला व जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.