Impact of Gujarat: Maratha Reservation Again Written; Warning to the government, social media also got a boost | गुजरातचा प्रभाव : मराठा आरक्षण पुन्हा ऐरणीवर; सरकारला इशारा, सोशल मीडियावरही जोर वाढला

मुंबई : गुजरात निवडणुकीमध्ये पाटीदार समाजाने भारतीय जनता पार्टीला दिलेल्या धक्क्यानंतर महाराष्ट्रात मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात ठिकठिकाणी आरक्षणाची मागणी करणारे बॅनर झळकावत सोशल मीडियावरही मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे नवी मुंबईचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी थेट खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनाच प्रश्न विचारला आहे. मुंबईतील महामोर्चादरम्यान मध्यस्थीची भूमिका घेणारे संभाजीराजे यांना मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांचा विसर पडला आहे का? असा प्रश्न पोखरकर यांनी उपस्थित केला आहे. याआधी शिवसेना आमदारांनी नागपूर अधिवेशनाच्या दुस-याच दिवशी विधानभवन परिसरात उपोषण करत मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत तत्काळ आरक्षण लागू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर लागलेल्या गुजरात निवडणुकीच्या निकालात भाजपाची झालेली पिछेहाट पाहून, आता मराठा समाजाने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. त्यात विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांवर टीका होण्यास सुरुवात झाली आहे.
गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर पुढील वर्षी जाहीर होणा-या राज्यातील निवडणुकांना सामोरे जायचे असेल, तर आताच सावध होण्याचा इशारा मराठा समाजाने दिला आहे.