incredible contribution of jijau in chatrapati shivaji maharajs life | जिजाऊ... पोटचा गोळा स्वराज्याला अर्पण करणारी माता
जिजाऊ... पोटचा गोळा स्वराज्याला अर्पण करणारी माता

- चंदाराणी कुसेकर

हरवलेल्या स्वाभिमानाला आणि अस्तित्वाला पुनर्जन्म देणारी, आपल्या पोटचा गोळा स्वराज्यास अर्पण करणारी माता म्हणजे राजमाता जिजाऊ. स्वराज्य स्थापन करणे, ही धारणा शिवरायांमध्ये जिजाऊंनी निर्माण केली. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींतून संस्कार होत गेले. ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्र म अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू त्यांनी दिले. ‘शिवबा’ ते ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा यशस्वी प्रवास घडवला, तो मातृत्वात गुरुत्व असलेल्या जिजाऊंनी.

आपल्या महाराष्ट्राला समृद्ध असा वारसाच लाभला आहे. इतिहासातील प्रत्येक पान म्हणजे हिरेमाणिक याच्या शब्दांनी रचलेले नितळ असं सोनेरी पानं! असाच एक नवा इतिहास जन्माला घालणाऱ्या माऊली अर्थात राजमाता जिजाऊ. आपल्या पोटचा गोळा स्वराज्यास अर्पण करून या मातीला पहिला छत्रपती राजा दिला तो जिजाऊंनी. जिजाऊंशिवाय शिवबा छत्रपती झाला असता का? शेवटी, इतिहासाला जन्म द्यायलाही एक माऊलीच लागते, हे तितकेच खरे.

राजमाता जिजाबाई भोसले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आणि प्रतापशाली छत्रपती संभाजी महाराजांच्या आजी. या दोघांना घडवण्यात या माऊलीचा सर्वात मोठा वाटा होता. खेळ खेळण्याच्या वयात त्या तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. वाढत्या वयाबरोबरच पारतंत्र्याची जाण आणि लाचारी व फितुरीच्या रोगाचा तिरस्कार त्यांच्या मनात वाढत होता. भावना बाजूला सारून कर्तव्यात कसलीही कसूर होऊ न देता धैर्य आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाऊंचा गुण शिवाजी महाराजांमध्ये पुरेपूर उतरला होता. जिजाऊंनी बालशिवबाला रावणाचा वध करणारा राम, दुष्ट कंसाचा नाश करणारा कृष्ण, बकासुराचा वध करून लोकांची सुटका करणारा भीम यांच्या पराक्रमाच्या कथा सांगितल्या. त्यातून पारतंत्र्यात असलेल्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्याची शिकवण दिली. सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे धडेही दिले. राजनीती शिकवली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्यायाला शासन देण्याचे धाडस शिकवले.

बालमनावर संस्कार करून शिवबारूपी कोहिनूर हिºयाला पैलू पाडण्याचे काम जिजाऊंनी केले. देव, धर्म आणि देशावर प्रेम करायला शिकवलं. सद्गुणांची व विचारांची दूरदृष्टी शिवबांना जिजाऊंकडूनच मिळाली. मातृवत्सलेने शिवरायांना स्वराज्यनिर्मितीचे धडे दिले. सर्व मराठ्यांमध्ये स्वाभिमान भिनवला. प्रत्येक मावळ्यात शिवबा घडवला. स्वराज्य जडणघडणीसाठी आयुष्य पणाला लावले. जिजाऊंच्या संस्काराने असा राजा घडवला, जो सिंहासनावर बसण्याआधीच ‘राजे’ म्हणून मान्यता पावला.

माता खºया अर्थाने एक शिल्पकार असते. तिने दिलेले ज्ञान कुठल्याही ग्रंथापेक्षा प्रभावशाली आणि पवित्र असते. आपल्या मुलांना घडवण्याचं कर्तव्य ती पार पाडत असली, तरी ती माऊली आजही दुय्यमच आहे. अगदी घराघरांतही असमानता, आजही तिची उपेक्षा आणि गर्भातच तिची हत्या, हे सारं सत्य समोर असूनही आज कुठलीच माता आपल्या बालकावर संस्कार रुजवण्यात कमी पडत नाही. बाळाला चांगले संस्कार देण्यासाठी ती कायम प्रयत्नशील असते. धाडस, सहनशीलता, कल्पकता, समाजभान, परोपकारी वृत्ती अशा अनंत गुणांचा समुच्चय आजच्या ‘आई’मध्येदेखील आहे. महात्मा गांधींनी म्हटले आहे, ‘एक माता १०० शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ असते.’ त्यात एक शाश्वत सत्य दडलेले आहे. एक उत्तम मनुष्य म्हणून जगण्यास पात्र बनवते, ती आई.

उपाशी राहून, काबाडकष्ट करून संसाराचा गाडा ओढताओढता कालवश होणारी, भूतदयेचे बाळकडू पाजून संस्कृती जपणारी माऊली आजच्या पिढीला अडगळ होताना दिसते. वृद्धाश्रमात आईला पोहोचवून पैशांनी सुख देऊ पाहणारी आणि प्रसंगी आईच्या अंत्यविधीलाही वेळ नसणारी पिढी तयार होत आहे. परंतु आधुनिकतेत जग कितीही पुढे गेले, तरी पुराणकाळापासून चिरंतन असलेले मातृरूप मात्र तेच असणार आहे.

जीवनात यशाची शिखरे चढत असताना, केव्हातरी कुणीतरी जाणीव करून देते की, तुझ्या या कर्तृत्वामागे तुझ्या आईचा फार मोठा हात आहे आणि मनुष्य झटक्यात भानावर येतो. आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न करतो. आपले हे यश आपल्या आईची देणगी आहे, हे त्याला उमगते. आईने दिलेले संस्कार, शिकवण यातूनच माणूस मोठा होतो. बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्याचे सामर्थ्य निसर्गाने आईलाच दिलेले आहे. प्रथम निर्मितीचा पाया; आत्मा आणि ईश्वराचा संगम, तर कधी ती विश्वाची माऊली असते. जिजाबाई म्हणजे याच शक्तीचे एक देखणे रूप! महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास साकारण्यामागील या मूर्तिमंत व्यक्तिमत्त्वास मानाचा मुजरा!

(लेखिका जि.प. शाळा, कशेळी येथे शिक्षिका आहेत.)
 


Web Title: incredible contribution of jijau in chatrapati shivaji maharajs life
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.