नागपूर : आपण पक्षाच्या व्यासपीठावर तसेच पक्ष नेत्यांकडे शेतक-यांचे प्रश्न वेळोवेळी मांडले. त्यामुळे पक्षविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करणे चुकीचे आहे. जनतेसाठी भांडणे ही माझी ‘आदत’ आहे. ती मला मान्य आहे, असे सांगतानाच, माझ्या वाट्याला जाऊ नका. अंगावर याल तर शिंगावर घेईन, असा इशारा भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी स्वपक्षाला दिला.
पटोले हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर टीका करीत असून, शेतकºयांच्या प्रश्नावरून सरकारला लक्ष्य करीत आहेत. आता भाजपानेही त्यांना उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत घेत पटोले हे ‘आदत से मजबूर’ असल्याची टीका करीत त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावर म्हणणे मांडावे, असा सल्ला दिला होता.
त्यावर पटोले यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, भंडारी यांनी मला नाहक सल्ले देऊ नयेत. भंडारी यांची स्वत:ची अवस्था बिकट आहे. विधान परिषदेत संधी न मिळाल्याने मधल्या काळात ते गायब होते, असा चिमटा त्यांनी काढला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडून पक्षप्रवेशाच्या आॅफर आहेत. पण भाजपाला माझे महत्त्व समजत नाही. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील आपल्याला चर्चेसाठी फोन केला होता. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राहुल गांधी यांची भेट घेऊन शेतकºयांसाठी राबवायच्या धोरणांबाबत त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.