मी मनोहर कुलकर्णी नव्हे, संभाजी भिडेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:08 AM2018-04-26T00:08:36+5:302018-04-26T07:08:14+5:30

प्रथमच संभाजी भिडे यांच्या वतीने अ‍ॅड. पुष्कर दुर्गे न्यायालयात हजर झाले.

I am not Manohar Kulkarni, Sambhaji too! | मी मनोहर कुलकर्णी नव्हे, संभाजी भिडेच!

मी मनोहर कुलकर्णी नव्हे, संभाजी भिडेच!

googlenewsNext

पुणे : कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलप्रकरणी म्हणणे दाखल करताना माझे नाव मनोहर विनायक कुलकर्णी नसून माझे नाव संभाजी भिडेच असल्याचे म्हणणे त्यांच्या वकिलांनी आज न्यायालयात सादर केले. दरम्यान, त्यांच्या वकिलांना याप्रकरणी सविस्तर म्हणणे मांडण्यासाठी सर्व कागदपत्रे पुरविण्याचे आदेश विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी दिले आहेत.

गुन्हा दाखल झाल्यानंतर बुधवारी प्रथमच संभाजी भिडे यांच्या वतीने अ‍ॅड. पुष्कर दुर्गे न्यायालयात हजर झाले. दुर्गे यांनी पहिल्याच मुद्द्याचे खंडन करताना भिडे यांचे नाव मनोहर विनायक कुलकर्णी नसून संभाजी भिडेच असल्याचे न्यायालयात सांगितले. तक्रारदार संजय भालेराव यांनी भिडे यांच्याविरोधात तक्रार दाखल करताना त्यांचे नाव मनोहर विनायक कुलकर्णी (वय ५९) असे सांगितले आहे. मात्र, हे नाव चुकीचे असून त्यांचे नाव संभाजी भिडे (वय ८१) असे आहे. त्यामुळे ते दुरुस्त करण्यात यावे, असे सुचविल्याचे अ‍ॅड. दुर्गे यांनी सांगितले. तसेच तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केल्यानुसार भिडे यांच्याविरोधातील व्हिडिओ फुटेज, व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग, कोरेगाव-भीमा संर्दभातील पत्रके, फोटो, तक्रार यांची प्रत देण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली. त्यानुसार न्यायालयाने ही मागणी मान्य करीत तक्रारदार यांनी त्यांच्याकडील माहिती भिडे यांच्या वकिलांना द्यावी, असा आदेश दिला आहे. याप्रकरणी अनिता सावळे या सामाजिक कार्यकर्तीने तक्रार दिलेली आहे. त्यानुसार प्रथमच भिडे यांच्या वतीने सुमारे चार महिन्यांनंतर प्रथमच अ‍ॅड. पुष्कर दुर्गे यांनी म्हणणे सादर केले.

भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात त्यांच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. या घटनेत संजय भालेराव यांची इनोव्हा कार जळाल्याने त्यांनीही न्यायालयात धाव घेत, भिडे यांची ब्रेनमॅपिंग, पॉलिग्राफ चाचणी करण्यात यावी, अशी मागणी वकिलांमार्फत केली होती.
याप्रकरणी भिडे गुरुजी यांनी २५ एप्रिलपर्यंत प्रत्यक्ष न्यायालयात येऊन किंवा वकिलांद्वारे त्यांची बाजू मांडण्यात यावी, अशी सूचना न्यायालयाने ४ एप्रिल रोजी दिली होती. त्याबाबत न्यायालयाच्या वतीने मनोहर विनायक कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे या नावाने नोटीसही काढण्यात आली होती.

Web Title: I am not Manohar Kulkarni, Sambhaji too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.