ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 17 - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. मात्र या बातम्या निराधार असल्याचा दावा स्वत: खुद्द अमित ठाकरेनेच केला आहे.

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अमित ठाकरेनं मी तंदुरुस्त असल्याचं सांगितलं आहे. तसेच मुंबई महापालिकेसाठीच्या प्रचारात सक्रिय राहणार असल्याचंही संकेत त्याने दिले आहेत. सोशल मीडियावर पसरवण्यात आलेल्या बातम्यांमध्ये निव्वळ अफवा असल्याचंही तो म्हणाला आहे.

अमित ठाकरे म्हणाला, सोशल मीडियावर मला कॅन्सर असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. पण तसं काहीही नाही. मी माझ्या टीमसोबत अगदी सक्रिय आहे. नुकतंच लाँच केलेलं फेसबुक पेजही ऑपरेट केलं जात असून, राज ठाकरेंचं भाषणही त्यावर लाईव्ह दाखवण्यात येत आहे. मी काही काळ आजारी होतो, हे खरं आहे. पण गंभीर आजारानं ग्रस्त असल्याच्या बातम्या निराधार आहेत. मी सध्या मुंबई महापालिकेच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी होणार आहे. तसेच अमित ठाकरेंच्या आई शर्मिला ठाकरे यांनीही अमितची प्रकृती उत्तम असून तो सध्या प्रचारात व्यस्त आहे. पण माझ्या मुलाबाबत अशा अफवा पसरवणाऱ्यांना काय समाधान मिळतं, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.