- लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास किती जागा मिळतील यासाठी सर्व्हे केला जात आहे. मध्यावधीची चाचपणी कशाला करता? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या, आम्ही सरकारला बाहेरून भक्कम पाठिंबा देऊ, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे यांनी येथील शेतकरी
मेळाव्यात केली.
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेनेने हाती घेतलेल्या अभियानाचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाला. या वेळी बोलताना त्यांनी केंद्र व राज्य सरकारे, तसेच भाजपावर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘‘केंद्रात व राज्यात सत्ता मिळूनही भाजपा सत्तापिपासू झाली आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास किती जागा मिळतील, यासाठी सर्व्हे केला जात आहे.’’ तूरखरेदीतील घोटाळ्यामुळे शेतकरी संकटात सापडला असताना सरकार शेतकऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकार बदलले, तरी चेहरा तोच असल्याची खंत व्यक्त करून उद्धव यांनी, मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा ‘अभ्यासू विद्यार्थी’ झाल्याचा टोला लगावला. समृद्धी महामार्गात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

साले म्हणणाऱ्यांचे सालपट काढू
शेतकऱ्यांना ‘रडतात साले’ असे म्हणणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावरही ठाकरे यांनी टीका केली. दानवेंचे ते विधान ऐकून तळपायाची आग मस्तकात गेली. सत्तेची मस्ती चढल्यामुळेच अशा प्रकारची भाषा केली जात असेल तर साले म्हणणाऱ्यांचे सालपट काढू, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

कर्जमुक्ती नसेल, तर खात्यावर १५ लाख द्या!
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात नोटाबंदी व मन की बात या विषयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टीकेचे लक्ष्य केले. परदेशातून काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकण्याच्या घोषणेचे काय झाले? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देता येत नसेल, तर त्यांच्या खात्यावर प्रत्येकी १५ लाख रुपये टाका, असे ठाकरे म्हणाले.

शेतकऱ्यांवरील कर्ज सरकारचेच पाप : शेट्टी : स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन मोदी सरकारने ३ वर्षांत पाळले नाही म्हणून शेतकऱ्यांवर कर्जमुक्ती मागण्याची वेळ आली. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज हे सरकारचेच पाप असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी केला. २२ मेपासून पुणे-मुंबई आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.